बेनेटाइटेलीझ : मध्यजीव महाकल्पातील (सु. ३४.५ ते ९ कोटीवर्षांपूर्वीच्या कालखंडातील) प्रकटबी (ज्यांची बीजे उघडी असतात अशा) वनस्पतींचा एक विलुप्त (निर्वंश झालेला) गण. जे. जे. बेनेट (१८०१-७६) ह्या ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ या गणाला हे नाव दिलेले आहे. यात समाविष्ट केलेल्या वनस्पतींच्या जातींच्या पानांचे, फुलांचे व खोडांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) इंग्लंड, स्कॉटलंड, जर्मनी, रशिया, अमेरिका, भारत इ. प्रदेशांतील वर उल्लेख केलेल्या महाकल्पातील ट्रायासिक, जुरासिक व क्रिटेशस या भिन्न काळांतील खडकांत पुष्कळ आढळतात. ह्यांची वाटणी दोन कुले, चार वंश व अनेक जातींत केली आहे. ह्या गणाला ‘सायकॅडेऑडेलीझ’ असेही म्हणतात. सायकॅडेऑइडेसी हे त्यातील आद्य कुल असून त्यात साकॅडेऑइडिया (बेनेटाइट्स) हा एकच वंश आहे. हे वंशनाम १८७५ मध्ये प्रथम ह्या जातीतील खोडांस दिले होते. ह्या वंशातील एका जातीचे (सायकॅडेऑइडिया इट्रुस्काचे) एक मोठे व जीवाश्मांत सर्वात जुने असे खोड इट्रुस्कन लोकांना सु.४,००० वर्षापूर्वी सापडले होते व ते त्यांनी एका थडग्यात ठेवले होते. विल्यम्सोनिएसी हे यातील प्रगत दुसरे कुल असून त्यात विल्यम्सोनिया, विल्यम्सोनिएला व विलँडिएला ह्या तीन वंशांचा समावेश करतात.

 (१) सायकॅडेऑइडिया (बेनेटाइट्स) वंशातील वनस्पतींचे खोड सु.१ मी. उंच किंवा बुटके, शाखाहीन व अंडाकृती असून त्यावर पर्णतले (पानांच्या देठाचे तळभाग) व शल्कपर्णे (खवल्यासारखी पाने) ह्यांच्या किणांचे (खुणांचे) प्रदेश एकाआड एक आढळतात. काही जातींचे खोड लहान झुबक्याच्या स्वरूपातही आढळले आहे. पाने संयुक्त पिसासारखी विभागलेली व खोडाच्या टोकास ⇨ सायकसप्रमाणे झुबक्यात होती. एकेका खोडाच्या जून भागावर मृत पानांच्या (देठांच्या) बगलेतून निघणारी सु.२००-३०० द्विलिंगी व पूर्ण ‘फुले’ (शंकू किंवा तत्सम प्रजोत्पादक इंद्रिये) होती (आ.१).

आ.१ सायकॅडेऑइडिया (बेनेटाइट्‌स) ज्या प्रजोत्पादक इंद्रियाचा (फुलाचा) उभा छेद : (१) छदांचा समूद, (२) पुष्पासन, (३) लघुबीजुकपर्णाचा (केसरदलांचा) समूद, (४) गुरुबीजुकपर्णाचा (किंजदलांचा) समूह. (आकृतीत लघुबीजुकपर्णे डावीकडे अपक व उजवीकडे पक्व अवस्थेत दाखविली आहेत.) आ.२ सायकॅडेऑइडिया विलँडी :फुलातील गुरुबीजुकपर्णे धारण करणाऱ्या भागाचा उभा छेद (मोठा करून दाखविला आहे) (१) केसाळ छदे, (२) पुष्पासन, (३) अंतराबीजकी खवले, (४) लांब दांड्यावरची बीजे, (५) बीजाचा उभा छेद (खूप मोठा करून दाखविला आहे.)

प्रत्येक फुलात एका अक्षाच्या फुगीर टोकावर (पुष्पासनावर) अनेक गुरुबीजुकपर्णाचा (किंजदलांचा) समूह, त्याखाली अनेक लघुबीजुकपर्णाचा (केसरदलांचा) समूह, त्याखाली अनेक लघुबीजुकपर्णांचा (केसरदलांचा) समूह व सर्वात खाली छदांचा समूद असे तीन समूह (मंडळे) होते. ह्या वंशातील बहुतेक अमेरिकी जातींत (उदा., सा. इंजेन्स सा.डाकोटेन्सिस इ.) फुलातील पुष्पासन अधिक लांबट व शंकूसारखे असून त्यामध्ये बीजके (अथवा बीजे) धारण करणारे लहान दांडे आखूड व पृष्ठभागाशी काटकोनात मांडलेले आढळतात. इतर काही जातींत (उदा., सा. गिब्सोनियानस व सा. विलँडी) पुष्पासन उशीसारखे (आ.२) गोलसर असून त्यावर लांब दांड्यांची बीजके होती [⟶फूल] . पहिल्या प्रकारात पुष्पासनावरच्या टोकाची व तळाजवळची बीजे वंध्य असून फक्त मध्यभागावरची बीजे फलनक्षम होती. बीजे सरळ (उर्ध्वमुख) बीजकापासून बनलेली असून बीजकावरणे व बीजकरंघ्रे सहज पृष्ठभागावर डोकावण्याइतकी लांब होती.


