बेल, प्येर : (१८ नोव्हेंबर १६४७ – २८ डिसेंबर १७०६). फ्रेंच तत्ववेत्ता. जन्म कार्ला- बेल या स्पॅनिश सरहद्दीजवळच्या एका फ्रेंच गावी. त्यांचे वडील प्रोटेस्टंट धर्मगुरू होते. त्यांच्या बालपणीचा काळ हा फ्रान्समधील प्रोटेस्टंटांच्या धार्मिक छळवणूकीचा काळ होता. बेल यांचे शिक्षण प्रथम एका कॅल्व्हिनपंथी शाळेत आणि नंतर एका जेझुईट महाविद्यालयात झाले. कॅथलिकपंथी प्राध्यापकांचे युक्तीवाद त्यांच्या बुद्धीला पटल्यामुळे ते पंथान्तर करून कॅथलिक बनले पण नंतर प्रोटेस्टंटपंथी युक्तीवाद पटल्यामुळ ते परत प्रोटेस्टंट, कॅल्व्हिनिस्ट बनले. कॅथलिक पंथ सोडून देणे हा त्याकाळी फ्रान्समध्ये गुन्हा होता. म्हणून ते फ्रान्स सोडून जिनीव्हाला गेले आणि तेथे त्यांनी धर्मशास्त्र व तत्वज्ञान या विषयांचे आपले शिक्षण पुरे केले.
ते १६७४ मध्ये गुप्तपणे फ्रान्सला परतले आणि पॅरिस व रूआन येथे खाजगी शिक्षक म्हणून वर्षभर राहिले. त्यानंतर सडॅन येथे सात वर्षे तत्वानाचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते विद्यालय बंद पडल्यामुळे हॉलंडमधील रॉटरडॅम येथील `एकोले इलक्ट्रे’ मध्ये १६८१ साली ते नोकरीला लागले. येथे त्यांनी १६८० च्या धुमकेतुविषयीचे एक `पत्र’ प्रसिद्ध केले. हाच बेल यांचा पहिला प्रकाशित ग्रंथ होय. व तो त्यांनी टोपणनावाने प्रसिद्ध केला. अंधश्रद्धेवर हल्ला करणे असणि अंधश्रद्धेची तरफदारी करणाऱ्या तार्कीक व तत्वज्ञानात्मक युक्तीवादांची चिक्त्सि करून त्यांचा फोलपणा उघड करणे, हे ह्या ग्रंथाचे उद्दिष्ट होते आणि बेल यांचे सर्वच भावी लेखणाचेही ते उद्दिष्ट राहिले. त्यांचे वडिल व भाऊ हे फ्रान्समधील धार्मिक छळाला बळी पडलेले पाहून धार्मिक सहिष्णूता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाला त्यांनी वाहून घेतले. रॉटरडॅम येथील आपले उर्वरीत जीवन अध्ययन व लेखनात त्यांनी घालविले. श्रद्धाळू, सनातनी प्रोटेस्टंट धर्मगुरूंच्या तसेच कॅथलिक धर्मगुरूंच्या दृष्टीने बेल यांची मते पाखंडी होती. त्यामुळे त्यांच्या लिखाणाभोवती वादंग माजले व १६९३ मध्ये त्यांना विद्यालयातून बडतर्फ करण्यात आले. ह्यानंतर बेल यांनी पुर्वीच हातात घेतलेल्या `ऐतिहासिक आणि चिकित्सक कोशा’ वर (Dictionnaire historique er critique) आपले सर्व लक्ष केंद्रित केले.
