बेरियम : धातुरुप मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Ba अणुक्रंमाक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ५६ अणुभार १३७.३४ आवर्त सारणीतील (इलेक्ट्रान रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील) २अ गटातील मूलद्रव्य नैसर्गिक समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) द्रव्यंमानांक (अणुकेद्रांतील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) १३०,१३२,१३४,१३५,१३६,१३७,१३८ विद्युत् विन्यास (अणुकेंद्राभोवतील विविध कक्षांतील इलेक्ट्रॉनांची संख्या ) २, ८,१८, १८, ८, २ संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) २ वि.गु. ३.५ वितळबिंदू ८५०० से. उकळबिंदू १,६४०० से., रंग रुप्यासारखा पांढरा ही धातू वर्धनशील (पत्रे तयार करता येणारी) व तन्य (तारा काढता येणारी) आहे. भूकवचातील तिचे प्रमाण ०.०४% असून त्यातील मूलद्रव्यांच्या विपुलतेच्या दृष्टीने तिचा अठरावा क्रमांक लागतो.
गुंत्स यांनी १९०६ मध्ये बेरियम ऑक्साइड त्याच्या वजनाच्या एक दशांश ॲल्युमिनियम धातूच्या चूर्णाबरोबर १,२००० से. ला तापवून बेरियम धातू मिळविली. या विक्रियेस ‘थर्माइट पद्धती’ असे म्हणतात. [⟶ थर्माइट]. १९२४ साली डॅनर यांनी या पद्धतीत सुधारणा केली. बेरियम ऑक्साइड व १०% बेरियम पेरॉक्साइड यांचे मिश्रण निर्वात लोखंडाच्या नलिकेत ॲल्युमिनियम धातूच्या चूर्णाबरोबर १,२००० से. ला तापविले असता बेरियम ऑक्साइडाचे ⇨ क्षपण होते व बेरियम धातूची वाफ तयार होते. त्या वाफेचे संद्रवण (द्रवीकरण) करून मग धातू धन स्थितीत मिळते. तिची शुद्धता ९८.८% इतकी असते. सी.मॅटिग्नॉन यानी १९१३ मध्ये बेरियम ऑक्साइड सिलिकॉनाबरोबर निर्वात पोलादी नळीत १.२००० से. पर्यंत तापवून बेरियम धातू मिळविली. मॅग्नेशियमाने बेरियम ऑक्साइडचे क्षपण होऊन बेरियम सब-ऑक्साइड मिळते, बेरियम धातू मिळत नाही.बेरियमाचे व्यापारी उत्पादन वितळलेल्या बेरियम क्लोरइडाच्या विद्युत् विच्छेदनाने किंवा थर्माइट पद्धतीने विजेने तापविलेल्या निर्वात भट्टीत करतात.
गुणधर्म : बेरियम फार विक्रियाशील आहे. तिची पूड हवेत पेट घेते. हवेमध्ये बेरियम धातूच्या पृष्ठभागावर तिच्या हायड्रॉक्साइडाचा थर तयार होतो व त्यामुळे तिचे पृष्ठ मलिन होते. बेरियम तापविली असता तिचा नायट्रोजन, क्लोरीन, गंधक, फॉस्फरस, हायड्रोजन यांच्याशी सरळ संयोग होऊन त्यापासून अनुक्रमे बेरियम नायट्राइड(Ba3N2), बेरियम क्लोराइड(BaCl2), बेरियम सल्फाइड(BaS), बेरियम फॉस्फाइड (Ba3P2), व बेरियम हायड्राइड (BaH2) अशी संयुगे तयार होतात. वितळलेल्या स्थितीत बेरियम लोखंड सोडून बहुतेक सर्व धातूशी संयोग पावते. थंड पाण्याबरोबर विक्रिया होऊन बेरियम हायड्रॉक्साइड[Ba(OH)2] तयार होते. बेरियमावर क्षारांची (अल्कलींची) विक्रिया होत नाही. सौम्य अम्लांची विक्रिया होऊन लवणे तयार होतात. अमोनियाबरोबर बेरियम अमोनिया मिळतो. बेरियम अमोनिया ६०० से. च्यावर तापवले असता किंवा २६० से. ला तापवलेल्या बेरियमावरून अमोनिया वायू नेल्यास बेरियम अमाइड [Ba(NH2)2] मिळते. बेरियम अल्कोहॉलाचे अपघटन करते व बेरियम एथॉक्साइड तयार होते.
