बेकन, रॉजर:(१२१४ ? – १२९२). तेराव्या शतकातील इंग्लिश तत्त्ववेत्ता व वैज्ञानिक. ह्याचा जन्म बहुधा १२१४ ते १२२० ह्या काळात झाला आणि मृत्यू १२९२ मध्ये झाला. शिक्षण ऑक्सफर्ड आणि पॅरिस येथील विद्यापीठांत झाले. त्याच्या प्रौढ जीवनाची सुरूवात पॅरिस विद्यापीठात प्राध्यापक म्हणून झाली. आपण ‘शुद्ध ॲरिस्टॉटल मता’ चे विवेचन करतो, असा त्याचा व त्याच्या काही सहकाऱ्यांचा दावा होता. पण ॲरिस्टॉटलचे म्हणून जे तत्त्वज्ञान ते मांडीत होते, त्याच्यावर⇨ नव-प्लेटो मताचा आणि प्राचीन परंपरेने आलेल्यागूढविद्येचा खूपच पगडा होता. ह्या परंपरेप्रमाणे ईश्वराने हिब्रू जमातील उद्देशून प्रकट केलेले गूढशास्त्र त्यांच्याकडून खाल्डिअन व ईजिप्शिअन जमातींकडे संक्रांत झाले आणि अखेरीस ⇨ॲरिस्टॉटलकडे आले. ह्या एकात्म सर्वसमावेशक शास्त्रात निसर्गाची सर्व गुन्हे प्रकट करण्यात आली आहेत पण त्याची भाषा कूट आणि प्रतीकात्मम आहे. हे गूढज्ञान प्राप्त करून घेणे हे बेकनचे उद्दिष्ट होते. ह्यासाठी त्याने भाषांचा तसेच गणित, ⇨प्रकाशकी इ. शास्त्रांचा अभ्यास केला, गुह्य विद्येवरील अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि वैज्ञानिक उपकरणे गोळा केली. ह्या व्यासंगासाठी बेकन पॅरिसहून ऑक्सफर्डला आला आणि फ्रान्सिस्कन भिक्षुसंघात त्याने प्रवेश केला. पण मुख्यतः बेकनच्या ऐकांतिक व अभिनव मतांमुळे त्याचे इतर भिक्षुंशी पटले नाही. आपण ज्या महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास करीत आहोत त्या विषयांची त्यांच्याकडून उपेक्षा होते असे वाटून बेकनने त्यांच्यावर व विद्यापीठाशी संबंधित असलेल्या इतर भिक्षुसंघावरही कडक ‌टीका केली आहे. पोप चौथा क्लेमेंट ह्याने बेकनने एकात्म गूढविद्येवर लॅटिन भाषेत लिहीलेल्या Opus Majus (१२६६) ह्या ग्रंथांविषयी आस्था दाखविली आणि त्याची एक गुप्तपणे तयार केलेली प्रत आपल्याकडे पाठविण्याची त्याला विनंती केली. हा ग्रंथ बेकनकडून अजून लिहिलाच जायचा होता पण त्याने घाईघाईने १८ महिन्यांच्या अवधीत आपल्या भावी ग्रंथाचा पहिला खर्डा (Opus Maius) बनवून पाठविला. त्याबरोबरच त्याने गणितावरील आपला एक ग्रंथ Multiplicatio Specierum, ‘खूप खर्चाने बनविलेले एक अंतर्गोल ‌भिंग’ आणि ‘जगाचा एक मूल्यवान नकाशा’ पाठविला पण ह्या भेटी मिळायच्या अगोदर पोप याचा नोव्हेंबर १२६८ मध्येच मृत्यू घडून आला होता.

‘अभिनव’ मते मांडल्याबद्दल बेकनला तुरुंगात डांबण्यात आले होते, अशी एक कथा परंपरेने आली आहे. पण बेकनने मांडलेली जी मते आक्षेपार्ह ठरण्याचा संभव होता – उदा., फलज्योतिष व निसर्गशास्त्र ह्या विषयांवरील मते – ती तत्कालीन प्रतिष्ठित विद्वानांनीही मांडली असल्यामुळे ह्या कथेत तथ्य नसण्याचा संभव आहे. बेकन आपल्याशी मतभेद असलेल्या कुणाचाही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर कडक टीका करीत असल्यामुळे, काही काळ तरी त्यांचे तोंड बंद करण्यासाठी बहुधा त्याला तुरुंगात ठेवण्यात आले असावे. पण त्याचे तोंड बंद झाले नाही. ‘धर्मविद्ये’वरील आपल्या पुढील ग्रंथातही (Compendium Studii Theologiae) आपल्या आवडीच्या विषयांवर त्याने आपली ठाम मते स्पष्टपणे आणि इतरांवर झोंबरी टीका करीत मांडली आहेत. पण हा ग्रंथ लिहीत असतानाच त्याचे निधन झाले.

