बूबर, मार्टिन : (८ फेब्रुवारी १८७८-१३ जून १९६५). प्रसिद्ध अस्तित्ववादी धार्मिक तत्त्ववेत्ते. जन्म ऑस्ट्रियात व्हिएन्ना येथे. १८९६ ते १९०० ह्या कालखंडात व्हिएन्ना, लाइपसिक, बर्लिन आणि झुरिक ह्या विद्यापीठांत तत्त्वज्ञान आणि कलांचा इतिहास ह्या विषयांचे अध्ययन. ज्यू जमातीची अस्मिता आणि स्वायत्तता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाला वाहिलेल्या ज्यू राष्ट्रीय आंदोलनामध्ये (झायनिस्ट) त्यांच्या सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रांचा प्रवक्ता म्हणून १९०१-२४ पर्यंत त्यांनी काम केले. १९१६ ते २४ ह्या कालावधीत (Der Jude) ह्या ज्यू धर्मीय जर्मन मासिकाचे ते संपादक होते. जर्मनीतील ज्यूंमध्ये ह्या मासिकाला चांगली प्रतिष्ठा व आदराचे स्थान होते. १९२४ ते ३३ पर्यंत फ्रॅंकफुर्ट-ॲम-मेन ह्या विद्यापीठात ते ज्यू धर्म आणि नीतिशास्त्र या विषयांचे प्राध्यापक होते. १९२०-३८ पर्यंत ज्यू जमातीमध्ये प्रौढ शिक्षणाचे कार्य करणाऱ्या एका संस्थेचे ते अध्वर्यू होते. ह्या स्नावरून जर्मनीमध्ये हिटलरची सत्ता प्रस्थापित झाल्यावर जर्मन ज्यूंचे नीतिधैर्य बळकट करण्यात त्यांनी बहुमोल कामगिरी बजावली. १९३८मध्ये ते पॅलेस्टाइनला गेले. तेथील हिब्रू विद्यापीठात धर्माचे समाजशास्त्र ह्या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. अरब आणि ज्यू यांच्यात परस्पर संवाद साधण्यासाठी आणि ह्या दोन्ही जमातींचे सामायिक राज्य निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या ‘यिहुद आंदोलना’ ची स्थापना व नेतेपणही त्यांनी केले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जर्मनांनी दिलेले काही सन्मानही त्यांनी स्वीकारले. ज्यू लोकांवर केलेल्या भयानक अत्याचारांविषयी खराखुरा पश्चात्ताप झालेल्या जर्मनांशी सामंजस्य साधण्याची त्यांची वृत्तीच यात दिसून येते. जेरुसलेम येथे त्यांचा मृत्यू झाला.

मार्टिन बूबर

‘व्यक्तींमधील संवाद’ हे सूत्र बूबर यांच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. व्यक्ती व तिच्या जाणिवेचा विषय असलेली वस्तू यांच्या दरम्यानचा जो संबंध असतो, त्याचे स्वरुप् दोन व्यक्तींमधील संबंधाहून मूलतः भिन्न असते, ह्या तत्वावर त्यांच्या तत्त्वज्ञानाची रचना झालेली आहे. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामधील संबंधाचा निर्देश बूबर ‘मी-ते’ संबंध असा करतात, तर व्यक्ती आणि व्यक्ती यांच्या दरम्यानच्या संबंधाचा ‘मी-तू’ संबंधअसा ते निर्देश करतात. ‘मी-ते’ संबंध एकतर्फी असतो आणि म्हणूनतो खराखुरा संबंध नसतो.व्यक्ती वस्तूंचे निरीक्षण करते विश्वाचा, वस्तुजाताचा भाग म्हणून ती वस्तू व्यक्तीपुढे असते कोणत्या कार्यकारणनियमांना अनुसरुन तिच्यातील बदल घडून येतात, ती आणि इतर वस्तू यांच्यात कोणते गुणधर्म समान आणि कोणते भिन्न असतात ह्यांची दखल व्यक्ती घेत असते. पण ही निरीक्षणे आणि निर्णय व्यक्तीमध्ये घडून येतात. वस्तू बाह्य जगाचा भाग म्हणून केवळ संबंधित असते.

उलट, ‘मी-तू’ संबंधामध्ये जो ‘तू’ असतो तो त्या संबंधात सहभागी असतो, एकतर्फी संबंधाचा तो केवळ विषय नसतो. ‘मी-तू’ संबंधाच्या संदर्भात सबंध विश्वाकडे ‘तू’ च्या दृष्टीने पाहिले जाते ‘तू’ हा विश्वाचा भाग म्हणून ‘मी’ पुढे नसतो.

