बेल : (हि. विलीगु. वीलीक. बेला. वेलपत्रीसं.बिल्व, त्रिपत्रक,शिवद्रुमइं. वेलट्री, बेंगॉल क्विन्स, इंडियन क्विन्स लॅ. ईगल मार्मेलॉस कुल-रूटेसी). ह्या मध्यम आकारमानाच्या (उंची ९-१२ मी.) पानझडी वृक्षाचे मूलस्थान उ. भारत असून त्याचा प्रसार भारतात सर्वत्र रूक्ष ठिकाणी आहे. बेलाच्या वंशात (ईगल) एकूण तीन जाती असून त्यांपैकी भारतात फक्त एकच आढळते. उपहिमालयात झेलमच्या पूर्वेकडच्या प्रदेशात तसेच श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड पाकिस्तान इ.ठिकाणीही हा आढळतो. देवळाच्या आसपास ह्याची लागवड करतात. हिंदू लोकांनी तो पवित्र मानला असून श्री शिवाच्या पूजेत त्याला महत्वाचे स्थान आहे. ह्याला यज्ञीय वृखाचे स्थान असून वैदिक वाङृमयात ह्याचा उललेख आला आहे. पाणिनीची अष्टाध्यायी , तसेच महाभारत, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता  आणि इतर काही संस्कृत ग्रंथांतही याचा उल्लेख आढळतो. याच्या खोडाचा घेर सु. ०.९-१.५ मी. पर्यंत असून साल जाड, फिकट राखी रंगाची, मऊ बुचासारखी असते व तिचे खवले निघून जातात. फांद्यांवर पानांच्या बगलेत सरळ बळकट काटे असून पाने संयुक्त, त्रिदली, क्वचित पचदली, सुगंधी व एकाआड एक असतात त्यांमध्ये बाष्पनयाल (उडून जाणाऱ्या) तेलाचे सूक्ष्म ठिपके दिसतात. मार्च-एप्रिलमध्ये ता झडतात व नवी पालवी उन्हाळ्याच्या शेवटी येते. फुले मध्यम आकारमानाची,

बेल: (1) फुलांसह शाखा, (2) फुलाचा उभा छेद, (3) बेलफळाचा अर्धा भाग, (4) लवदा बी.

२-५ सेंमी. व्यासाची, हिरवट पांढरी, सुगंधी व पानांच्या बगलेतील मंजऱ्यांवर मे ते जुलै महिन्यापर्यंत येतात. संवर्त गळून पडणारा व लवदार पाकळ्या सुट्या, लांबट व जाड असून त्यांवर दाट ठिपके असतात. केसरदले ३०-४०, किंजपुट ऊर्ध्वस्थ, सु. ११ कप्प्यांचा व प्रत्येक कप्प्यात अनेक बीजके [→फूल]. घनकवची (जाड सालीचे) मृदूफळ गोलसर, ५-१२ सेंमी. व्यासाचे, काहीसे लांबट, कठीण, बुळगुळीत, करडे किंवा पिवळे असून पावसाळ्यात येते व डिसेंबरात पिकते. त्यातील घट्‌ट, गोड, सुवासिक, नारिंगी व श्लेष्मफल (बुळबुळीत) मगजात (गरात) लांबट-आयात व खूप बारीक लोकरीसारखी लव असलेल्या किंचीत चपट्या बिया असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रूटेसीत (सताप कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. नव्याने तोडलेले लाकूड कठिण, पिवळट पांढरे किंवा करडे व ताजेपणी सुगंधी असून त्याला चांगली झिलई करता येते. घरबांधणी, बैलगाड्या, शेतीची अवजारे, कोरीवकाम,  उसाचे चरक, तेलघाणे, मुसळे, हत्यारांच्या मुठी व दांडे, फण्या इ. वस्तूंकरीता ते उपयोगात आहे. होमहवनाकरिता ते पवित्र मानले आहे.

