बेकन, फ्रान्सिस:(२२ जानेवारी १५६१ – ९ एप्रिल १६२६). इंग्लिश राज्यधुरंधर व तत्त्ववेत्ते. प्रबोधनकालीन अनेक महान व्यक्तींप्रमाणे बेकन ह्यांचे बौद्धिक व्यक्तिमत्त्व विविधांगी होते. कायदा, राज्यकारभार, विज्ञान, तत्त्वज्ञान, तत्त्वचतुषअटयी इ. क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. परंतु आधुनिक विज्ञानाचे तत्त्ववेत्ते आणि प्रेषित म्हणून बेकन यांना आज प्रामुख्याने ओळखण्यात येते.

बेकन यांचे वडील सर निकोलस बेकन हे एलिझाबेथ राणीच्या दरबारात वरिष्ठ हुद्यावर होते. त्यांची आई उत्कट धार्मिक वृत्तीची आणि प्यूरिटन पंथाची होती. ह्या दोघांच्या शिकवणीचे संस्कार बेकन यांच्या व्यक्तिमत्त्वावर उमटले होते आणि म्हणून त्याच्यात एक खोल अंतर्विरोध होतो. राजनीतिज्ञ म्हणून त्यांनी मोठ्या पदावर चढावे आणि नाव कमवावे अशी त्यांच्या वडिलांची महत्त्वाकांक्षा होती, तर पापभीरू वृत्तीने शुद्ध आणि सात्विक जीवन त्यांनी जगावे अशी त्यांच्या आईची शिकवण होती.

वयाच्या बाराव्या वर्षी बेकन यांनी केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि अल्पवयातच आपल्या असाधारण बुद्धिमत्तेने त्यांनी नाव कमाविले. त्यांच्या अठराव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. चरितार्थासाठी कायद्याच्या व्यवसायात उतरावे असा बेकन यांनी निर्णय केला आणि लवकरच आवश्यक ती व्यावसायिक पात्रता संपादन केली. वयाच्या तेवीसाव्या वर्षी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ चे ते सभासद झाले. एसेक्सचे अर्ल हे एलिझाबेथ राणीच्या खास मर्जीतील उमराव बेकन यांचे जीवलग मित्र होते आणि बेकन यांना मोठ्या हुद्याचे स्थान द्यावे म्हणून राणीचे मन वळविण्यासाठी त्यांनी बरची खटपट केली. पण राणीचे करविषयक जे धोरण होतेत्यावर फ्रान्सिस बेकनबेकन यांनी पार्लमेंटमध्ये टीका केली होती म्हणून कदाचित राणीला बेकनविषयी अविश्वास वाटत होता. आपल्या खटपटीला यश येत नाही असे पाहून एसेक्स यांनी स्वतःच बेकन यांना चांगल्या मिळकतीचा जमिनजुमला बहाल केला. पुढे एसेक्स राणीच्या मर्जीतून उतरले आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश राणीने बेकन यांना दिला. तो बेकन यांनी पाळला आणि एसेक्स यांना मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावण्यात येऊन ती अंमलातही आणली गेली. आपल्या कृत्याचे समर्थन करण्यासाठी व मित्रद्रोह आणि कृतघ्नता ह्या आरोपांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बेकन यांनी एक पुस्तिका प्रसिद्ध केली.

एलिझाबेथच्या मृत्यूनंतर पहिले जेम्स जेव्हा गादीवर आले तेव्हा बेकन झपाट्याने वर चढले. ‘सॉलिसिटर जनरल’ (१६०७), मग ‘ॲटर्नी जनरल’ (१६१३), नंतर ‘लॉर्ड कीपर ऑफ द ग्रेट सील’ (१६१७) ह्या पदांवर त्यांची नेमणूक झाली. हे शेवटले पद त्यांच्या वडिलांनी धारण केले होते. एका कैद्याचा शारीरिक छळ करून त्याच्याकडून कबुलीजबाब घेण्याच्या कामात राजाला साहाय्य केल्यामुळे बेकन यांना आणखी पदोन्नती मिळाली. त्यांना ‘लॉर्ड चॅन्सेलर’ म्हणून नेमण्यात आले (१६१८) तसेच उमरावही बनविण्यात आले. नंतर बेकन ‘बॅरन व्हेरूलम’ आणि ‘व्हायकाउन्य सेन्ट आल्बान्स’ (१६२१) बनले.

