बेलिफ : न्यायालयापुढे जी चौकशी चालते तीमध्ये पक्षकार व साक्षीदार असतात, त्यांना आपल्यासमोर हजर राहण्यासंबंधी न्यायालय जे हुकूम करू शकते, ते तीन प्रकारचे असतात : (१) नोटीस, (२) समन्स व (३) अधिपत्र, याशिवाय दावा चौकशी संपल्यावर वादीतर्फे जर हुकूमनामा झाला, तर त्याची वसुली करण्यासाठी जप्तीहुकूम काढतात, त्यामुळे स्थावर अथवा जंगम माल जप्त करून व लिलावात विकून पैसे न्यायालयात जमा होतात. केव्हाकेव्हा विशिष्ट प्रसंगी दाव्याचा निकाल होण्याअगोदर जप्ती करता येते. ह्या जप्ती‌स ‘अव्वलजप्ती’ असे नाव आहे. या सर्व प्रकारच्या न्यायालयीन हुकुमांची बजावणी जो अधिकारी करतो त्यास बेलिफ म्हणतात. अशा प्रकारे कोर्टाची नोटीस, समन्स अथवा अधिपत्र बजावून वा जप्तीचा हुकूम असेल, तर जप्ती करून त्यासंबंधीचा साद्यंत अहवाल बेलिफाने ज्या न्यायालयाकडून त्यास हुकूम मिळाला असेल, त्या न्यायालयास सादर करावयाचा असतो. जेथे बेलिफ जास्त असतात, तेथे मुख्य बेलिफ व दुय्यम बेलिफ अशी वर्गवारी असते.

‘बेलिफ’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ जिल्ह्यासारख्या ठिकाणी असलेल्या राजाचा प्रतिनिधी, असा आहे. इंग्लंडमधील वहिवाटीप्रमाणे ‘मेयर’, ‘शेरीफ’ यांसारख्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना उद्देशूनही ही संज्ञा वापरली जाई. पुढे ही संज्ञा भारतातील न्यायव्यवस्थेत न्यायालयीन हुकुमांची बजावणी करणारा अधिकारी या अर्थाने रूढ झाली. ज्या ठिकाणी शेरीफचे कार्यालय असते, त्या ठिकाणी बेलिफ हे शेरीफच्या हाताखाली काम करणारे अधिकारी असतात. जेथे शेरीफ नसेल, तेथे न्यायालयीन निबंधकाच्या हाताखाली बेलिफ काम करतात. हुकुमांची बजावणी झाली की नाही व ती न झाल्यास त्याला कारणे काय, यासंबंधी बेलिफाला न्यायालयास अहवाल सादर करावा लागतो व तो दाव्याच्या कामी दाखल करून घेतला जातो.

कवळेकर, सुशील