उपयोग : रेडिओतील निर्वात नलिकांच्या उत्पादनात बेरियमाचा उपयोग होतो. नलिकांचे संपूर्ण निर्वातीकरण केल्यावर त्यांत राहणारी लेशमात्र वायुरुप मूलद्रव्ये काढून टाकण्यासाठी बेरियमाचा उपयोग होतो. बेरियमाच्या पुष्कळ मिश्रधातू बनवितात. यांपैकी शिसे, कॅल्शियम व बेरियम यांपासून बनविलेली फ्रारी ही मिश्रधातू महत्त्वाची असून ती धारव्यासाठी (यंत्रातील सरकत्या वा फिरत्या भागाला देण्यात येणाऱ्या आधारासाठी बेअरिंगासाठी) वापरतात. बेरियमनिकेल मिश्रधातू तापविली असता तिच्यापासून सुलभतेने इलेक्ट्रान उत्सर्जित होतात म्हणून तिचा उपयोग रेडिओ नलिकांमध्ये (एंजिनातील स्फोटक मिश्रण पेटविण्यासाठी विद्युत् ठिणगी पाडणाऱ्या साधनाच्या) अग्रांसाठी करतात. तांब्याच्या शुध्दीकरण प्रक्रियेत ऑक्सिजन काढून टाकण्याकरिता बेरियमयाचा उपयोग करतात.
संयुगे : सर्व बेरियम संयुगे बराइट व विदेराइट या दोन खनिजांपासून तयार करता येतात. यापैकी विदेराइट भारतात सापडत नाही पण बराइट विपुल आढळते. बेरियम कार्बोनेट व बेरियम सल्फाइड ही संयुगे भारतात थोड्याफार प्रमाणात तयार होतात. बाकीची गरज भागविण्यासाठी ही संयुगे आयात करावी लागतात. बेरियमाची इतर संयुगेही आयात करण्यात येतात.
बेरियम ऑक्साइड : (BaO). याचा वितळबिंदू १,९२३० से. व उकळबिंदू सु. २,०००० से आहे. वि.गु. ५.७२ आहे. हे बेरियम कार्बोनेटाच्या अपघटनाने तयार करतात. याकरिता बेरियम कार्बोनेट हे कार्बन काजळीबरोबर अगर डांबराबरोबर मिसळून ते मिश्रण विद्युत् ज्योत भट्टीत अगर विटांच्या भट्टीत उच्च तापमानाला तापवितात. दोन्ही कृतींत तयार झालेले बेरियम ऑक्साइड चांगल्या सच्छिद्रावस्थेत मिळत असल्याने ऑक्सिजनाच्या विक्रियेने त्याचे बेरियम पेरॉक्साइड बनविणे सुलभ होते.बेरियम ऑक्साइडाचा मुख्य उपयोग बेरियम पेरॉक्साइड व हायड्रॉक्साइड तयार करण्यासाठी व थोडा उपयोग काचनिर्मितीत होतो.
बेरियम पेरॉक्साइड : (BaO2). हे बेरियम ऑक्साइडाची ऑक्सिजनबरोबर विक्रिया केल्याने मिळते. पूर्वी ऑक्सिजन तयार करण्याच्या ब्रिन यांच्या पद्धतीत बेरियम ऑक्साइड ७००० से. ला दाबाखाली तापवून बेरियम पेरॉक्साइड तयार करीत व दाब कमी करून ऑक्सिजन मिळवीत. याचा उपयोग हायड्रोजन पेरॉक्साइड (H2O2) करण्यासाठी हल्लीपेक्षा पूर्वी जास्त होत होता. याच्यावर विरल सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया होऊन हायड्रोजन पेरॉक्साइड तयार होते. बेरियम पेरॉक्साइड ऑक्सिडीकारक [→ ऑक्सिडीभवन] असल्याने, तसचे बेरियमाच्या हिरव्या रंगाचा प्रकाश देण्याच्या गुणधर्मामुळे शोभेच्या दारूकामात त्याचा थोडा उपयोग होतो.