पक्व फळीतील मगज सुगंधी, शीतकर (थंडावा देणारा) व सारफ असतो त्याचे सरबत जुनाट मलावरोध व अग्निमांद्य यांवर देतात. अपक्व फह स्तंभक (आकुंचन पावणारे), पाचक, दीपक, (भूक वाढविणारे) असल्याने अतिसार व आमांशात  गुणकारी असते वेलफळाचा मुरंबा त्या दृष्टीने उपयुक्त असतो. कोवळ्यय फळांचे लोणचे घालतात. उ. बिहारातील पगडा विभागातील बेलफळे पातळ सालीची असून त्यांचा मगज स्वादिष्ट असतो पंजाबात फळांच्या मगजामध्ये दूध, साखर व कधी चिंचही घालून सरबत करतात. धातूपुष्टतेस गाईच्या दुधात बेलाच्या सालीचा रस जिऱ्याची  पूड टाकून घेतात. धातू पडत असल्यास पुष्कळशी पाने पाण्यात वाटून त्यात जिरे, खडीसाखर टाकून घेतात. बहिरेपणावर गोमूत्रात बेलफळ वाटून घेतात कढवितात व कानात घालतात. मगज कपउ धुण्यास वापरतात. फळांच्या कवचापासून पिवळे रंगद्रवय मिळते. कच्च्या फळांचे कवच त्रिफळा चूर्णाबरोबर कफलिको छपाईत उपयुक्त असते. कवचापासून `मार्मेले’ हे बाष्पनशील तेल काढतात. कोवळ्या फळांत मगजाबरोबर श्लेष्मल द्रव्य असते त्याचा उपयोग डिंकासारखा होतो. पाण्यात बनविलेल्या रंगांत हे द्रव्य मिसळून चकाकी आणता येते. इमारतीच्या चुन्यात मगज मिसळून तो चिकट व चिवट करतात आणि विहीरीकरिता वापरतात. खोडापासून उत्तम डिंक मिळतो. फांद्या व पाने गुरांना खाऊ घालतात. फुलांपासून सुगंधी द्रव्य मिळते.

फळांमध्ये `मार्मेलोसीन’ हे क्रियाशील घटकद्रवय असून ते सारक व मूत्रल (लघवी साफ करणारे) असते त्यामुळे थोडा निद्रानाश होतो व घाम कमी येतो अधिक प्रमाणात घेतल्यास हृदय क्रिया मंदावते. बेलफळात ४-६ टक्के साखर मगजात ९ टक्के व सालीत २० टक्के टॅनीन असते. बियातून ११.९ टक्के कडू तेल मिळते, ते रेचक असते. मुळाची साल व कधी खोडावरचीही साल पाळीच्या तापात देतात, तिच्या `अंबेलिफेरॉन’ हे द्रवय असते. मुहाची साल मत्स्य विष आहे. पानांत बाष्पनशील तेल असते. फळातील मगज काढून टाकून कवचाचा उपयोग डबीप्रमाणे करतात. कोवळी लहान फळे रूद्राक्षाबरोबर माळांमध्ये घालतात.

 

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात उष्ण भागात अनेक ठिकाणी बेलाची झाडे लागवडीत आहेत. उत्तर भारतातही विशेष लागवडीत आहेत. सकस व निचऱ्याची जमीन याची चांगली वाढ होण्यास आवश्यक असते बीयांपासून बनविलेली रोपे लावुन व कधी कधी मुळांना फुटलेल्या धुमाऱ्यांपासुनही अभिवृद्धी (लागवड) करतात.

संदर्भ : 1. Dastur, J.F Medicinal plants of India and Pakistan, Bombay, 1962.

             2. Jian, S.K Medicinal plants, New Delhi, 1968.

             3. McCann, C.100 Beautiful Trees of india, Bombay, 1959

             ४. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४. ५. पदे, शं.दा. वनौषधी गुणादर्श, मुंबई, १९७३.

जमदाडे, ज. वि परांडेकर, शं. आ.