प्रयोगसिद्ध विज्ञानाचा एक महत्त्वाचा पुरस्कर्ता आणि प्रवर्तक म्हणून बेकनची प्रसिद्धी आहे. पण ‘प्रयोग’ ह्या शब्दाचा त्याने व्यापक अर्थ लावला आहे. प्रयोगसिद्ध म्हणजे साक्षात् अनुभवावर आधारलेले असे ज्ञान. ज्ञानेंद्रियांकडून वस्तूंची आपल्याला घडणारी संवेदने हा साक्षात् अनुभवांचा एक प्रकार होय. ईश्वर आपले अंतर्मन प्रकाशित करून आपल्याला जे गूढ अनुभव प्राप्त करून देतो, तोही साक्षात् अनुभवांचाच दुसरा प्रकार होय. ह्या गूढ अनुभवांवर आधारलेले ज्ञानही, इंद्रियसंवेदनांवर आधारलेल्या ज्ञानाप्रमाणे प्रयोगसिद्ध असते.

आपण ज्याला प्रायोगिक विज्ञान म्हणू त्याच्यात बेकन ह्याने घातलेली मुख्य भर मुख्यतः प्रकाशकीमध्ये आहे. पण भरती-ओहोटी, उष्णता इत्यादींसंबंधी तत्कालीन उपपत्तींचा विकासही त्याने समर्थपणे केला. ह्यातून निसर्गाच्या स्वरूपाविषयीचे जे चित्र उभे राहते ते असे, की प्रकाश आणि इतर भौतिक ऊर्जा ह्यांचे तरंगांद्वारा प्रसारण होते. हे प्रसारण अर्थात एका क्षणात होऊ शकत नाही. ती एक प्रक्रिया असते आणि म्हणून ती घडून यायला काही अवधी लागतो. मानवीडोळ्यांचे कार्य आणि त्यामुळे होणारे वस्तूंचे दर्शन ह्यांचे स्पष्टीकरण ह्या संकल्पनेचा आधार घेऊन बेकनने केले आहे. प्रकाशाचे व इतर भौतिक उर्जांचे प्रसारण सरळ रेषेत होत असल्यामुळे त्याचे नियम भूमितीवर आधारलेले असतात हे निष्पन्न होते. म्हणून बेकनला गणिताच्या अभ्यासाचे महत्त्व वाटत होते. ह्याबरोबरच ईश्वराने सर्व ज्ञान प्रकट करून बायबल व इतर गुह्य ग्रंथांत ग्रथित केले आहे, पण माणूस पापी असल्यामुळे तो ह्या ज्ञानापासून वंचित होतो अशीही त्याची श्रद्धा होती. त्यामुळे ग्रीक, हिब्रू इ. प्राचीन भाषांचा अभ्यास त्याने केला आणि किमयेची विद्या हस्तगत करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. बंदुकीच्या दारूच्या शोधाचे श्रेय त्याच्याकडे बराच काळ देण्यात आले कारण त्याच्या म्हणून मानल्या गेलेल्या एका ग्रंथात त्यासंबंधीचे सूत्र समाविष्ट होते. फलज्योतिषावरही त्याची श्रद्धा होती. एका माणसाची स्वतंत्र इच्छाशक्ती सोडली, तर पृथ्वीवरील सर्व घटना ग्रहांच्या प्रभावामुळे घडून येतात असे तो मानीत असे. आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचे स्वरूप आणि तिची गृ‌हीत कृत्ये स्पष्ट व स्थिर करण्याच्या दिशेने मध्ययुगापासून जी वैचारिक वाटचाल झाली, तिचा एक टप्पा म्हणून रॉजर बेकनच्या विचारांकडे पाहणे योग्य ठरते. अनुभवनिष्ठ ‘विज्ञान’ आणि गूढ अनुभवावर आधारलेले ‘ज्ञान’ यांचे ‌एक विचित्र व हृदयंगम मिश्रण ह्या विचारांत आढळते. त्याचे सर्व लेखन त्या काळच्या प्रथेनुसार लॅटिन भाषेत असून त्याच्या ह्या लेखनाची अनेक संपादने तसेच इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. 

संदर्भ : Easton, S. C. Roger Bacon and His Search for a Universal Science, New York, 1952.

रेगे, मे. पुं.