बेक्रेल, आलेक्सांद्र एद्माँ : (२४ मार्च १८२० – १३ मे १८९१). फ्रेंच भौतिकीविज्ञ. प्रकाश व विद्युत् शास्त्र या विषयांत त्यांनी विशेष संशोधन केले. आंत्वान सेझार ब्रेकेल यांचे हे पुत्र होत. आलेक्सांद्र यांचा जन्म पॅरिस येथे झाला. त्यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखालीच अभ्यास केला व म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी या संस्थेत वडिलांचे साहाय्यक म्हणून व नंतर त्यांच्या जागेवर काम केले. १८७८ मध्ये ते म्युझियमचे संचालक झाले. मध्यंतरीच्या काळात १८४९ मध्ये व्हर्साय येथील ॲग्रॉनॉमिक इन्स्टिट्यूटमध्ये व नंतर १८५३ मध्ये पॅरिस येथील स्कूल अँड म्युझियम ऑफ आर्ट्सअँड क्राफ्ट्स या संस्थेत भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली होती. १८४० मध्ये त्यांना पॅरिस विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाली.
विद्युत् रासायनिक विघटनाविषयी (विद्युत् प्रवाहाने पदार्थातील घटकद्रव्ये अलग होण्याच्या अविष्काराविषयी) प्रयोग करून त्यांनी मायकेल फॅराडे यांच्या त्यासंबंधीच्या नियमात समाविष्ट नसलेल्या कित्येक आविष्कारांचा समावेश करण्यासाठी सुधारित नियम सुचविला. १८४० मध्ये त्यांनी प्रकाशाने प्रवर्तित केलल्या रासायनिक विक्रियांमुळे विद्युत् प्रवाह निर्माण होतो असे दाखविले. याकरिता विरल अम्लीय विद्रावात बुडवून ठेवलेल्या धातूच्या दोन पत्र्यांपैकी एक पत्रा प्रकाशित केल्यास अशा विद्युत् घटाच्या विद्युत् चालक प्रेरणेत (विद्युत् मंडलात प्रवाह वाहण्यास कारणीभूत असणाऱ्या प्रेरणेत) फरक पडतो, असे त्यांनी दाखवून दिले. या शोधाकरिता प्रकाशविद्युत् चालक परिणामाला [⟶ प्रकाशविद्युत्] मूलतः बेक्रेल यांचे नाव देण्यात आले. प्रकाशामुळे निर्माण झालेल्या विद्युत् प्रवाहाचे मापन करून अतितप्त पदार्थांचे तापमान मोजता येणे शक्य आहे, असेही त्यांनी दाखवून दिले. त्यांनी विविध पदार्थांच्या प्रतिचुंबकीय व समचुंबकीय गुणधर्मांविषयी [⟶ चुंबकत्व] १८४५ – ५५ या काळात संशोधन केले. १८५७ – ५९ मध्ये प्रस्फुरणाविषयी (विद्युत्चुंबकीय प्रारण-तरंगरूपी ऊर्जा – वा अन्य क्षोमकारक कारणामुळे उद्भवणाऱ्या व क्षोमकारक उद्गम काढून घेतल्यावरही चालू राहणाऱ्या विशिष्ट पदार्थांकडून होणाऱ्या प्रकाशाच्या उत्सर्जनाविषयी) त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. युरेनियम संयुगे प्रकाश उद्गमाला उद्भासित करणे व त्यामुळे होणाऱ्या परिणामाचे निरीक्षण करणे यांतील कालावधी स्वेच्छेनुसार बदलता येणारे व तो अचूकपणे मोजणारे उपकरण (प्रस्फुरणदर्शक) त्यांनी तयार केले. या उपकरणाच्या साहाय्याने त्यांनी अनेक नवीन प्रस्फुरक पदार्थ शोधून काढले. सौर प्रारणाचे व विद्युत् प्रकाशाचे प्रकाश रसायनशास्त्रीय परिणाम आणि वर्णपटविज्ञानीय वैशिष्ट्ये यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.
वडिलांना संशोधनात मदत करण्याबरोबरच त्यांनी त्यांच्या समवेत अनेक वैज्ञानिक निबंध लिहून प्रसिद्ध केले. १८६३ मध्ये फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे व १८८८ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.