बूलगाकॉव्ह, म्यिखईल : (१५ मे १८०१-१०मार्च १९४०). रशियन कथा-कादंबरीकार आणि नाटककार. कीव्ह येथे जन्मला. शिक्षण कीव्ह येथे. १९१६ मध्ये वैद्यक विषयाची पदवी मिळविल्यानंतर अल्प काळ वैद्यकीय व्यवसाय केला पण नंतर तो सोडून देऊन लेखनाकडे वळला. १९१९ पासून निबंध, कथा असे लेखन वर्तमानपत्रांतून आणि अन्य नियतकालिकांतून केले. १९२१ मध्ये तो मॉस्कोला आला. दियावलिआदा (१९२५, इं.शी. डेव्हिलरी) हा त्याचा पहिला कथासंग्रह. उपरोधप्रचुर, विनोदी शैलीत सोव्हिएट रशियातील नोकरशाहीचे वास्तववादी चित्रण त्यातील कथांत आढळते. त्यानंतर ब्येलाया ग्वारदीया (1925, इं.शी. द व्हाइट गार्डस), मास्तेर इ मारगरीता (1966-67, इं.भा. मास्टर अँड मार्गरीता, १९६७) ह्यांसारख्या कादंबऱ्या आणि द्नी तुर्बिनीख (१९२६, इं.शी. द डेज ऑफ टरबिन्स), ब्येग (१९२८, इं.शी. द फ्लाइट), मोल्येर (१९३६) ह्यांसारख्या नाट्यकृती त्याने निर्माण केल्या. मास्तेर इ मारगरीता ह्या कादंबरीचे लेखन त्याने १९२८ मध्ये सुरू केले आणि हयातभर तो ते करीत होता.
बूलगाकॉव्हच्या लेखनातून त्याच्यातील श्रेष्ठ विनोदकार आणि उपरोधकार प्रत्ययास येतो. स्वार्थ, भेकडपणा, क्रौर्य ह्या बूर्झ्वा प्रवृत्तींवर त्याने आपल्या साहित्यातून प्रखरपणे हल्ला चढविला तसेच अज्ञान आणि मागासलेपणा ह्यांवरही टीका केली. त्याच्या साहित्यावर सोव्हिएट रशियात बरीच टीका झाली होती. मॉस्को शहरी तो निधन पावला.
पांडे, म.प. (इं.) कुलकर्णी, अ.र. (म.)
“