बेकेसे, गेऑर्ख फोन : (३ जून १८९९-१३ जून १९७२). अमेरिकन (मूळ हंगेरियन) भौतिकीविज्ञ. मानवी कानाच्या अंतर्कर्ण [⟶ कान] या विभागातील ध्वनिसंदेशवाहक यंत्रणेच्या कार्याबद्दलच्या शोधाबद्दल १९६१चे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक विजेते. वैद्यकाचे पदवीधर नसूनही त्या शास्त्रामधील शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळविणारे हे पहिले भौतिकीविज्ञ होत.
बेकेसे यांचा जन्म हंगेरीतील बूडापेस्ट येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण म्यूनिक, कॉन्स्टॅंटिनोपल (इस्तंबूल) व बूडापेस्ट येथे आणि झुरिकमधील एका खाजगी शाळेत झाले. स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठात त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास केला. १९२३ मध्ये त्यांनी बूडापेस्ट विद्यापीठाची भौतिकीची पीएच्. डी. पदवी मिळविली व त्याच वर्षी हंगेरियन टपाल खात्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या संशोधन प्रयोगशाळेत ते काम करू लागले. तेथे त्यांनी १९४६ पर्यंत काम केले परंतु मध्यंतरी काही महिने बर्लिनमधील सीमेन्स आणि हालस्के ए. जी. या दूरसंदेशवहन विषयाच्या संशोधनात अग्रेसर असलेल्या कंपनीच्या प्रयोगशाळेतही काम केले.
टपाल खात्याच्या प्रयोगशाळेत ते लांब अंतर असणाऱ्या दूरध्वनी यंत्रणेतील बिघाडांच्या कारणाबद्दल संशोधन करीत होते. त्याकरिता त्यांनी मानवी कानाच्या रचनेचा व कार्याचा सखोल अभ्यास केला. कर्णशंबुकाचे (हाडाच्या पोकळीत असणाऱ्या शंकाकार नलिकेचे) कार्य तोपावेतो अज्ञातच होते. ते समजण्याच्या हेतूने बेकेसे यांनी कर्णशंबुकाची एक प्रतिकृती (मॉडेल) तयार केली. ही प्रतिकृती प्लॅस्टिकची नाणी भरलेली नळी व ३० सेंमी. लांबीची कला (पातळ पटल) यांपासून बनविली होती. मानवी कानात ध्वनितरंगांचे जसे प्रसारण होते तसेच या प्रतिकृतीतही होत असल्याचे आढळल्यावरूनकानाच्या तांत्रिक पुरवठ्याचे (मज्जा पुरवठ्याचे) कार्य करण्याकरिता प्रथम त्यांनी बेडकाच्या त्वचेचा वापर केला परंतु तो अव्यवहार्य ठरला. या नळीवर एकदा त्यांनी आपला प्रबाहू (कोपरापासून खालचा बाहूचा भाग) आडवा ठेवला असता तरंग संपूर्ण कलेतून जवळजवळ सारख्याच परमप्रसराने [मूळ स्थानापासून होणाऱ्या कमाल स्थानांतराने ⟶ तरंग गति] गेल्याचे त्यांना आढळले पण तरीही प्रवाहातून गेलेल्या संवेदना पूर्णपणे निराळ्याहोत्या. या प्रतिकृतीचा उपयोग करून कानातील कर्णशंबुक तरंगातील कंप्रता (दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांच्या संख्यांचे) विश्लेषण तांत्रिक-यांत्रिकीय (तंत्रिका प्रेरणा व ढकलणे-ओढणे यांसारख्या यांत्रिक प्रेरणा यांच्या संयुक्त कार्यावर आधारित अशा) पद्धतीने करतो, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे काही शतके अज्ञात असलेला कानाच्या कंप्रता विश्लेषणाचा गूढ प्रश्न सुटला.
बेकेसे यांच्या या शोधामुळे श्रवणविषयक अनेक बाबींचे स्पष्टीकरण होण्यास मदत होऊन श्रवणेंद्रियांच्या मूळ सिद्धांतावर बरेच परिणाम झाले.
टपाल खात्याच्या प्रयोगशाळेत १९३९-४६ या काळात काम करीत असतानाच बेकेसे बूडापेस्ट विद्यापीठात प्रायोगिक भौतिकी या विषयाचेप्राध्यापक होते. १९४६ मध्ये ते हंगेरी सोडून स्वीडनला गेले व स्टॉकहोममधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी संशोधन केले. या ठिकाणी त्यांनी रूग्णास स्वतःच वापरता येईल अशा श्रवणमापकाचा (श्रवणाची तीक्ष्णता आणि कंप्रता मर्यादा यांचे मापन करणाऱ्या उपकरणाचा) शोध लावला. या उपकरणाचे श्रवणमापनाशिवाय आणखी काही उपयोग आहेत उदा., अंधाराला अनुकूलन होताना डोळ्याचा प्रकाश संवेदनक्षमतेत होणारे बदल शोधता येतात.
बेकेसे १९४७ मध्ये अमेरिकेत रहावयास गेले परंतु १९५२ पर्यंत त्यांचा कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटशी संपर्क कायम होता. अमेरिकेत हार्व्हर्ड विद्यापीठाच्या मनो-ध्वनिकीय (ध्वनीच्या भौतिकीचा श्रवण आणि ध्वनिग्रहणाचे शरीरक्रियाविज्ञान व मानसशास्त्र यांच्याशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या) प्रयोगशाळेत संशोधन साहाय्यक म्हणून काम केल्यानंतर तेथेच त्यांची १९४९ मध्ये मनोभौतिकी विषयातील ज्येष्ठ संशोधक म्हणून नेमणूक झाली. १९५६ मध्ये ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर निवडून आले.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना पुढील मानसन्मान मिळाले होते : कर्णविज्ञानाचे डेंकर पारितोषिक (१९३१), ग्रोनिंगेन विद्यापीठाचे वाक्शक्ती व कर्णविज्ञानाचे गीयो पारितोषिक (१९३९) आणि कर्णविज्ञानाचे शामबाध पारितोषिक (१९५०), बर्लिन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे लायप्निट्स पदक (१९३७), बूडापेस्ट ॲकॅडेमी ऑफसायन्सचे ॲकॅडेमी पारितोषिक (१९४६), सोसायटी ऑफ एक्सपिरिमेंटल सायकॉलॉजिस्ट्सचे हॉवर्ड क्रॉस्बी वॉरेन पदक (१९५५), अमेरिकन ऑटॉलॉजिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१९५७), अकाउस्टिकल सोसायटी ऑफ अमेरिकन सुवर्ण पदक (१९६१) आणि सन्माननीय एम्. डी., म्यून्स्टर विद्यापीठ व बर्न विद्यापीठ (१९५५ व १९५९).
बेकेसे यांनी १९२८-५८ या काळात श्रवण, कंपन संवेदनक्षमता इ. विषयांवर तीन भाषांतून शंभरापेक्षा जास्त निबंध प्रसिद्ध केले होते. १९६० मध्ये एक्सपिरिमेंट्स इन हिअरिंग या शीर्षकाखाली हे सर्व निबंध इंग्रजीत प्रसिद्ध झाले. ते होनोलूलू येथे मरण पावले.
भालेराव, य. त्र्यं.
“