हा कोश बेल यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ होय. त्यांनी इतरही विपुल लेखन केले आहे आणि त्यातील काही टोपणनावाने केले आहे. शिवाय कडव्या सनातनी व१त्तीच्या कॅथलिक आणि प्रोटेस्टंट धर्मपंडितांच्या रोषापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी अनेकदा आपले लिखाण त्याचा कर्ता कोण आहे ह्याविषयी संभ्रम निर्माण होईल अशा रितीने प्रसिद्ध केले आहे. १६८० मध्ये त्यांनी धुमकेतुविषयी लिहीलेले पत्र टोपणनावाने प्रसिद्ध झाले. त्यात अंधश्रद्धा, असहिष्णूता, चुकीचे तत्वज्ञान आणि इतिहास ह्यांच्यावर परखडपणे टिका करण्यात आली आहे बेल यांच्या टिकेची ही सतत लक्ष्ये राहिली. १६८४ ते ८७ पर्यंत बेल यांनी Nouvelles de la republique des lettres ह्या वैचारीक समस्यांना वाहिलेल्या नियतकालीकांचे संपादन केले आणि त्यात नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या महत्वाच्या वैचारीक साहित्याचा चिकित्सक परामर्श घेणारे अनेक लेख प्रसिद्ध केले. ह्यामुळे एक प्रमुख विचारवंत म्हणून त्यांना मान्यता मिळाली व लायप्टिनस्, लॉक, मालब्रांश, रॉबर्टबॉइल, आंत्वान आर्नो इ. त्या काळच्या मान्यवर विचारवंतांशी त्यांचे संबंध जुळून आले. १६८६ मध्ये त्यांनी Commentaire philosophique sur ces paroles de jesus Chiriost “Constrains-les d’entrer” (म. शी. त्यांना प्रवेश घ्यायला भाग पाडा ह्या येशू ख्रिस्ताच्या शब्दांवरील तत्वज्ञानात्मक भाष्य) हा ग्रंथ पेसिद्ध केला. त्याच्यात संपूर्ण धार्मिक मतस्वातंष्य असावे आणि ख्रिस्तीतर पंथ धरून सर्व धार्मिक पंथाच्या अनुयायांना सहिष्णुतेने वागवावे ह्या भूमिकेचे समर्थन केले.
बेल यांचा उपरोल्लेखीत कोश १६९५-९७ ह्या वर्षात दोन खंडात प्रसिद्ध झाला. ह्या ग्रंथाने धार्मिक आणि वैचारिक वर्तुळात मोठीच खळबळ माजली. प्रॉटेस्टंट व कॅथलिक ह्या दोन्ही धर्मपीठांनी त्याचा निषेध केला. कॅथलिक चर्चने त्याच्यावर बंदी घातली. तर ऍम्स्टरडॅम येथील प्रोटेस्टंट चर्चने, बेल यांनी मांडलेल्या काही मतांचे स्पष्टीकरण करावे असे त्यांना सांगितले. ही विनंती बेल यांनी मान्य केली. कोशाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्याचे त्यांनी ठरविले आणि तिच्यात स्पष्टीकरणात्मक असे अनेक लेख समाविष्ट केले, पूर्वीचे काही बदलले आणि १७०२ मध्ये ही अंतिम आवृत्ती प्रसिद्ध केली. ह्यानंतर त्यांचा काळ मुख्यतः कोशामुळे माजलेल्या वादंगामध्ये भाग घेऊन आक्षेपकांना उत्तरे देण्यात गेला. Enteretiens de Maxime et de The’ miste (१७०७- म. शी. माक्सिम आणि थिमिस्टे यांच्यामधील संवाद) हा शेवटचा ग्रंथ पूर्ण करीत असतांना रॉटरडॅम येथे त्यांचा मृत्यु झाला.