बेरियम हायड्रॉक्साइड : [Ba(OH)2] औद्योगिक उत्पादनात बेरियम हायड्रॉक्साइड ज्या स्फटिकरूपात मिळते त्यात पाण्याचे आठ रेणू [Ba(OH)2.8H3O] असतात व ते ७८० से. तापमानाला आपल्या स्फटिकजलात वितळते. सजल बेरियम हायड्रॉक्साइड पाण्यात फार विद्राव्य असून तो विद्राव (याला बरायटा वॉटर म्हणतात) तीव्र क्षारधर्मी असतो व त्यात कार्बन डाय-ऑक्साइड शोषला जातो. ते विषारी आहे. याचे व्यापारी उत्पादन हेवी स्पारपासून करतात. हेवी स्पार व थोडा कोळसा एकत्र तापवून प्रथम बेरियम सल्फाइड मिळवितात व ते दमट कार्बन डाय-ऑक्साइडामध्ये तापवून बेरियम कार्बोनेट तयार होते. त्याचे पाण्याच्या अतितप्त वाफेने अपघटन करून बेरियम हायड्रॉक्साइड मिळवितात. बेरियम हायड्रॉक्साइडाचे स्फटिक तयार करण्याच्या पद्धतींपैकी सर्वसाधारणपणे उपयोगात असलेल्या पद्धतीत बेरियम ऑक्साइड गरम पाण्यात विरघळवून जादा ऑक्साइड खाली बसू देतात. अविद्राव्य पदार्थ गाळून व हायड्रॉक्साइडाचा गरम विद्राव थंड करून स्फटिक बाजूला करतात.
बेरियम हायड्रॉक्साइडाचा उपयोग जास्त तापमानाला टिकणाऱ्या ग्रीजकरिता (घनरुप वा अर्धघननरुप वंगणाकरिता) लागणारा बेरियम साबण तयार करण्यासाठी वाढत्या प्रमाणावर होत आहे. तसेच विटंच्या धंद्यात मळी काढण्याकरिताआणि बेरियमाची इतर संयुगे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बरायटा वॉटरचा वायुविश्लेषणात (विशेषतः कार्बन डायऑक्साइडाचे द्रव्यमान निश्चित करण्याकरिता) उपयोग होतो.
बेरियम कार्बोनेट : (BaCO3). अवक्षेपित (न विरघळणाया साक्याच्या रूपात तयार केलेले) बेरियम कार्बोनेट हे एक महत्त्वाचे संयुग आहे. बेरियम सल्फाइडाच्या विद्रावात कार्बन डाय-आक्साइड वायू सोडून अगर त्याची सोडियम कार्बोनेटाबरोबर विक्रिया करून ते तयार करतात. ही सफेद पूड उच्च तापमानाला (१,३६१०) से. अपघटन पावते.
बेरियम कार्बोनेट विषारी असून पाण्यात जवळजवळ अविद्राव्य असले, तरी मानव व इतर प्राण्यांच्या पोटातील अम्लांमुळे विद्राव्य होत असल्याने त्याचा तीव्र विषारी परिणाम होतो. उदंराकरिता विष म्हणूनही त्याचा उपयोग होतो.
बेरियम सल्फेट : (BaSO4) खनिजरूपातील बेरियम सल्फेट म्हणजे बराइट शुद्ध स्वरूपात रंगहीन असते. त्याचा वितळबिंदू १,५८०० से., वि.गु. ४.५ पाण्यात अविद्राव्य (४ लक्ष भाग पाण्यात १ ग्रॅम विरघळते )असून ते संहत (विद्रावातील प्रमाण जास्त आहे अशा) सल्फ्यूरिक अम्लात विद्राव्य आहे. बेरियम सल्फेट खनिज व अवक्षेपित यादोन्ही रूपांत वापरतात.
