टेस्ला, नीकोला : [९ (१०)? जुलै १८५६–७ जानेवारी १९४३]. ऑस्ट्रियन-अमेरिकन विद्युत् अभियंते. विद्युत् शक्तीचा पुरवठा प्रत्यावर्ती (उलट-सुलट दिशेने वाहणाऱ्या) विद्युत् प्रवाहाच्या स्वरूपात करण्याच्या कल्पनेचे आद्य प्रणेते. यामुळे विद्युत् शक्तीच्या प्रेषण पद्धतीत क्रांतिकारक बदल घडून आला. त्यांचा परिभ्रमी (फिरत्या) चुंबकीय क्षेत्राचा शोध प्रत्यावर्ती प्रवाहावर चालणाऱ्या यंत्रसामग्रीत फार महत्त्वाचा ठरलेला आहे.

टेस्ला यांचा जन्म ऑस्ट्रिया-हंगेरी सरहद्दीवरील (आता यूगोस्लाव्हियातील) स्मिलजान येथे झाला. ग्रात्स येथील तांत्रिक विद्यापीठात व प्राग विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ऑस्ट्रियाच्या तारायंत्र खात्यात आणि पुढे बुडापेस्ट व पॅरिस येथील विद्युत् अभियांत्रिकी खात्यात काम केले. १८८२ साली त्यांनी काँटिनेंटल एडिसन कंपनीत काम करण्यास सुरूवात केली व पुढील वर्षीच त्यांनी आपले पहिले प्रवर्तन चलित्र (प्राथमिक गुंडाळीतील विद्युत् प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय स्त्रोताने द्वितीयक गुंडाळीत विद्युत् प्रवाह प्रवर्तित होऊन परिभ्रमी गती उत्पन्न होणारी विद्युत् मोटर) तयार केले. १८८४ साली ते अमेरिकेस गेले व १८८५ मध्ये त्यांनी प्रत्यावर्ती जनित्र (यांत्रिक ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र), रोहित्र (प्रत्यावर्ती विद्युत् दाब बदलण्याचे साधन) आणि चलित्र यांचे आपले एकस्वाचे (पेटंटचे) हक्क जॉर्ज वेस्टिंगहाउस यांना विकले. १८८७ मध्ये त्यांनी आपली स्वतंत्र प्रयोगशाळा न्यूयॉर्क येथे स्थापन केली व १८९१ मध्ये त्यांनी ‘टेस्ला वेटोळे’ या नावाने ओळखण्यात येणारे हवायुक्त गाभा असलेले व उच्च कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांची संख्या उच्च असलेल्या) प्रवाहासाठी वापरण्यात येणारे रोहित्र शोधून काढले.

प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचा विद्युत् शक्तीच्या प्रेषणासाठी परिणामकारकपणे उपयोग करण्याची कल्पना प्रथम टेस्ला यांनाच सुचली. बहुकला (कलेमध्ये म्हणजे आवर्तनातील स्थितीमध्ये फरक असलेली दोन वा अधिक विद्युत् मंडले असलेल्या) प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचा पुरवठा करण्याची आता सर्वमान्य झालेली पद्धत त्यांनीच प्रथम प्रचारात आणली. त्यांच्या या पद्धतीचा प्रथमतः नायगारा धबधब्यावर होणाऱ्या विद्युत् उत्पादनाच्या वितरणासाठी उपयोग करण्यात आला. याशिवाय टेस्ला यांनी नवीन प्रकारची जनित्रे, चलित्रे, रोहित्रे, प्रवर्तन वेटोळी, विद्युत् धारित्रे (विद्युत् भार साठवून ठेवण्याची साधने), विद्युत् प्रज्योत आणि तापदीप्त दिवे इ. अनेक विद्युत् उपकरणांविषयी शोध लावून सु. ७०० एकस्वे मिळविली.

विद्युत् शास्त्रातील टेस्ला यांचे स्थान अतिशय उच्च असून त्यांच्या ऐंशीव्या जन्मदिनानिमित्त १९३६ मध्ये अनेक यूरोपीय देशांत चर्चासत्रे भरविण्यात आली होती. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ चुंबकीय प्रवर्तनाच्या एककाला ‘टेस्ला’ हे नाव देण्यात आहे आहे. एडिसन यांच्याबरोबर १९१२ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक त्यांना देऊ केले होते, परंतु त्यांनी ते नाकारले. ते न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.