बेल यांचा कोश त्यांच्या नावाप्रमाणेच ऐतिहासिक व चिकित्सक आहे. तो टॅलमुड (तलमूद ) च्या शैलीत रचला आहे. त्यातील नोंदी मुख्यतः ऐतिहासिक पुरूषांविषयी आहेत. नोंदीत प्रथम एका ऐतिहासिक पुरूषाचे चरित्र संक्षेपाने देण्यात येते आणि नंतर त्याच्या अनुशंगाने उपस्थित होणाऱ्या धार्मिक्, नैतिक, तत्वज्ञानात्मक, एतिहासिक, वैज्ञानिक समस्यांचा ऊहापोह करणाऱ्या टिपा चरित्रलेखनाखाली देण्यात येतात. या टिपांवरही टीपा देण्यात येतात. अनेकदा एखाद्या फारशा महत्वाच्या नसलेल्या व्यक्तीच्या चरित्राखाली अत्यंत गंभीर आणि जटील समस्येचा विस्तृतपणे परामर्श घेण्यात आलेला असतो. ख्रिस्ती मत कितपत विवेकानुसारी आहे हा प्रश्न, विश्वातील दुरीतांचा प्रश्न, आत्म्याच्या अमरत्वाचा प्रश्न, शरीर व मन यांच्यामधील संबंधाचा प्रश्न तसेच, लॉक, न्यूटन, लायप्निट्स इ. समकालिन तत्ववेत्ते व वैज्ञानिक यांच्या तत्वज्ञानातून उद्भवणाऱ्या समस्या यांचे मूलगामी विवेचन ह्या पद्धतीने कोशातील नोंदीत करण्यात आलेले आहे. ह्याबरोबरच हरतऱ्हेच्या मनोरंजक आणि काही खमंग अशा ऐतिहसिक आणि चरित्रविषयक माहितीने कोश खच्चून भरला आहे. यामुळे तो लोकप्रिय आणि प्रभावी ठरला पण त्याच्या अव्यवस्थित रचनेमुळे एक संदर्भ गंरथ हे त्याचे स्थान फार दिवस टिकू शकले नाही. तथापी या कोशाचे महत्व त्यारच्रू तत्वज्ञानात्मक भागात आहे. ह्यात बेल यांनी जे विवेचन केले आहे, युक्तिवाद मांडले आहेत व निष्कर्ष काढले आहेत त्यांचा प्रभाव व्हॉल्तेअर, ह्युम, गिबन, दीद्रो यांसारख्या विचारवंतांवर पडला. कोशात उपलब्ध असलेल्या माहितीचा व युक्तिवादांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आढळतो. शिवाय कोशात ग्रंथीत केलेल्या अनेक चटकदार कथांनी पोप, फील्डिंग इ. कवी, कादंबरीकार आणि नाटककार यांना कथानके पुरविली आहेत.
आधुनिक युरोपच्या वैचारिक व सांस्कृतिक घडणीत बेल यांच्या कोशाने महत्वाची भूमिका बजावली आहे, यांत शंका नाही.
तत्वज्ञानः बेल संशयवादी होते. त्यांनी सेक्स्टस इंपीरिकस ह्या प्राचीन आणि रोदेरिगो आरिआगा ह्या स्पॅनिश स्कोलॅस्टिक तत्ववेत्यांपासून स्फूर्ती घेतली आहे. [→स्कोलॅस्टिक तत्वज्ञान]. बेल यांच्या संशयवादाचा गाभा म्हणून पुढील सिध्दांत मांडता येईल : मानवी अनुभवाच्या कोणत्याही क्षेत्राचा – उदा., निसर्गज्ञान, नीती, धर्म इ.- अर्थ लावण्यासाठी निर्माण करण्यात आलेली कोणतीही बौध्दिक रचना फसलेली असते असे आढळून येते तिची चिकित्सा केल्यानंतर ती आत्मविसंगत, अपुरी आणि तर्कवितरीत असल्याचे दिसून येते. विघातक आणि खंडनपर युत्किवाद रचण्यात बेल अतिशय कुशल होते आणि हे शस्त्र त्यांनी पारंपारीक खिस्ती धर्मशास्त्र आणि `नवीन’ विज्ञान व तत्वज्ञान ह्या दोघांवरही चालविले. उदा., सबंध विश्वाचा निर्माता व नियामक असा एक ईश्वर नसून, जे जे मंगल आहे त्यात्याचा निर्माएाकर्ता असलेला एक देव व जे अमंगल आहे त्या सर्वांचा निर्माणकर्ता असलेला दुसरा देव असे विश्वात दोन देव आहेत असा `मॅनीकिअन’ सिध्दांत आहे. एकेश्वरवादी ख्रिस्ती देवशास्त्रापेक्षा मॅनिकिअन सिध्दांत आपल्या नैतिक अनुभवाचे अधिक समाधानकारक स्पष्टीकरण करतो पण त्याची अधिक परीक्षा केल्यावर तोही आत्मविसंगत असल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद बेल करतात. नीतीला धार्मिक श्रध्देचा आधार आवश्यक नसतो, व्यक्तीची नीती हा तिच्यावर झालेला संस्कार, सामाजिक रूढी, तिच्या स्वतःच्या भावना व मनोवृत्ती आणि ईश्वरी अनुग्रह यांसारख्या अनेक घटकांचा परीपाक असतो अनेक नास्तिक व्यक्ती अत्यंत शुद्ध व उन्नत अशा नैतिक चारिष्याच्या होत्या, तर अनेक उच्चस्थानी असलेल्या धर्मगुरूंचे आचरण अतिशय अनैतिक व लंपट होते, हे त्यांनी भरपूर पुराव्यानिशी सिद्ध केले.