पण वयाच्या साठाव्या वर्षी त्यांना एकाएकी वाईट दिवस आले. न्यायदानाच्या कामात त्यांनी लाच घेतली हा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला व त्यांना सर्व पदांवरून बडतर्फ करण्यात आले. बेकन यांनी हा आरोप अमान्य केला नाही. पण आपण प्रचलित प्रथेला अनुसरून वागलो आणि हे वागणे गैर असले, तरी त्यासाठी एवढी घोर शिक्षा होणे हे आपले दुर्दैव होते अशीच त्यांची भूमिका होती. बडतर्फीनंतरबेकन यांनी आपला काळ चिंतन-लेखनात घालविला. त्यांचा मृत्यू ज्या प्रकारे घडून आला तो त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत होता. मारलेल्या कोंबडीत बर्फ भरले तर मां‌स किती काळ टिकून राहते हे पाहण्यासाठी कडक हिवाळ्यात हिमवर्षाव होत असताना हिम गोळ करण्यासाठी ते लंडन बाहेर पडले. त्यांना थंडी भरून आली पण जवळच्या साध्या घरातील कोरड्या बिछान्यावर झोपण्याऐवजी एका प्रतिष्ठित उमरावाच्या प्रासादातील दमट खोलीत रात्र घालविणे त्यांनी पसंत केले. ह्याचा परिणाम म्हणून सर्दीतापाने त्यांचे निधन झाले.

बेकन यांनी आपले निबंध – एसेज – १५९७ मध्ये, वयाच्या ३६ व्या वर्षी, प्रसिद्ध केले. हे विशेषतः नैतिक विषयांवर आहेत. त्यांचे पुढील इंग्रजी व लॅटिन ग्रंथ जेम्स राजाच्या कारकीर्दीत ते मोठ्या अधिकारपदी असताना प्रसिद्ध झाले आहेत : द ॲडव्हान्समेंट ऑफ लर्निंग (१६०५, म. शी. ‘विद्येची प्रगती’), कॉजिटेटा एट्‌ व्हिसा (१६०७, ‘विचार व मुखवटे’), डी सॅपिसन्टिआ व्हेटेरम्‌ (१६०९, ‘जुने शहाणपण’), नोव्हम्‌ ऑरगॅनम्‌ (१६२०, ‘नवीनीकरण’), डी ऑग्नेमेन्टिस सायन्सिॲरम्‌ (१६२३, ‘विज्ञानाची वाढ’) आणि न्यू ॲटलान्टिस्‌ (१६२६, ‘नवीन ॲटलान्टिस्‌). त्यांचे सर्व लेखन जेम्स स्पिडींग, आर्‌. एल्‌. एलिस व डी. डी. हीथ यांनी एकत्रित व संपादित करून लंडन येथून १४ खंडांत प्रसिद्ध केले (१८५७ – ७४).


तत्त्वज्ञान:बेकन हे आधुनिक विज्ञानाचे प्रेषित होते आणि आधुनिकतेचे पुरस्कर्ते होते. प्लेटो-ॲरिस्टॉटल इ. पारंपारिक तत्त्ववेत्त्यांच्या दर्शनांचा त्यांनी अव्हेर केला, कारण कोळी जसा स्वतःच्या अंगातून सुरेख जाळे निर्माण करतो त्याप्रमाणे हे तत्त्ववेत्ते स्वतःच्या मनांतून उत्कृष्ट तार्किक बांधणीची दर्शने निर्माण करतात पण ह्या दर्शनांचा वास्तवतेशी काही संबंध नसतो असे त्यांचे म्हणणे होते. उलट किमयागार – ‘अल्केमिस्ट’ -, वैदू इ. लोकांजवळ अनुभवांपासून लाभलेल्या माहितीचा खूप मोठा साठा असतो, पण तो अस्ताव्यस्त असतो. संकल्पना आणि सामान्य नियम यांच्या साहाय्याने त्याची व्यवस्था लावण्यात आलेली नसते. मुंग्या ज्याप्रमाणे सापडतील ते कण गोळा करून त्यांचा साठा करतात तसा हा प्रकार असतो. कोळी आणि मुंगी यांच्याऐवजी मधमाशीचे उदाहरण ज्ञानाच्या क्षेत्रात अनुसरणे श्रेयस्कर ठरेल. मधमाशा एकत्रितपणे मध गोळा करतात आणि नीट रचलेल्या पेाळ्यात तो साठवितात. त्याप्रमाणे माणसांनी एक‌त्र येऊन पद्धतशीरपणे निरीक्षण करून माहिती गोळा करावी, तिचा विचक्षणपणे अर्थ लावावा, प्रयोग करावे आणि दडलेले निसर्गनियम शोधून काढावे.

