बेल्मान, कार्लमीकाएल : (४ फेब्रुवारी १७४०–११ फेब्रुवारी १७९५). स्वीडिश कवी. जन्म स्टॉकहोम येथे एका संपन्न कुटुंबात. अप्साला विद्यापीठातून आपले शिक्षण घेतल्यानंतर तो सरकारी नोकरीत शिरला. बेल्मानच्या घरातील वातावरण अत्यंत धार्मिक होते आणि वेल्मानच्या आरंभीच्या कविताही धार्मिक स्वरुपाच्या होत्या. तथापि तो पुढे तो स्टॉकहोममधल्या बहुरंगी सामाजिक जीवनात अधिक रमला त्या जीवनावरची गाणी लिहून वाद्यसाथीसह सादर करू लागला. स्टॉकहोममधील अनेक व्यक्तींचे चित्रण त्या गीतांत केलेले असे. त्याची ही प्रसन्न, विनोदी गीते संपूर्ण स्कँडिनेव्हियात लोकप्रिय ठरली. अशा गीतांत Fredmans Epistlar (प्रकाशित १९७०) आणि Fredman Sanger (१९७१) ह्या गीतमाला विशेष ख्यातनाम झाल्या. ह्या गीतमालांतील फ्रेडमन हा एक घड्याळजी असून मद्यपानाच्या हारी गेलेला आहे. फ्रेडमनची व्यक्तिरेखा विनोदी पण सहानुभूतीने रंगविण्यात आलेली आहे. ख्यातकीर्त स्पॅनिश लेखक सर्व्हँटीझ ह्याने निर्मिलेल्या डॉन क्विक्झोट ह्या विश्वविख्यात व्यक्तिरेखेची फ्रेडमनशी तुलना केली जाते. बायबलच्या आधारे त्याने रचिलेली काही विडंबन-गीतेही यशस्वी ठरली.