बुलबुल : (लालबुड्या). या पक्षाचा पिक्नोनोटिडी या पक्षिकुलात समावेश होतो याचे शास्त्रीय नांव
पिक्नोनोटस कॅफर असे आहे. भारत, श्रीलंका आणि ब्रद्मदेशात हा आढळतो. सबंध भारतात १,२२० मी. उंचीपर्यंत तो सगळीकडे आढळतो. आकारमान आणि रंग यांच्या किरकोळ फरकांवरून लालबुड्या बुलबुलच्या सात-आठ प्रजाती केलेल्या आहेत.
बुलबुल पक्षी चिमणीपेक्षा मोठा व साळुंकीपेक्षा लहान असून त्याची लांबी २० सेमी असते. सबंध डोके आणि डोळा तकतीत काळ्या रंगाचा सगळे शरीर आणि पंख तपकिरी पंख, पाठ आणि छाती यांच्यावरील पिसांच्या कडा पांढऱ्या असल्यामुळे या भागांवर खवले असल्याचा भास होतो. पोटाकडचा आणि पाठीचा मागचा भाग पांढरा शेपटी काळसर तपकिरी शेपटीच्या बुडाखाली किरमिजी रंगाचा डाग असतो चोच व पाय काळे असतात. नर आणि मादी दिसायला सारखी असतात.
दाट जंगलात, झुडपे असणाऱ्या माळरानात आणि मनुष्यवस्तीच्या जवळपासच्या किंवा घराभोवतालच्या बागांत हा नेहमी असतो. हा झाडांवर किंवा झुडपांवर राहणारा आहे. यांची नेहमी जोडपी असतात. या पक्षाची वृत्ती नेहमी आनंदी असते. यांचा सुबक बांधा, रंग, धीटपणा आणि आनंदी वृत्ती यांमुळे हा सगळ्यांचा आवडता पक्षी आहे. सहज माणसाळणारा असल्यामुळे पुष्कळ लोक हा बाळगतात. हा अतिशय भांडकुदळ आणि नेटाने लढणारा असल्यामुळे काही लोक यांच्या झुंजी लावून त्यांवर पैजा लावून पैसा मिळवितात.
फळे, फुलातील मध आणि किडे हे याचे भक्ष्य होय. वडाची आणि पिंपळाची पिकलेली लाल फळे खाण्यासाठी आणि शेवरीच्या फुलातील मध पिण्यासाठी या झाडांवर बुलबुलांचे थवे जमतात. टणटणीची व घाणेरीची फळे याला फार आवडतात.
यांच्या प्रजोत्पादनाचा काळ मुख्यतः फेब्रुवारीपासून मेपर्यंत असतो निरनिराळ्या प्रदेशात तो काहीसा पुढे मागे होतो. घरटे वाटीसारखे
असून ते वाळलेले गवत व मुळ्यांचे बनविलेले असते व ते दाट झुडपात किंवा झाडावर उंच ठिकाणी असते. मादी गुलाबी पांढऱ्या रंगाची दोन किंवा तीन अंडी घालते. घरटे बांधणे, अंडी उबविणे आणि पिलांना भरविणे. ही कामे नर व मादी दोघेही करतात.
पहा : बुलंदी
कर्वे, ज. नी.
“