बेट्स, हर्बर्ट अर्नेस्ट : (१६ मे १९०५ – २९ जानेवारी १९७४). प्रसिद्ध इंग्रज कथा-कादंबरीकार. जन्म नॉरदॅम्पटनशरमधील रश्डन येथे. शिक्षण केटरिंग येथील शाळेत. आरंभी कारकुनी आणि पत्रकारी हे व्यवसाय. द टू सिस्टर्स ही त्यांची पहिली कादंबरी १९२६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्याच्या वीस-बावीस कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. विषय आणि पार्श्वभूमी ह्यांचे वैचित्र्य हे बेट्सच्या कादंबऱ्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य. कॅथरिन फॉस्टर (१९२९), शार्लंट्स रो (१९३१), द फॅलो लॅंड (१९३२), फेअर स्टुड द विंड फॉर फ्रान्स (१९४४), द पर्पल प्लेन (१९४७), द ॲकरॅंडा ट्री (१९४९), द डार्लिंग बड्स ऑफ मे (१९५८), ओह्! टु बी इन इंग्लंड (१९६३) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. गी द मोपासां आणि हार्डी ह्यांचा काही प्रभाव बेट्सच्या काही कादंबऱ्यांवर दिसून येतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बेट्स इंग्लंडच्या विमानदलात (रॉयल एअर फोर्स) मध्ये होता. त्या वेळच्या अनुभवांतून फेअर स्टुड द विंड फॉर फ्रान्स ही त्याची सर्वोत्तम कादंबरी उभी राहिली. द पर्पल प्लेन आणि द जॅकरॅंडा ट्री ह्या त्याच्या कादंबऱ्या युद्धकालीन ब्रह्मदेशाच्या पार्श्वभूमीवर आहेत. ह्या कादंबऱ्यांनी समर्थ कादंबरीकार म्हणून त्याच्या कीर्तीत भर घातली. द डार्लिंग बड्स ऑफ मेमध्ये एका शेतकरी कुटुंबाचे वास्तववादी व विलोभनीय असे चित्रण आहे.