बेंथॅम, जॉर्ज: (२२ सप्टेंबर १८०० – १० सप्टेंबर १८८४). ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतींच्या वर्गीकरणासंबंधीचे त्यांचे कार्य महत्त्वाचे असून वनस्पतींच्या आधुनिक वर्गीकरणाच्या दृष्टीने ते पायाभूत ठरले आहे. त्यांचा जन्म स्टोक (इंग्लंड) येथे झाला. लिंकन्स इनमध्ये कायद्याचा अभ्यास केल्यावर काही काळ (१८२६ – ३२) ते आपले काका प्रसिद्ध तत्त्वज्ञ ⇨ जेरेमी बेंथॅम यांचे सचिव होते. १८३३ साली त्यांनी वकिली सोडून दिली व वनस्पतींविषयक कार्याला वाहून घ्यायचे ठरविले. १८५४ साली त्यांनी एक लाखाहून जास्त वनस्पतींच्या नमुन्यांचा आपला संग्रह क्यू (लंडन) येथील रॉयल बोटॅनिकल गार्डनला प्रदान केला. या उद्यानाचे तेव्हाचे संचालक ⇨ सर जोसेफ डाल्टन हूकर यांनी त्यांना तेथेच बोलावून घेतले आणि बेंथॅम मृत्यूपर्यंत तेथेच होते. या काळात त्यांनी वर्णनात्मक वनस्पतिविज्ञानावर बरेच ग्रंथ लिहिले. त्यांनी ⇨ ऑगस्टीन पीराम दे कांदॉल यांच्या वर्गीकरण पद्धतीवर आधारलेल्या आपल्या पद्धतीचा प्रसार केला आणिजे. डी. हूकर यांच्या बरोबर लिहिलेल्या Genera Plantarum (३ खंड, १८६२ – ८३) या ग्रंथात ती समाविष्ट केली. या ग्रंथात ९७,२०० पेक्षाही जास्त वनस्पति-जाती समाविष्ट केलेल्या आहेत. ते पिरेनीज पर्वतावरील वनस्पतींच्या अभ्यासासाठी त्या भागात गेले होते. आउटलाइन्स ऑफ अ न्यू सिस्टीम ऑफ लॉजिक (१८२७), हॅंडबुक ऑफ ब्रिटिश फ्लोरा (१८५८), Labiatarum genera et species (१८३२), Flora Hongkongenis (१८६१), Flora Australlensis (७ खंड, १८६३ – ७८) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.

बेंथॅम लिनियन सोसायटीचे सदस्य (१८२८) व अध्यक्ष (१८६१-६४), रॉयल सोसायटीचे सदस्य (१८६३) व रॉयल हार्टिकल्चरल सोसायटीचे मानद सचिव (१८२९-४०) होते. त्यांना रॉयल पदक (१८५९), केंब्रिज विद्यापीठाची एल्‌एल्. डी. पदवी (१८७४) इ. बहुमान मिळाले होते, ते लंडन येथे मृत्यू पावले. 

                                                                                                                                               जमदाडे, ज. वि.