बुरशी : मृत जैव(सेंद्रिय) पदार्थांवर कापसाप्रमाणे अगर लोकरीप्रमाणे वाढणारी कवके [हरितद्रव्यरहित वनस्पती ⟶कवक] बुरशी या सर्वसामान्य नावाने ओळखली जातात. सोईसाठी प्रचारात असलेल्या या शब्दाला काटेकोर व्याख्या नाही व कवकाच्या शास्त्रीय वर्गीकरणात या कवकांचा वेगळा असा गट मानला जात नाही. त्यांचा समावेश कवकांच्या वेगवेगळया वर्गात किंवा उपवर्गात केला जातो. शिळी भाकरी, पाव, कुजणारी फळे, चामडी, दोर, लाकूड इ. वस्तूंवर दमट व उबदार हवामानात बुरशीची वाढ होते. बुरशीचे शरीर जाळयाप्रमाणे वाढणाऱ्या कवकतंतूंचेबनलेले असते. पृष्ठभागावरील काहीशा मखमलीसारख्या दिसणाऱ्या भागात कवकाचे बीजाणुधारक (सूक्ष्म प्रजोत्पादक घटक धारण करणारे) अवयव व बीजाणू असतात आणि वाढीच्या रंगावरून काळी बुरशी, हिरवी बुरशी, निळी बुरशी इ. नावांनी ती ओळखली जाते. बुरशीचे बीजाणू हवा व माती यांमध्ये सर्वत्र आढळून येतात. कंपोस्ट व शेणखतांचे ढीग, मृत वनस्पती व प्राणी यांसारख्या कुजणाऱ्या जैव पदार्थांवर, तसेच काही प्रमाणात समुद्राच्या पाण्यातही बुरशी आढळून येते, बुरशीमुळे मांस, फळे, अन्नपदार्थ, कागद, लाकडाच्या वस्तू, चामड्याच्या वस्तू, दोर इ. कुजल्यामुळे फार नुकसान होते. उष्ण कटिबंधात दुर्बिण, सूक्ष्मदर्शक, कॅमेरा यांसारख्या प्रकाशीय उपकरणांतील भिंगांवर वा आरशांवर बुरशी वाढल्याने त्यांच्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांमध्ये अस्पष्टता येते. विद्युत्प्रवाह वाहून नेणाऱ्या तारेवरील विद्युत्निरोधक आवरणावर बुरशी वाढल्यामुळे ते विद्युत्वाहक बनते. रबरावर व प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बुरशीची विनाशक क्रिया होते. बुरशीच्या काही जातींमुळे वनस्पती, जनावरे, मासे व मानव यांमध्ये रोग उत्पन्नहोतात.

बुरशी काही बाबतींत नुकसानकारक तशीच काही बाबतींत ती लाभदायकही असते. कुजणाऱ्या खतातील जैव पदार्थाच्या अपघटनातून (घटक द्रव्ये अलग होण्याच्या क्रियेतून)उत्पन्न होणाऱ्या पदार्थांमुळे जमिनीची सुपीकता वाढते. चीज या दग्धजन्य खाद्यपदार्थाच्या निर्मितीमध्ये बुरशीचा वापर केला जातो. पेनिसिलिनासारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक)औषधे, ॲसिटोन, ब्यूटेनॉल, सॉर्विटॉल आणि सायट्रिक, फ्यूमेरिक, ऑक्झॅलिक आणि इतर कार्बनी अम्लेइत्यादींची निर्मिती बुरशींच्या साहाय्याने केली जाते.  सूक्ष्मजंतू जिवंत राहणे शक्य नसते अशा परिस्थितीतही [उदा., अती तर्षण दाब (तर्षण), अम्लता, फारकमी प्रमाणातील जलांश], बुरशी वाढू शकते. ती संपूर्णपणे ऑक्सिजीवी (आक्सिजनाच्या उपस्थितीतच वाढणारी) असल्यामुळे अनॉक्सिजीवी पदार्थांबरोबर स्पर्धेत टिकू शकत नाही. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांवर ती वाढू शकत नाही. थंडीमुळे बुरशी नाश पावत नाही. शीतपेटीतही संत्र्यांवर पांढरीहिरवी बुरशी वाढताना आढळून येते. शीतपेटीच्या अतिशीत कप्प्यात या बुरशीची वाढ तात्पुरती थांबते परंतु शीतपेटीतून संत्री बाहेर काढल्यावर बुरशीची वाढ पुन्हा सुरू होते.