ती सर्व बीजके (व नंतर बीजे) परस्परांपासून अंतराबीजकी खवल्यांच्या गदेसारख्या आकारामुळे अलग ठेवली गेलेली, तर त्यांची फुगीर टोके बीजांच्या मधल्या पोकळ्यांत जुळून राहिलेली आढळतात व त्या सर्वांचा (बीजे व खवल्यांची टोके यांचा) सलग व संरक्षक पृष्ठभाग बनतो. हे खवले वंघ्य गुरुबीजुकपर्णेच होत. पुष्पासनासह ही सर्व संरचना पक्वावस्थेत सु.२.५-५ सेंमी. लांबीचे ‘फळ’ बनते. बीजे सु.एक किंवा काही मिमी. लांब असून त्यांमध्ये द्विदलिकित गर्भ आढळतो. बीजावरणात तीन पदर असून मधला कठीण व बाजूचे मांसल असतात प्रदेहापासून आवरण अलग असून पुष्काचा अभाव असतो [⟶सायकस].

सायकॅडेऑइडियाच्या फुलातील लघुबीजुकपर्णांचा समूह (केसरमंडल) तळाशी पुष्पासनावर गुरुबीजुकणपर्णे धारण करणाऱ्या भागाखाली असलेल्या वलयाकृती बिंबावर आधारलेला असतो (आ.१) सर्व केसरदले तळाशी असलेल्या बिंबाच्या वरच्या पातळीत जुळलेली असतात परंतु नंतर त्यावरच्या पातळीत सुटी असतात. ती एकूण सु.८-१० असून प्रत्येकाची लांबी सु.१०-१२ सेंमी. असते व ते पिसासारखे विभागलेले असते. अपक्वावस्थेत ती टोकापासून तळाकडे वाकलेली परंतु नंतर एकावस्थेत सरळ व पसरलेली असतात.यांचे विभाग (दलके) सु.१० किंवा अधिक व एकाआड एक असून त्या प्रत्येकावर संधानींच्या (परस्परांशी जुळलेल्या लघुबीजुककोशांच्या किंवा परागकोशांच्या) दोन रांगा असतात [⟶मॅरॅटिएलीझ]. प्रत्येक संधानीची भित्तिका जाड असून तिची रुंदी अधिक व लांबी कमी असते तिला देठ असतो. संधानीत २०-३० कप्प्यांच्या दोन ओळी असून त्या कप्प्यांत विपुल लघुबीजुके (परागकण) असतात संधानीचा स्फोट खालच्या बाजूस एका उभ्या रेषेवर होतो आतील प्रत्येक कप्पाही स्वतंत्रपणे फुटतो. 

सायकॅडेऑइडियाच्या फुलांची (शंकूंची) तुलना स्थूलमानाने फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीजत उपविभाग]⇨ मॅग्नोलिएसीतील (चंपक कुलातील) विशेषतः कवठी चाफ्याच्या फुलाबरोबर करून बरेच साम्य दर्शविता येते त्यावरून काही वनस्पतिशास्त्रज्ञ फुलझाडे अशा पूर्वजांपासून अवतरली असावीत, असे मानतात तथापि ही साम्ये समांतरित क्रमविकासाची (उत्क्रांतीची) उदाहरणे असणेही शक्य आहे. 

आ.३ सायकॅडेऑइडिया : लघुबीजुकपर्णावरील संधानीचा उभा छेद : (१) भित्तिका, (२) लघुबीजुककोश, (३) लघुबीजुके, (४) स्फोट-रेषा. आ.४. विल्यम्सोनिया सीवार्डियाना (१) वृक्ष, (२) पान (टायलोफायलम), (३) नर-फूल (वि.व्हिटबिएन्सिस), (४) लघुबीजुकपर्ण.

(२) विल्यम्सोनिया हा वंश विल्यम्सोनिएसी कुलात सर्वात मोठा व महत्त्वाचा असून त्यातील वि. सीवार्डियाना जातीच्या पानांचे, फुलांचे व खोडांचे जीवाश्म भारताच्या गोंडवनी थरात राजमहाल (बिहार) येथे आढळतात त्यावरूनच वनस्पतिशास्त्रज्ञ बिरबल सहानी यांनी या जातीचे अधिकृत वर्णन प्रसिद्ध केले (१९३२).