संशोधकांनी ए‌कत्रितपणे आणि पद्धतशीरपणे निरीक्षण आणि प्रयोग करावे आणि जी दत्ते (डेटा) लाभतील त्यांचा अर्थ लावून त्यांच्यामागे दडलेले, पण त्यांच्यातून सूचित होणारे सामान्य निसर्गनियम शोधून काढावेत, त्याच्यावर बेकन यांचा भर होता. आधुनिक वैज्ञानिक संशोधन सांघिक आणि पद्धतशीर असते. भावी काळात वैज्ञानिक संशोधनाचे संघटन कोणत्या पद्धतीने होईल याची पूर्वकल्पना बेकन यांना होती. वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी एक वैज्ञानिक परिषद स्थापन करावी, ऑक्सफर्ड व केंब्रिज येथे विज्ञानाचे प्राध्यापक नेमण्यात यावेत अशा योजना बेकन यांनी जेम्स राजाला सादर केल्या होत्या. पण राजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पुढे जेम्सचा नातू दुसरा चार्ल्स याने विज्ञानाच्या पद्धतशीर अभ्यासासाठी ‘रॉयल सोसायटी’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

सारांश, बेकन हे पुरोमुख, पुढे पाहणारे, भविष्याचे प्रेषित होते. ज्ञानाविषयीची एक नवीन संकल्पना आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याचीएक नवीन पद्धती त्यांना प्रस्थापित करायची होती. मध्ययुगीन ‘स्कोलॅस्टिक’ तत्त्वज्ञान त्यांना नापसंत होते, कारण त्याच्यात एका प्रश्नाविषयीच्या वादातून दुसरा एक विवाद्य प्रश्न निर्माण होत असे सत्य काय आहे ह्याचा अंतिम निर्णय करण्याची रीत ह्या तत्त्ववेत्त्यांकडे नव्हती. प्रबोधकालीन मानवतावादी विचारवंत ग्रीक साहित्यिकांच्या शैलीने एवढे भारावून गेले होते, की वक्तृत्वपूर्ण शैली म्हणजे त्यांना सर्वस्व वाटत असे आशयाचे त्यांना महत्त्व नव्हते. ईश्वराने जे पदार्थ आणि जीव निर्माण केले आहेत, त्यांचे ज्ञान माणसाने मिळविले पाहिजे. हे ज्ञान मिळविण्याने ईश्वराचा गौरव आपण करतो हे तर झालेच, पण माणसाच्या कष्टांचा आणि दुःखाचा परिहार करण्याची शक्तीही ह्या ज्ञानापासून मिळते. ज्ञान म्हणजे शक्ती होय, ज्ञान उपयुक्त असते, ह्या ज्ञानाकडे पाहण्याच्या दृष्टीचा उगम बेकन यांच्या विचारात आहे.

कित्येक गैर कल्पना मानवी मनात मूळ धरून असतात व त्यांच्यामुळे खरे ज्ञान संपादन करण्यात अडथळे निर्माण होतात, असे बेकन यांचे म्हणणे आहे. ह्या गैर कल्पनांना बेकन ‘आयडॉल्स’- मूर्ती, खोटे देव-म्हणतात आणि त्यांच्या भजनी लागल्यामुळे माणसे खरे ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या मार्गापासून ढळतात असे बेकन यांचे ‌निदान आहे. आपल्या ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला वस्तूची जी ‘प्रथमदर्शने’ घडविण्यात येतात ती पूर्णपणे प्रमाण आहेत असे मानण्याची प्रवृत्ती तसेच काकतालीय न्यायाने घडलेले प्रसंग हे नियमाना अनुसरून घडतात असे मानण्याची प्रवृत्ती सर्वच माणसांत आढळून येते. सर्वसाधारण माणसात ह्या प्रवृत्ती वसत असल्यामुळे बेकन त्यांना ‘जमातीचे खोटे देव’ असे म्हणतात. उलट प्रत्येक माणसाचे मन म्हणजे त्याची एक खाजगी गुहा असते आणि व्यक्तीच्या भावना, इच्छा, प्रवृत्ती यांच्यामुळे वस्तुस्थितीचे त्याला होणारे दर्शन रंजित आणि विकृत होते. ह्या प्रकारच्या विकृतींना बेकन ‘गुहेतील खोटे देव’ म्हणतात. तिसऱ्या प्रकारचे ‘खोटे देव’ बाजारात आढळतात. म्हणजे जेथे माणसे एकत्र येऊन परस्परांशी संभाषण करतात किंवा विचारविनिमय करतात तेथे हे आढळतात. सरळ भाषेत असे म्हणता येईल की भाषेच्या गैरवापरामुळे काही गैरसमजुती व तर्कदोष निर्माण होतात, ह्यामुळे सत्यज्ञानाला आचवतात. ‘खोट्या देवां’चा शेवटचा प्रकार म्हणजे रंगभूमीवरील खोटे देव. रंगभूमीवर ज्याप्रमाणे कल्पित घटना घडतात, वास्तव घटना घडत नाहीत, त्याचप्रमाणे तत्त्ववेत्त्यांनी जी दर्शने रचली आहेत ती वास्तव जगाचे स्वरूप स्पष्ट करीत नाहीत, तर ही दर्शने म्हणजे तत्त्ववेत्त्यांनी निर्मिलेली कल्पित विश्वे असतात. ह्या तत्त्ववेत्त्यांच्या सिद्धांतांवर विश्वास ठेवणे म्हणजे रंगभूमीवरील खोट्या देवांवर विश्वास ठेवणे होय.