 पुनरूत्पत्ती : उबदार व ओलसर हवामानात बुरशींमध्ये बीजाणूंची फार मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते व त्यांपासून अनुकूल परिस्थितीत त्यांची पुनरूत्पती होते. काही विशिष्ट जातींमध्ये लैंगिक बीजाणूंची निर्मिती होते परंतु जवळजवळ सर्वच प्रकारच्या बुरशींमध्ये एक किंवा अनेक प्रकारचे अलैंगिक बीजाणूच आढळतात. [⟶ प्रजोत्पादन] .

महत्त्वाचे वंश व जाती : (अ) फायकोमायसिटीज : (शैवल कवक). या वर्गापैकी झायगोमायसिटीज उपवर्गातील म्यूकोरॅलीज गणात म्यूकरऱ्हायझोपस या वंशांतील जाती महत्त्वाच्या आहेत.

(१) म्यूकर : या वंशातील एकमेकांशी पुष्कळ साम्य असलेल्या अनेक जातींपैकी म्यूकर म्यूसीटोही विशेष परिचयाची शवोपजीवी (मृत जीवांवर उपजीविका करणारी) जाती कुजणाऱ्या खताच्या ढिगावर व कुजणारी फळे, भाजीपाला इ. अनेक जैव पदार्थांवर पांढऱ्या रंगाची व भरड लोकरीप्रमाणे वाढताना आढळून येते. त्यामुळे फळे व इतर पदार्थ कुजतात. या वंशातील एका जातीचा उपयोग अल्कोहॉलाच्या उत्पादनात तांदळातील स्टार्चाचे शर्करेत रूपांतर करण्यासाठी केला जातो.

(२) ऱ्हायझोपस : या वंशातील ऱ्हायझोपस निग्रिकॅन्सही जाती प्रसिद्ध असून ती विशेषेकरून उन्हाळयातील दमट हवामानात शिळ्या भाकरीवर अथवा पावावर वाढणारी `काळी‘ अथवा `सामान्य बुरशी‘ या नावाने सर्वांच्या परिचयाची आहे. या बुरशीमुळे बटाटे व इतर भाजीपाल्याचे बरेच नुकसान होते. फ्यूमेरिक अम्ल तयार करण्यासाठी आणि कॉर्टिसोन या हॉर्मोनाच्या उत्पादनातील काही टप्प्यांत या जातीचा व्यापारी प्रमाणावर उपयोग केला जातो.

म्यूकरऱ्हायझोपसच्या अनेक जातींमुळे मनुष्यामध्ये आंतरिक तंत्रिका तंत्राचे (मज्जासंस्थेचे) विकार होतात व काही वेळा मृत्यू, येतो. याच वर्गातील सॅप्रोलेग्नियालीज गणातील कवके `पाण बुरशी‘ अथवा `मासे बुरशी‘ या नावाने ओळखली जातात. ही बुरशी पाण्यात शवोपजीवी अथवा मासे व बेडूक यांवर जीवोपजीवी अवस्थेत वाढते.[⟶फायकोमायसिटीज].

 

(आ)ॲस्कोमायसिटीज : (धानीकवक). या वर्गात ॲऍस्परजिलेसी कुलातील ॲस्पजिलसपेनिसिलियम या वंशांत महत्त्वाच्या बुरशीच्या जाती आहेत.

(१) ॲस्परजिलस : या वंशातील ॲ. ग्लाउकस या प्रामुख्याने आढळून येणाऱ्या जातीचे अलैंगिक बीजाणू हिरव्या अथवा करड्या हिरव्या रंगाचे असतात. उष्ण कटिबंधातील दमट हवामानातील प्रदेशात ही बुरशी पाव, भाकरी, कपडे, फळांचे मुरंबे यांवर सर्वत्र आढळून येते व त्यामुळे फार नुकसान होते. ॲ. नायजर ही दुसरी सर्वत्र आढळून येणारी बुरशी असून तिच्या काळ्या रंगाच्या विबिजाणूंच्या (अलैंगिक रीतीने तयार झालेल्या बिजाणूंच्या) मोठ्या आकारमानाच्या पुंजक्यामुळे ती सहजपणे ओळखता येते. या बुरशीचा वापर करून सायट्रिक व क्लुकोनिक अम्ले आणि एंझाइमांचे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांचे)व्यापारी प्रमाणावर उत्पादन करतात.


