बेनिन सिटी : नायजेरिया देशाच्या दक्षिण भागातील शहर व नदीबंदर. लोकसंख्या १,३६,००० (१९७५). हे बेनिन नदीच्या तीरावर, लागोसच्या पूर्वेस २३० किमी. अंतरावर वसले आहे. तेराव्या शतकात स्थापन होऊन सतराव्या शतकापर्यंत टिकलेल्या एका आफ्रिकी राज्याची ही राजधानी होती. पंधराव्या शतकानंतर येथून हस्तिदंत, मिरे, कापड व गुलाम यांचा व्यापार सुरू झाला. ब्रिटिशांनी १८९८साली हे शहर जाळून टाकले होते. येथे लाकडी सामान, रबर, कोको, पाम तेल इ. उद्योगधंदे चालतात. येथील लोखंडकाम, हस्तिदंतावरील नक्षीकाम व ब्रॉंझचे अर्धपुतळे म्हणजे आफ्रिकन कलेचा ठेवा होय.

लिमये, दि. ह.