बराइटाचा मोठा उपयोग रंगाच्या धंद्यात त्याच्या झिंक सल्फाइड व झिंक ऑक्साइड यांच्या मिश्रणाबरोबर होणाऱ्या ‘लिथोपोन’ या रंगद्रव्याकरिता अगर टिटॅनियम ऑक्साइडाबरोबर मिश्रण करून होतो. बहुतेक सर्व बेरियम संयुगे त्यपासूनच तयार करतात. २० मेश जाडीचे चूर्ण [⟶ चाळणे] काचनिर्मितीत वितळबिंदू कमी करण्याच्या दृष्टीने वापरतात पंरतु चागंल्या काचनिर्मितीत मात्र अवक्षेपित सल्फेट वापरण्यात येते. बराइटाच्या इतर उपयोगांकरिता ‘बराइट’ ही नोंद पहावी.
अवक्षेपित बेरियम सल्फेटाला ‘Blanc fixe’ -सदा सफेद- असे सर्वसाधारणपणे संबोधतात विद्राव्य बेरियम लवणावर सल्फ्यूरिक अम्ल किवा इतर धातूंच्या सल्फेटाच्या विद्रावाची विक्रिया केली असता बेरियम सल्फेट अवक्षेप रूपात मिळते. कोरडे अवक्षेपित बेरियम सल्फेट गंधरहित सफेद पांढऱ्या भुकटीच्या रूपात असून ते १,६००० से. च्या वरील तापमानास अपघटन पावते. ते तयार करण्याची कृती बेरियम कार्बोनेटाच्या कृतीसारखीच आहे. फक्त या कृतीत सोडियम कार्बोनेटाऐवजी सोडियम सल्फेट (सॉल्ट केक ) वापरतात. अवक्षेपित कणांच्या आकारावर त्याचा वापर अवलंबून असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते व ही गोष्ट विक्रियेची गती, तयार करण्याकरिता घेतलेल्या रसायंनाची संहती व तापमान यांत इष्ट ते फरक करून साधता येते. सल्फेटाची सफेदी त्यातील काही जड धातूंच्यामुळे बिघडण्याचा संभव असल्याने सुरुवातीचे संयुग शुद्ध करण्याची खबरदारी घेणे इष्ट असते.
याचा मुख्य उपयोग रंगद्रव्य पूरक म्हणून आहे. छपाईच्या शाईला दाटपणा येण्यासाठी, लिनोलियम व मेण कापड तयार करण्याच्या कृतीत आणि विद्युत् घटमालेतील पट्ट्यांत एक पूरक म्हणूनही त्याचा उपयोग करण्यात येतो. विद्राव्य बेरियम लवणे अत्यंत विषारी आहेत. बेरियम सल्फेट पाणी व अम्ले यात अविद्राव्य व क्ष-किरणांना अपारदर्शक असल्याने त्याचा उपयोग पोटातील विकृतीच्या निदानासाठी करण्यात येणाऱ्या क्ष-किरण चित्रणात करतात. याकरिता विशेष काळजीपूर्वक तयार केलेले बेरियम सल्फेट(पाणीमिश्रित बेरियम सल्फेट व थोडी शर्करा बेरियम अशन) पोटात देतात.
बेरियम सल्फाइड : (BaS). हे पाण्यात विद्राव्य असून पाण्याबरोबरील त्याच्या विक्रियेने बेरियम हायड्रॉक्साइड व बेरियम हायड्रोसल्फाइड [Ba(SH)2] ही संयुगे तयार होतात.
बराइटापासून तयार केलेल्या बेरियम सल्फाइडाला ‘ब्लॅक अशॅ’ असे म्हणतात आणि ते २०-१०० मेशचे बराइट व कोळसा उच्च तापमानाला तापविल्याने मिळते. याचा मुख्य उपयोग बेरियम संयुगे करण्याच्या कामी होतो. अल्प प्रमाणात त्याचा उपयोग प्रस्फुरक रंगाकरिताही करतात.