त्यापूर्वी ह्या जातीच्या फक्त खोडांच्या जीवाश्मांना बक्लँडिया इंडिका असे नाव होते. ग्रेट ब्रिटनमध्ये पहिल्याने वर्णिलेल्या (१९२५) सायकॅडेऑइडेलीझ गणातील जीवाश्म वंशाला बक्लँडिया असे नाव दिले आहे. विल्यम्सोनिया वंशातील झाडे विद्यमान सायकससारखी व सु.दोन-तीन मीटर उंच असून त्यांच्या खोडांवर सायकॅडेऑइडिया प्रमाणेच किण प्रदेश आढळतात. तसेच खोडांवर लांबट, संयुक्त, मोठी व पिसासारखी (आ.४) पाने (टायलोफायलम) व एकलिंगी फुले होती. फुलातील शंकूसारख्या अक्षावर टोकास गुरुबीजुकपर्णे व त्यांखाली छदे यांचे समूह होते. एकलिंगी नर-फुलांचा तळाकडील भाग पेल्याप्रमाणे असून काहींना देठ नव्हते वरच्या बाजूस दले सुटी असून त्यांच्या आतील भागांवर (वि.व्हिटबिएन्सिस) संधानींच्या दोन रांगा असत मात्र काही जातींत संधानींच्या रांगा धारण करणारी लहान दलके होती (उदा., वि.स्पेक्टॅबिलिस). 


(३) विल्यम्सोनिएला वंशातील वनस्पतींचे जीवाश्म मुख्यतः यॉर्कशरमध्ये जुरासिक (सु.१८.५ ते १५.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील) खडकांत आढळतात. ह्या वनस्पतींच्या फांद्या द्विशाखाक्रमी (दुभागलेल्या) व त्यांवरची पाने (निल्सोनिऑप्टेरिस) साधी व अखंड होती. तसेच त्यांवर द्विलिंगी, पूर्ण व बहुतांशी सायकॅडेऑइडियाच्या फुलासारखी पण छदहीन फुले होती. 

(४) विलॅंडिएला वंशाचे जीवाश्म स्वीडनमध्ये टायासिक (सु.२३ ते २० कोटी वर्षापूर्वीच्या काळातील) खडकांत सापडतात. यांची बाह्यरचना बरीचशी विल्यम्सोनिएलासारखीच असून फक्त पाने (ॲनोमोझॅमाइट्स) निराळी व सु.८ सेंमी. लांब होती  त्यांची पाती पूर्णपणे विभागलेली होती. फुले छदांनी वेढलेली व बिया असंख्य व बारीक होत्या.

बेनेटाइटेलीझमधील वंशाचे परस्परांशी फार निकट संबंध असून काही निश्चित लक्षणांमुळेच वरील चार वंश एका गणात घातले आहेत. ⇨सायकॅडेलीझ व ⇨बीजी नेचे यांच्याशी त्यांचे निकट संबंध असून काहींच्या मते पुराजीव महाकल्पातील(सु. ६० ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील)बीजी नेचांपासून मध्यजीव महाकल्पातील बेनेटाइटेलीझ व सायकॅडेलीझ हे गण अवतरले. त्यापैकी बेनेटाइटेलीझ काही काळानंतर संपूर्णतः नाश पावले. सायकॅडेलीझ मात्र हळूहळू संख्येने कमी होऊन हल्ली त्यातील फक्त नऊ वंश जगाच्या विशिष्ट भागात आढळतात.हे सर्व ध्यानी घेऊन प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ ⇨ चार्ल्स जोसेफ चेबरलिन यांनी १९३५ साली या तीन गणांचा मिळून ‘सायकॅडोफायटा’ या नावाने प्रकटबीज वनस्पतींचा एक जातिविकसित(जातीच्या विकासाच्या इतिहासावर आधारलेला)व महत्त्वाचा उपवर्ग बनविला आहे.

आ. ५. विलँडिएला अंगुस्तिफोलिया : (१) द्विशाखाक्रमी खोडाची वनस्पती, (२) सुटे पान, (३) फूल.

पहा : पुरावनस्पतिविज्ञान बीजी नेचे वनस्पति, प्रकटबीज उपविभाग सायकॅडेलीझ.

संदर्भ :

1. Andrews. H. N. Studies in Paleobotany, New York, 1967.

2. Arnold, C. A. Introduction to Paleobotany, London, 1947.

3. Datta, S. C. An Introduction to Gymnosperms, Calcutta, 1966.

4. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vo. I, Cambridge, 1963.

5. Walton, J. An Introduction to study of Fossll Plants, London, 1953.

 वऱ्हाडपांडे, द. गो. परांडेकर, शं. आ.