आता मी एखाद्या व्यक्तीलासुद्धा ‘मी-ते’ संबंधाचा विषय बनवू शकतो. अशा वेळी मी त्या व्यक्तीकडे एक वस्तू म्हणून पहात असतो, तिला एक वस्तू म्हणून वागवीत असतो. म्हणजे त्या व्यक्तीचे एक विशिष्ट स्वरुप आहे आणि तिची कार्ये विशिष्ट नियमाला अनुसरुन निर्धारित झालेली असतात असे मी मानतो. उदा., ही व्यक्ती एक बस कंडक्टर आहे किंवा माझा भांडखोर शेजारी आहे, इत्यादी. मग ती व्यक्ती माझ्या विश्वाचा भाग बनलेली असते आणि माझे तिच्याशी होणारे वर्तन तिच्याविषयीच्या माझ्या पूर्वनिश्चित आणि स्थिर कल्पनेला अनुसरुन होत असते.


तेव्हा ‘मी-ते’ संबंधामध्ये, बुबर म्हणतात, खराखुरा ‘वर्तमान क्षण‘ नसतो. हा संबंध भूतकालावर, पूर्वज्ञान, पूर्वकल्पना यांच्याकडून त्याचे स्वरूप निश्चित झालेले असते तसेच ‘मी-ते’ संबंधात सबंध `मी’ गुंतलेला नसतो. ‘मी’ चा `ते’ शी व्यवहार होत असताना ‘मी’ चा एक भाग ह्या सबंध व्यवहाराकडे, प्रेक्षक म्हणून, अलिप्तपणे पाहू शकतो.

उलट, ‘मी-तू’ हा खराखुरा दुतर्फी असा संबंध असतो त्याच्यात ‘तू‘ हाही ‘मी’ ला उद्देशून बोलत असतो. हे खरेखुरे, ‘वर्तमानकालीन’ बोलणे, त्या विशिष्ट क्षणाचे जिवंत बोलणे असते व म्हणून ‘मी’ ला त्याच्याकडे खरेखुरे ध्यान द्यावे लागते. हे बोलणे पूर्वनिर्धारित बोलणे नसते, तर ‘तू’ चे स्वतंत्र, ‘निर्मितीशील’ असे बोलणे असते. ‘तू’ चे बोलणे हे त्याच्या पूर्वनिश्चित स्वभावाला अनुसरुन होणार आहे असे जर ‘मी’ मानीत असेल, तर ‘मी’ ला ते ऐकून घेण्याचे कारण नसते, ते ऐकण्याचे केवळ सोंग तो करीत असतो. पण मग हा ‘मी-तू‘ संबंध नसतो तो ‘मी-ते‘ संबंध बनलेला असतो.

तेव्हा ‘मी-तू’ संबंधात एका व्यक्तीची ‘इतर’ व्यक्तीशी, संपूर्णपणे स्वतंत्र असलेल्या इतर व्यक्तीशी गाठ पडलेली असते ही ‘इतर’ व्यक्ती, तिच्या संपूर्ण स्वातंत्र्यानिशी ‘मी’ ला उद्देशून बोलत असते. म्हणून ह्या संवादात ‘मी’ आणि ‘तू’ आपापल्या संपूर्ण, स्वतंत्र व्यक्तिमत्वानिशी उतरलेल्या असतात आपल्या व्यक्तिमत्वाचा केवळ एक भाग घेऊन उतरलेल्या नसतात. म्हणून बूबर यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘मी-ते’ संबंधातील ‘मी’ हा ‘मी-तू’ संबंधातील ‘मी’ हून भिन्न असतो. एकच ‘मी’ कधी ‘मी-ते’ संबंधात तर कधी ‘मी-तू’ संबंधात उतरत असतो असे नसते. ‘मी-ते’ किंवा ‘मी-तू’ संबंधात हा संबंध ही मध्यवर्ती गोष्ट असते आणि कोणता संबंध स्थापित किंवा प्रचलित आहे ह्यावरून एक ध्रुव असलेल्या ‘मी’ चे स्वरूप निश्चित होते.