बेरियम क्लोराइड : (BaCl2.2H2O). हे रंगहीन स्फटिकी लवण पाण्यात विद्राव्य असून विषारी आहे. त्याची चव कडू असते. १००० से. ला त्यातील स्फटिकजल निघून जाते व ९६०° से.ला ते वितळते कॅल्शियम व स्ट्रॉंशियम क्लोराइड याप्रमाणे ते बाष्पशोषक नाही. विदेराइटावरील विरल हायड्रोक्लोरिक अम्लाच्या विक्रियेने ते मिळते. तसेच बेरियम सल्फाइडाबरोबर हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया केल्याने ते तयार होते. दुसऱ्या एका कृतीत बराइट,लोणारी कोळशाची पूड व चुनखडी कॅल्शियम क्लोराइडाच्या ५०% विद्रावाबरोबर मिसळून ते मिश्रण सहा तास ८००°- ८५०° से. तापमानाला परावर्तन भट्टीत (कमी उंचीवरील छतावरून परावर्तित होणाऱ्या उष्णतेचा उपयोग करणाऱ्या भट्टीत) तापवितात. वितळलेले मिश्रण पाण्याने धुवून घेतात. बेरियम क्लोराइड विद्राव्य असल्याने ते गाळून घेतात. स्वच्छ विद्रावातील विद्राव्य सल्फाइड नाहीसे करण्याकरिता त्यात हायड्रोक्लोरिक अम्ल अगर क्लोरीन घालतात. विद्राव थंड केल्यावर अशुद्ध बेरियम क्लोराइड स्फटिकरूपात बाहेर पडते. ते पुन्हा स्फटिकीकरण करून शुद्ध करण्यात येते.
बेरियम क्लोराइडाचा उपयोग बेरियम सल्फेट तयार करण्याकरिता, छायाचित्रणाचे कागद तयार करण्यात व चामडे कमावण्यासाठी आणि रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेत विक्रियाकारक म्हणून होतो, लोखंडाला पृष्टीय कठिनता आणण्याकरिता लागणाऱ्या मिश्रणात, तसेच मॅग्नेशियम धातूच्या निर्मितीत अभिवाह (कच्च्या रूपातील धातू वितळविताना तयार होणाऱ्या द्रवाचा पातळपणा वाढविण्यासाठी व मलद्रव्ये धातुमळीच्या रूपात निघून जाण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ) म्हणूनही त्याचा उपयोग करतात. दाहक कॉस्टिक सोड्याच्या निर्मितीत खाऱ्या पाण्यातील सल्फेट काढून टाकण्यासाठी त्याच्या भारतात मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो.
बेरियम क्लोरेट : [Ba(ClO3)2].बेरियम क्लोराइडाच्या विद्युत् विच्छेदनाने हे तयार करतात. याचा उपयोग शोभेचे दारूकाम, स्फोटक द्रव्ये, कापड उद्योगात रंगबंधक म्हणून आणि इतर क्लोरेटे बनविण्यास होतो.
बेरियम नायट्रेटचा शोभेच्या दारूकामात हिरव्या रंगाकरिता, प्रक्षेपरेखी गोळ्यांत (मागील बाजूस बसविलेली दारूच्या मिश्रणाची गुलिका पेटल्यावर निर्माण होणाऱ्या प्रकाशामुळे प्रक्षेप मार्ग प्रकाशरेखारूपाने दिसणाऱ्या गोळ्यांत) तसेच प्रस्फोटक म्हणून उपयोग होतो.
बेरियम क्रोमेट : (लेमन क्रोम किंवा क्रोमयलो, BaCrO4). ही पिवळ्या रंगाची अविद्राव्य अशी पुड असते. याचा रंगात उपयोग होतो. बेरियमच्या कुठल्याही विद्राव्य संयुगाच्या विद्रावात पोटॅशियम क्रोमेटाचा (K,CrO4) विद्राव टाकल्यास हे तयार होते. ह्याचा उपयोग रंग, चिनी मातीची भांडी व सुरक्षित आगकाड्या या उद्योगांत होतो.