ह्या युक्तिवादांचा रोख ख्रिस्ती धर्मशास्त्राविरूद्ध होता. पण ह्याचबरोबर प्लेटो व ऍरिस्टॉटल ह्या प्राचिन आणि देकार्त, हॉब्ज, स्पिनोझा, लायप्निट्स, लॉक, न्युटन इ. आधूनिक तत्ववेत्ते व वैज्ञानिक यांच्या तत्वज्ञानात्मक आणि वैज्ञानिक उपपत्तींची चिकित्सा करून त्यांतील विसंगतीही त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. विशेषतः नवीन विज्ञानाचे पुरस्कर्ते भौतिक वस्तूंच्या गुणांमध्ये जो प्राथमिक गुण – आकार, वनज, गती इ. – आणि दुय्यम गुण-रंग, वास इ. – असा भेद करीत, त्याच्यातील तार्किक अडचणी दाखवून देऊन ह्या विज्ञानाच्या एका मुलतत्वावरच त्यांनी हल्ला केला. शाट्स्बरी आणि मॅंडेव्हिल तसेच बर्क्ली व ह्यूम ह्या तत्ववेत्यांवर बेल यांच्या ह्या युक्तीवादाचा प्रभाव पडलेला आढळतो.
मानवी बुद्धीच्या दुबळेपणापासून बेल जो निष्कर्ष काढतात तो असा, की धार्मिक सत्ये ही बौद्धिक युक्तीवादांनी सिद्ध करता येत नाहीत, ती श्रद्धेनेच स्विकारावी लागतात. हा बुद्धीनिरपेक्ष श्रद्धावाद हाच ⇨सेंट पॉनपासून ⇨ जॉन कॅल्व्हिनपर्यंतच्या ख्रिस्ती धर्मशास्त्रवेत्यांच्या शिकवणीचा गाभा आहे, असे बेल यांचे म्हणणे आहे. बेल हे सश्रद्ध ख्रिस्ती होते की नाही आणि असले तर ह्या श्रद्धेचा आशय काय होता, हे प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहणार आहेत. पण ते स्वतःला कॅल्व्हिनपंथी ख्रिस्ती म्हणवीत आणि तसे आचरण ही करीत. ईश्वरावर त्यांची वैयक्तिक श्रद्धा होती असे मामनायला काही आधारही आहे पण महत्वाची गोष्ट ही, की बेल यांनी साधलेल्या बौद्धिक कामगिरीमागची त्यांची स्वतःची उद्दिष्टे काहीही असोत, प्रत्यक्षात प्रबोधनकाली धर्मविरोधी, विज्ञाननिष्ठ व पाखंडी वैचारीक वातावरण निर्माण करण्याजत तिचा मोठा हातभार लागला होता.
पहा : संशयवाद ज्ञानोदय.
संदर्भ :1. Robinson, Howard, Bayle the Skeptic, New York, 1931.2. Sandberg, K. C. At the Crossroads of Faith and Reason Tucson, Ariz, 1966.
रेगे, मे. पुं.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..