ह्या खोट्या देवांना सोडून ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या प्रमाण पद्धतीचा अवलंब आपण केले पाहिजे. ही प्रमाण पद्धती कोणती? बेकन यांच्या मताप्रमाणे ज्ञान हे कारणाचे ज्ञान असते. एखाद्या प्रसंगाचे ज्ञान होणे म्हणजे त्याच्या कारणाचे ज्ञान होणे, म्हणजे कोणत्या पूर्वी घडलेल्या किंवा अस्तित्वात असलेल्या घटकांचा समूहानंतर नियमाने, निरपवादपणे तो प्रसंग घडून येतो हे ज्ञान होणे. तेव्हा कोणत्याही प्रसंगाचे ज्ञान जेव्हा आपल्याला होते तो प्रसंग म्हणजे एका सामान्य नियमाचे उदाहरण आहे अशा स्वरूपाचे ते ज्ञान असते. तेव्हा ज्ञानाची पद्धती म्हणजे सामान्य कार्यकारणनियम शोधून काढण्याची पद्धती होय. ह्या पद्धतीच्या वापराची पहिली पायरी म्हणजे ज्या प्रकारच्या घटनेचे कारण शोधून काढायचे असेल ती त्या भिन्नभिन्न परिस्थितीत घडून येते त्या सर्वांचे नि‌रीक्षण करणे ही होय. ह्यानंतर ह्या उदाहरणांची तुलना करून त्यांतील समान घटक शोधून काढणे ही दुसरीपायरी. ह्या तुलनेला बेकन ‘अस्तित्वाची सारणी’-टेबल ऑफ ॲफर्मेशन -म्हणतात, पण ह्याबरोबरच वरील प्रकारच्या परिस्थितीशी काही बाबतीत सारख्या असणाऱ्या पण ज्याच्यात ही घटना घडून येत नाही अशा नास्तिवाची उदाहरणांचीही अस्तिवाची उदाहरणांशी तुलना करणे आवश्यक असते. ह्या तुलनेला बेकन ‘नास्तिवाची सारणी’ म्हणतात. उदाहरणांची तिसऱ्या प्रकारची तुलना म्हणजे एकाच वेळी बदलत जाणाऱ्या दोन घटनांची तुलना होय. एका घटनेतील बदलाचे दुसऱ्या घटनेतील बदलाशी काही निश्चित प्रमाण असते का हे पडताळून पाहणे, हे ह्या तुलनेचे उद्दिष्ट असते. हिला बेकन ‘तुलना सारणी’-टेबल ऑफ कंपॅरिझन म्हणतात. सामान्य निसर्गनियम शोधून काढण्याच्या उद्देशाने विशिष्ट वस्तूंचे व घटनांचे जे निरीक्षण करावे लागते त्यात कित्येक प्रकारच्या उदाहरणांच्या निरीक्षणाला मोक्याचे स्थान असते असे बेकन यांचे म्हणणे आहे. अशा उदाहरणांना ते ‘विशेषाधिकारी उदाहरणे’- प्रेरोगेटिव्ह इन्स्टन्सिस म्हणतात. उदा., दोन विरुद्ध उपपत्ती सारख्याच ग्राह्य वाटत असताना त्यांच्यात निवड करायला भाग पाडेल असे ‘निकष-उदाहरण’ – क्रुशिअल इन्स्टन्स असू शकते. किंवा एखाद्या उदाहरणाच्या ठिकाणी डोळ्यात भरण्याजोगा विशेष असतो. उदा., पाऱ्याचे वजन. अशा विशेषाधिकारी उदाहरणांचे बेकन यांनी २७ प्रकार मानले आहेत. आधुनिक विज्ञानाची जी विगामी पद्धती आहे तिचा पाया बेकन यांनी रचला, ह्या विधानात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. [⟶ तर्कशास्त्र, विगामी].