बेरियम टिटानेट : (BaTiO8). याचा ⇨ऊर्जापरिवर्तक साधनांत चांगला उपयोग होत असल्याने हे एक महत्त्वाचे संयुग आहे. बेरियम कार्बोनेट व टिटॅनियम डाय-ऑक्साइड एकत्र दळून भट्टीत तापपिंडन(चूर्ण न वितळता नियंत्रित परिस्थितीत तापवून संलग्न एकत्र द्रव्य तयार करण्याची क्रिया) केल्यावर बेरियम टिटॅनेट मिळते. बेरियम टिटॅनेट हा ⇨विद्युत् अपारक पदार्थ (ज्यात शक्तीचा किमान ऱ्हास होऊन विद्युत क्षेत्र स्थिरपणे टिकविता येते असा म्हणजेच विद्युत् निरोधक पदार्थ) असून त्याचे स्फटिक लोहविद्युतेचे नमुनेदार असंगत गुणधर्म दाखवतात [⟶ लोहविद्युत]. त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. उच्च तापमानाला बेरियम टिटॅनेटाचे स्फटिक घनाकार असून तापमान खाली उतरवल्यावर १३०० से. ला [लोहविद्युत् अवस्था आणि प्रतिविद्युत् अवस्था यांत एकमेकांत संक्रमण होण्याचे तापमान क्युरी तापमान ⟶ लोहविद्युत] त्यांचा आकार चतुष्कोणीय होतो आणि स्फटिकांमध्ये स्वाभाविकतः कायम स्वरूपाचा विद्युत् ध्रुवणाचा गुणधर्म येतो म्हणजेच त्यांना कायम स्वरूपाचे विद्युत द्विध्रुव परिबल (अत्यल्प अंतरावर ठेवलेल्या दोन समान परंतु विरुद्ध विद्युत भारांनी बनलेल्या प्रणालीचे परिबल म्हणजेच दोहोंपैकी एका भाराचे परिमाण आणि दोघांच्या मध्यांतील अंतर यांच्या गुणाकाराने येणाऱ्या राशीने दर्शविला जाणारा गुणधर्म) प्राप्त होते. बाह्य विद्युत् क्षेत्र लावण्यास पूर्ण स्फटिकातील ध्रुवण एका रेषेत आणता येते व त्याची दिशाही बदलता येते. स्फटिकीय अक्षांच्या सापेक्ष ध्रुवणाची दिशा क्रमाक्रमाने बदलत जाते व त्याचे निरपेक्ष – चिन्हरहित – मूल्य वाढत जाते.
बेरियम टिटॅनेटाचे ABO3 असे सामान्य सूत्र असलेल्या कित्येक संयुगांबरोबर ⇨घन विद्राव तयार होत असल्याने त्याचे गुणधर्म पद्धतशीरपणे विस्तीर्ण मर्यादांत बदलता येतात. असे पदार्थ बहुस्फटिकी मृत्तिकारूपात तयार करता येतात आणि त्यांचा विविध विद्युत उपकरणांत उपयोग करण्यात येतो.
बेरियम टिटॅनेटाचा विद्युत अपार्यता स्थिरांक उच्च असतो (उदा., एका मृत्तिका नमुन्याचा स्थिरांक कक्ष-सर्वसाधारण-तापमानाला २,००० असतो). यामुळे त्याचा उपयोग करून इलेक्ट्रॉनीय उपकरणांत वापरण्यास योग्य अशी अतिशय लहान आकारमानाची धारित्रे (विद्युत भार साठवून ठेवणारी साधने) तयार करता येतात. बेरियम टिटॅनेट मृत्तिकेत लॅंथॅनम ऑक्साइडासारख्या त्रिसंयुजी ऑक्साइडाचा अपद्रव्य म्हणून समावेश केल्यास क्यूरी तापमानाच्या जवळपास त्याची विद्युत संवाहकता १० पटींपर्यंत बदलते. या आविष्काराचा उपयोग संवेदनाशील तापमान-नियंत्रक प्रयुक्तींमध्ये करता येतो. बेरियम टिटॅनेट मृत्तिकांचे (विशेषतः लेड टिटॅनेट झिर्कोनेटमिश्रित) विद्युत् क्षेत्राच्या साहाय्याने ध्रुवण करता येते व त्यांत शेषरूप ध्रुवण पुष्कळशा प्रमाणात राखले जाते. या मृत्तिकांत मग तीव्र दाबविद्युत परिणाम [यांत्रिक प्रेरणा – उदा., दाब – लावल्यास विद्युत ध्रुवण निर्माण होण्याचा आविष्कार ⟶ दाबविद्युत] आढळून येतो. याखेरीज या मृत्तिका यांत्रिक दृष्ट्या मजबुत आणि आर्द्रता व तापमान यांचा फारसा परिणाम न होणारा असल्यामुळे त्यांचा उपयोग ध्वनिग्राहक श्राव्यातीत [⟶ श्राव्यातीत ध्वनिकी] व पाण्याखाली वापरण्यात येणारे ऊर्जापरिवर्तक, ठिणगी जनित्रे यांसारख्या विविध प्रयुक्तींमध्ये करण्यात येतो.
