बेलोरशियन भाषा : बायलो-रशियन किंवा व्हाइट रशियन भाषा अशी हिची इतरही दोन नावे वापरात आहेत. इंडो-यूरोपियन भाषाकुलातील स्लाव्हिक अथवा स्लॅव्हॉनिक भाषासमूहातील पूर्वस्लाव्हिक गटातील ही एक भाषा. युक्रेनियन आणि रशियन या तिच्या भाषाभगिनी सोविएट संघराज्यातील पंधरा राज्यांपैकी बेलोरेशियन हे एक राज्य. २,०७,६०० चौ. किमी. च्या प्रदेशातील ८० टक्के लोक म्हणजे जवळजवळ ९०,००,००० लोक ही भाषा बोलतात. काही बेलोरशियन भाषिक अमेरिका आणि सायबीरियामध्ये स्थलांतरित झाले आहेत.
चौदाव्या शतकात प्राचीन बेलोरशियन भाषा लिथ्युएनिया या शेजारच्या राज्याची शासकीय भाषा म्हणून वापरात होती. १९२१ ते १९३९ मध्ये बेलोरशियाचा पश्चिमेचा भूभाग पोलंडच्या अमलाखाली होता. त्यामुळे अर्वाचीन बेलोरशियन भाषेचा मुख्यत: दोन बोलीभाषा आहेत. एक वायव्येकडे बोलली जाणारी तर दुसरी ईशान्यकडे बोलली जाणारी. वायव्येकडच्या बोलीभाषेत पोलिश शब्दांचे प्रमाण जास्त आहे. मिन्स्क या बेलोरशियाच्या राजधानीत बोलली जाणारी बेलोरशियन भाषा ही प्रमाण बोली मानली जाते. ती वर सांगितलेल्या दोन्ही बोलींच्या मध्यावर आहे. प्रमाण बेलोरशियन ही आता साहित्याची भाषा म्हणूनही मान्यता पावली आहे.
इतर स्लाव्हिक भाषांप्रमाणे बेलोरशियन भाषासुद्धा संश्लेषणप्रवण भाषा आहे. सघोष तालुच्छदीय घर्षक ध्वनी आणि अघोष तालुच्छदीय घर्षक ध्वनी बेलोरशियामध्ये आढळतात. बेलोरशियन भाषेची लिपी ‘सिरिलिक’ लिपी ही आहे. म्हणजे यातील बरीचशी चिन्हे रोमन लिपीतील चिन्हांसारखी आहेत. मात्र हिचे ध्वनी वेगळे आहेत.
संदर्भ : 1. Jakoblon, Roman, Selected Writings, 2nd ed. Vol. 6, Paris, 1971.
2. Meillet, Antoine, Le Slave Commun, 2nd Rev. ed. Paris 1934).
धोंगडे, रमेश वा.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..