बेकन यांच्या ज्ञानमीमांसेतील एक बुचकळ्यात टाकणारे मत असे, की ‘रूप’ किंवा ‘आकार’ – फॉर्म – हाच ज्ञानाचा खरा विषय असतो. म्हणजे ज्ञान हे रूपाचे ज्ञान असते. हा ⇨ प्लेटो (इ.स.पू.सु. ४२८- सु. ३४८) याचा सिद्धांत होता आणि एवढ्यापुरती बेकन यांनी प्लेटोची भलावण केली आहे. पण ‘रूपा’ चा बेकन यांनी अभिप्रेत असलेला अर्थ काय होता हे एक गूढ आहे. प्लेटोने कल्पिलेल्या रूपांप्रमाणे बेकन यांची रूपे निसर्गातीत नाहीत. ती निसर्गातील वस्तूंत बसणारी रूपे आहेत आणि ही रूपे म्हणजे ज्यांच्यापासून वस्तू निःसृत होतात असे वस्तूंचे उगम होत, असे त्यांचे बेकन यांनी वर्णन केले आहे. ज्यांना ⇨ जॉन लॉक (१६३२-१७१४) ‘प्राथमिक गुण’ म्हणतो- म्हणजे वस्तूंचा आकार, घनता, विस्तार, संख्या इ. गुण – तीच बेकन यांची रूपे होत असा अनेकांचा तर्क आहे. लॉकच्या मताप्रमाणे भौतिक वस्तू ह्या प्राथमिक गुणाशिवाय असू शकत नाहीत रंग, वास इ. दुय्यम गुण वस्तूच्या ठिकाणी असत नाहीत, ते मनाला वस्तूच्या ठिकाणी अनुभवाला येतात आणि वस्तूच्या ठिकाणी केवळ प्राथमिक गुण आहेत असे मानले, तर विज्ञान तिच्या सर्व स्थित्यंतरांचा आणि पाहणाऱ्याला तिच्या ठिकाणी भासणाऱ्या दुय्यम गुणांचा उलगडा करू शकते. बेकनला जी रूपे अभिप्रेत होती त्यांचे निसर्गातील वस्तूंच्या संदर्भातील स्थान व कार्य ह्याच स्वरूपाचे होते असा त्यांचा अर्थ लावणे शक्य आहे.

मानवी ज्ञानाच्या प्रांताचे बेकन यांनी दोन भाग कल्पिले आहेत:एक देवशास्त्र आणि दुसरा निसर्ग-तत्त्वज्ञान. निसर्ग-तत्त्वज्ञानाचे दोन प्रांत आहेत : एक औपपत्तिक आणि दुसरा व्यावहारिक. औपपत्तिक भागात केवळ घटनांच्या कारणांचे स्पष्टीकरण करण्यात येते. व्यावहारिक भागात ह्या ज्ञानाचा उपयोग करून इष्ट घटना घडवून आणण्यात येतात. म्हणजे तंत्रज्ञानाला बेकन ज्ञानाच्या प्रांतात स्थान देतात. ह्याच्यात त्यांची ‘आधुनिकता’ दिसून येते. राज्यशास्त्रातही बेकन यांनी ह्याच प्रवृत्तीला अनुसरून सरंजामी व्यवस्थेला विरोध केला आणि ज्याच्यात सार्वभौम सत्ता केंद्रीभूत झालेली असते अशा आधुनिक राज्यव्यवस्थेचा पुरस्कार केला.

रेगे, मे. पुं.