कार्बनी धातवीय संयुगे : बेरियम डायफिनील Ba(C6H5)2, बेरियम झिंक टेट्राएथिल [BaZn(C2H5) 4], बेरियम डाय एथिल [Ba(C2H5)2, अशा तऱ्हेची संयुगे तयार करता येतात. त्यांचा ग्रीन्यार विक्रियाकारकासारखा [⟶ ग्रीन्यार विक्रीया] उपयोग होतो.
इतर संयुगे : बेरियम हायड्राईड (BaH2), बेरियम कार्बाईड (BaC2), बेरियम सायनाइड [Ba(CN)2], बेरियम ॲसिटेट इ. संयुगेही तयार होतात. कॅल्शियम कार्बाइडाप्रमाणे बेरियम कार्बाइडापासून पाण्याच्या विक्रियेने ॲसिटिलीन वायू तयार होतो. बेरियम ॲसिटेटाचा रासायनिक विक्रियाकारक म्हणून व बेरियम सायनाइडाचा धातुविज्ञानात उपयोग करतात.
विषारीपणा : बेरियम आयन (विद्युत् भारित अणू) अत्यंत विषारी आहे. त्यामुळे बेरियमाचे कुठलेही विद्राव्य लवण विषारी ठरते. मात्र अविद्राव्य बेरियम सल्फेट विषारी नसल्याने आणि क्ष-किरणांना अपारदर्शी असल्यामुळे अन्ननलिकेचे रोगनिदान करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो.
बेरियम आयनाची विषबाधा झाल्यास लाळ सुटणे, उलट्या होणे, अतिसाराची बाधा होणे, कंपमिश्रित झटके येणे, रक्तदाब वाढणे, गुदद्वारी, आतड्यात व पोटात रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसू लागतात. हृदयावर डिजिटॅलिसासारखाच उत्तेजक परिणाम होतो. ०.८ ते १.० ग्रॅ. इतके बेरियम क्लोराइड प्राणघातक ठरते. काही तासांत किंवा दिवसात मृत्यू ओढावतो.
अभिज्ञान : (अस्तित्व ओळखणे). बेरियम आयन असलेल्या विद्रावात पोटॅशियम क्रोमेटाचा विद्राव ओतल्यास पिवळ्या रंगाचा बेरियम क्रोमेटाचा अवक्षेप मिळतो. तो ॲसिटीक अम्लात अविद्राव्य असतो. बेरियम लवणाच्या हायड्रोक्लोरीक अम्लातील विद्रावात प्लॅटिनम तार बुडवून बन्सन ज्योतीवर धरल्यास हिरव्या रंगाची ज्योत दिसते किंवा लवणाचा वर्णपट घेतल्यास विशिष्ट दोन हिरव्या रेषा दिसतात यावरून बेरियमाचे अस्तित्व ओळखले जाते. बेरियमाचे आगणन बेरियम सल्फेट मिळवून त्याच्या वजनावरून करता येते [⟶ वैश्लेषिक रसायनशास्त्र].
आठवले, वि. त्र्यं, घाटे, रा. वि.
संदर्भ : 1. Abbot, D. Inorganic Chemistry, London, 1965.
2. Nechamkin, H. The Chemistry of The Elements, New York, 1968.
3. Parkes, G. D., Ed. Mellor’s Modern Inorganic Chemistry, London, 1961.
4. Partington, J. R. General and Inorganic Chemistry, London, 1966.
“