धार्मिक अनुभवात‘मी-तू’ संबंधाला मध्यवर्ती महत्व असते. जीवनात आपण सतत ‘मी-तू’ संबंध आणि ‘मी-ते’ संबंध यांच्यामध्ये स्थित्यंतर करीत असतो. एखाद्या व्यक्तीशी आपला ‘मी-तू’ संबंध जडलेला असतो पण अखेरीस आपल्याला मानसिक थकवा येतो, ‘तू’ चे `ते’- बनते आणि ‘मी-ते’- संबंध प्रस्थापित होतो. पण ज्या ‘तू’ चे ‘ते’ मध्ये परिवर्तन होऊच शकत नाही असा ‘तू’ म्हणजे ईश्वर होय. गूढवादी धर्मामध्ये परतत्वाच्या साक्षात्‌ अनुभवाद्वारे त्याच्यात जीवात्म्याने विलीन व्हावे अशी कल्पना असते. पण बूबर यांच्या म्हणण्याप्रमाणे बायबलप्रणीत धर्मात जीवात्म्याचा ईश्वराशी ‘मी-तू’- संबंधानुसार सतत चाललेला संवाद हे धर्माचे सार आहे, असे मानण्यात आले आहे. म्हणून बूबर ख्रिस्ती श्रद्धा आणि ज्यू श्रद्धा यांच्यात भेद करतात. ज्यू कल्पनेप्रमाणे ईश्वरावरील श्रद्धा हा ईश्वरावरील, त्याने दिलेल्या शब्दावरील भरवसा होय. उलट ख्रिस्ती श्रद्धा म्हणजे केवळ कित्येक विधानांच्या-उदा., ‘येशूची प्रकृती दिव्य आहे व त्याचे पुनरुत्थान झाले’ हे विधान – सत्यतेवरील गाढ विश्वास होय.

मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत बूबर ‘मी-तू’ संबंध मध्यवर्ती मानतात. उदा.,व्यक्तिनिरपेक्ष ऐतिहासिक शक्तींनी अपरिहार्यपणे प्रविष्ट केलेल्या एका केंद्राकडून नियंत्रित होणाऱ्या मार्क्सवादी समाजवादाची कल्पना ते अव्हेरतात. विशिष्ट समाजाने ‘मी-तू’ संबंधावर आधारलेल्या समाजवादी व्यवस्थेला आणि ह्या संबंधाच्या अनुरोधाने जिची सतत पुनर्रचना होत असते अशा व्यवस्थेला त्यांची मान्यता आहे. मानसोपचारातही उपचार करणाऱ्याने आपल्या विशिष्ट उपपत्तीमागे व तंत्रामागे दडता कामा नये, रुग्णाशी त्याने सतत खराखुरा संवाद साधला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

बूबर यांचे लेखन जर्मन व हिब्रू भाषेमध्ये असून त्यांच्या बहुतांश ग्रंथांची इंग्रजी भाषांतरेही झाली आहेत. त्यांतील महत्वाचे इंग्रजी भाषांतरित ग्रंथ पुढीलप्रमाणे : डॅनीएल : डायलॉग्ज ऑन रिअलायझेशन (जर्मन 1१९१३, इं.भा.१९६४) इझ्राएल ॲड द वर्ल्ड : एसेज एन अ टाइम ऑफ क्रायसिस (ज.१९२१-४३, इं.भा.१९६३) द ऑरिजिन ऍंड मीनिंग ऑफ हॅसिडिझम (ज.व हिब्रू १९२१-५४, इं.भा.१९६०) आय ॲड दाउ (ज.१९२२, इं.भा.१९५८) द प्रॉफेटिक फेथ (हि.१९४२, इं.भा. १९६०) फॉर द सेक ऑफ हेवन (ज.२ री आवृ.१९४३-४४, इं.भा.१९५३) पाथ्स इन यूटोपिया (हि.१९४७, इं.भा. १९५०) इक्लिप्स ऑफ गॉड : स्टडीज इन द रिलेशन्स बिट्वीन रिलिजन ॲड फिलॉसॉफी (इ.मा.१९५२) ॲट द टर्निंग : थ्री ॲड्रेसेस ऑन ज्यूडाइझम (इं.भा.१९५२).

पहा : अस्तित्ववाद ज्यू तत्त्वज्ञान ज्यू राष्ट्रीय आंदोलन.

संदर्भ :-     1.Cohen, A.A. Martin Buber, New York, 1957.

              2. Diamond, Malcoim, Martin Buber: Jewish Existentialist, New York, 1960.

              3.Friedman, Maurice, Martin Buber : The  Life of Dialogue, New York, 1960.

रेगे, मे.पुं.