  

वाङ्मयीन कर्तुत्व : जागतिक साहित्यात बेकन ह्यांना कीर्ती प्राप्त झाली, ती मुख्यतः त्यांनी लिहिलेल्या निबंधांमुळे. बेकनकृत एसेजच्या -संपूर्ण शीर्षक द एसेज, ऑर काउन्सेल्स, सिव्हिल अँड मॉरल -तीन आवृत्त्या बेकन ह्यांच्या हयातीत निघाल्या (१५९७, १६१२, १६२५). पहिल्या आवृत्तीत दहा, दुसऱ्या आवृत्तीत अडतीस आणि तिसऱ्या आवृत्तीत अठ्ठावन्न निबंधांचा समावेश आहे. बेकन ह्यांच्या निबंधग्रंथाच्या शीर्षकात ‘काउन्सेल्स, सिव्हिल अँड मॉरल’, असे जे शब्द आले आहेत, त्यांवरून हे निबंध लिहिण्यामागचा बेकन ह्यांचा हेतू स्पष्ट होतो. नैतिक विषयांवरील हे निबंध आहेत. तथापि बेकनना अभिप्रेत असलेली नीती ही व्यावहारिक नीती असून लौकिक यश कसे प्राप्त करून घ्यावे, हे त्यांनी ह्या निबंधांतून सांगितले आहे. बेकन ह्यांच्या सूक्ष्म निरिक्षणशक्तीचा प्रत्यय, त्यांतील विवेचनातून येतोच. तथापि हे निबंध लिहिताना बेकन ह्यांनी भाषेचा उपयोग किती मार्मिकपणे आणि परिणामकारक रीत्या केला आहे, ह्याचीही प्रचिती येते. त्यांच्या निबंधांत जागोजाग आढळणारी जोमदार सुभाषिते व प्रभावी प्रतिमा त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. बेकन ह्यांची अनेक सुभाषिते इंग्रजी भाषासरणीचे एक अविभाज्य अंग होऊन बसली आहेत म्हणी आणि वाक्प्रचार म्हणून ती रूढ झाली आहेत. उदा., ‘सम बुक्‌स आर टु बी टेस्टेड, आदर्स टु बी स्वॅलोड अँड सम फ्यू टु बी च्यूड अँड डायजेस्टेड’ ‘रीडिंग मेक्स अ फुल मॅन कॉन्फरन्स अ रेडी मॅन अँड रायटिंग ॲन एक्झॅक्ट मॅन…’ (-‘ऑफ स्टडीज’) ‘ही दॅट हॅथ वाइफ अँड चिल्ड्रन हॅथ गिव्हन होस्टेजिस टू फॉर्‌च्यून’ (‘ऑफ मॅरेज अँड सिंगल लाइफ’). अनेकदा अभिजात तत्त्वचतुषअटयीकृतींतील उद्‌घृते नमूद करून ते आपल्या निष्कर्षांना आधार देत असत.

बेकन यांच्या अन्य उल्लेखनीय ग्रंथांत डी सॅपिएन्टिआ व्हेटेरम्‌, हिस्टरी ऑफ हेन्री द सेव्हन्थ (१६२२), ॲपफ्‌थेम्स : न्यू अँड ओल्ड (१६२४) आणि न्यू ॲटलान्टिस ह्यांचा समावेश होतो. निसर्ग तत्त्वज्ञानाचे सिद्धांत ग्रीक मिथ्यकथांत दडलेले आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न डी सॅपिएन्टिआ… ह्या ग्रंथात बेकन यांनी केलेला आहे. हिस्टरी ऑफ हेन्री द सेव्हन्थ ह्या इतिहासग्रंथात त्यांनी त्या वेळी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहितीत काही नवी भर घातलेली दिसते. जिवंत शैलीत रेखाटलेली जिवंत व्यक्तिचित्रे हे ह्या ग्रंथांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. विशेषतः सातव्या हेन्रीचे त्यांनी सूक्ष्मदर्शीपणाने रंगविलेले व्यक्तिचित्र त्यांच्या आधीच्या इतिहासकारांनी काढलेल्या व्यक्तिचित्रांच्या पार्श्वभूमीवर वेगळे उठून दिसते. फ्‌थेम्स… मध्ये त्यांनी संकलित केलेली नवी-जुनी नीतिवचने (सु. ३००) आहेत. न्यू ॲटलान्टिसमध्ये एका काल्पनिक बेटावरील सामाजिक परिस्थिती, संख्या, ‌रीतिरिवाज इत्यादींच्या वर्णनातून त्यांनी आपली आदर्श राज्याची संकल्पना साकार केली आहे.

कुलकर्णी, अ. र.

संदर्भ : 1. Anderson, F. H. The Philosophy of Francis Bacon, Chicago, 1948.  

           2. Brown, Catherine D. Francis Bacon, Boston, 1963.  

           3. Levin, J. Francis Bacon Viscount of St. Albans, London, 1925.