बूखनर, एडूआर्ट : (२० मे १८६०-१३ ऑगस्ट १९१७). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. साखरेच्या किण्वनाचे (आंबविण्याच्या क्रियेचे) सबळ कारण यीस्टमधील एन्झाइमाची (जीवरासायनिक विक्रियांना मदत करणाऱ्या प्रथिनाची) क्रिया हे असून खुद्द यीस्ट कोशिका (पेशी) हे नाही, हे त्यांनी दाखवून दिले. या त्यांच्या महत्वाच्या कार्याबद्दल त्यांना १९०७ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांचा जन्म व पदवीपर्यंतचे शिक्षण म्यूनिक येथे झाले. काही काळ नोकरी केल्यावर त्यांनी आडोल्फ फोन बेयर त्यांच्या हाताखाली कार्बनी रसायनशास्त्राचे संशोधन केले, तर टेओडोर कुर्टिसउस यांच्या हाताखाली उयाझो ॲसिटिक अम्लाच्या विक्रियांविषयी संशोधन केले. त्यांचे बंधू हान्स यांनी किण्वनाकडे त्यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी कार्ल फोन नेअगेली यांच्या हाताखाली साखरेच्या अल्कोहॉली किण्वनावर संशोधन करून त्यासंबंधीचा पहिला संशोधनपर लेख लिहिला (१८८५). हे संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. (१८८८). नंतर पाच वर्ष बेअर यांच्या हाताखाली त्यांनी किण्वनाविषयी संशोधन केले. कील येथे रसायनशास्त्राचे (१८९५), ट्यूबिंगेन येथे वैश्लेषिक औषधी रसायनशास्त्राचे (१८९६), बर्लिनच्या कृषीमहाविद्यालयात (१८९८), ब्रेस्लौ (१९०९) आणि वुर्टस्बर्ग (१९११) विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९१४ साली ते कॅप्टन म्हणून जर्मन सैन्यात दाखल झाले व १९१६ साली ते मेजर झाले.
किण्वनाविषयी दोन प्रकारची उलटसुलट मते प्रचलित होती. काहींच्या (उदा., युस्टस फोन लीबिक) मते जीवहीन रासायनिक द्रव्याच्या साहाय्याने किण्वन घडविणे शक्य आहे. उलट काहींच्या (उदा., लुई पाश्चर) मते यीस्ट अथवा इतर जिवंत कोशिकेविना किण्वन घडणे शक्य नाही. यापैकी कोणते मत बरोबर आहे,हे ताडून पाहण्यासाठी बूखनर यांनी यीस्ट, बारीक वाळू व कीसेलगूर ही माती यांचे मिश्रण विशेष प्रकारे दळले.त्यामूळे यीस्टची एकही कोशिका जशीच्या तशी राहिली नाही. नंतर त्यांनी हा रस गाळून वाळू व कोशिकांचे अवशेष वेगळे काढले. राहिलेल्या द्रव पदार्थात साखर टाकल्यावर तिचे किण्वन झाल्याचे आढळून आले.यावरून किण्वनासाठी यीस्टच्या जिवंत कोशिकांची आवश्यकता नसल्याचे दिसून आले.जिवंत कोशिकांच्या चयापचयाद्वारे (कोशिकेत सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक विक्रीयांद्वारे) बनणाऱ्या एंझाइम नावाने ओळखण्यात येणाऱ्या जीवहीन रासायनिक द्रव्यांमुळे किण्वन होते, हे कळून आले,[⟶
एंझाइमे.,औद्योगिकसूक्ष्मजीवशास्त्र]. यीस्ट कोशिकांपासून झायमेज हे एंझाइम काढता येते, हे त्यांनी शोधून काढले. (१९०३). या एंझाइमामुळे साखरेचे अल्कोहॉल व कार्बन डाय – ऑक्साईड वायू यांच्यात रूपांतर होते. किण्वनाविषयीच्या संशोधनावरील त्यांचा महत्वाचा प्रबंध १८९७ साली प्रसिद्ध झाला. याशिवाय कार्बनी रसायनशास्त्रात केलेल्या संशोधनासंबंधीचे त्यांचे सु. ५० लेखही प्रसिद्ध झाले असून त्यात विविध कार्बनी संयुगांच्या संश्लेषणाची (कृत्रिम रितीने बनविण्याची) माहिती आली आहे.
फॉकशानी (रूमानिया) येथे ते युद्धात जखमी होऊन ते मृत्यु पावले.
जमदाडे, ज. वि.
“