ॲ. ओरायझीचा वापर जपानमध्ये तांदळापासून `साके‘ नावाचे मद्य तयार करण्यासाठी करतात. ॲ. पेन्टायचा उपयोग जावामध्ये सोयाबीनवरील प्रक्रियेसाठी करतात. बियांतील कठीण ऊतके (पेशी समूह) या बुरशीच्या क्रियेमुळे मोकळी होतात. या वंशातील ॲ. फ्युमिगेटस, ॲ. फलाषस, ॲ. नायजर आणि इतर काही जातींमुळे पशुपक्ष्यांना व मनुष्यांना `ॲस्परजिलोसीस‘ नावाने ओळखले जाणारे फुप्फुसाचे अथवा कानाचे विकार होतात.[⟶ गदाकवकजन्य रोग].

या वंशातील काही जातींपासून प्रतिजैव पदार्थ तयार करतात परंतु पेनिसिलिनाइतका प्रभावी प्रतिजैव पदार्थ कोणत्याही जातीपासून मिळालेला नाही. [⟶ॲस्परजिलस].

 

(२)पेनिसिलियम: या वंशातील जातीच्या बुरशी शिळा पाव, भाकरी, चीज, लिंबू वर्गीय व इतर फळे, भाजीपाला, साठवले धान्य व जास्त प्रमाणातील आर्द्रतायुक्त जैव पदार्थांवर वाढताना आढळतात. पे. रॉकफर्टायपे. कॅमेंबर्टी या जातींचा उपयोग रॉकफर्ट आणि कॅमेंबर्ट या चीजच्या सुप्रसिद्ध प्रकारांना स्वाद आणण्यासाठी करतात. पे. नोटॅटम आणि पे. क्रायसोजिन या जाती पेनिसिलीन या प्रतिजैवाच्या उत्पादनामुळे प्रसिद्ध पावल्या आहेत. पे. क्रायसोजिनमाच्या विबीजाणूंवर जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळया रंगाच्या पलींकडील अदृश्य) किरणांची क्रिया करून पेनिसिलिनाची जास्त उत्पादनक्षमता असलेले वाण शोधून काढण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळविले व त्यामुळे हे प्रतिजैव आता स्वस्त किंमतीत मिळू लागले आहे. 

 

पेनिसिलियम वंशाच्या अनेक जातींचा उपयोग सायट्रिक, फ्यूमेरिक, ऑक्झॅलिक, ग्लुकोनिक आणि गॅलिक ही कार्बनी अम्ले बनविण्यासाठी केला जातो. काही जातींमुळे जनावरे व मनुष्य यांना रोग जडतात परंतु ॲस्परजिलस वंशाइतका हा वंश याबाबतीत महत्त्वाचा नाही. [⟶निसिलियम].

घानीकवकाच्या एरिसायफेलीज गणातील कॅप्नोडिएसी कुलातील जातीमुळे `काजळी‘ या नावेने ओळखली जाणारी काळ्या रंगाच्या कवकजालाची बुरशी संत्री व इतर झाडांच्या पानांवर मावा वगैरे कीटकांच्या अंगातून स्त्रवणाऱ्या मधासारख्या चिकट स्त्रावावर शवोपजीवी अवस्थेत वाढते. कवकजाल कागदाप्रमाणे पातळ असून पानापासून ते सहजपणे अलग करता येते. स्फिरिएलीज गणातील न्यूरोस्पोरासिटोफिला ही जाती `लाली बुरशी‘ म्हणून ओळखली जाते. निरनिराळ्या बेकरी उत्पादनांवर ती वाढते व त्यामुळे फार नुकसान होते. आनुवंशिकीसंबंधीच्या संशोधनासाठी ही व याच वंशातील आणखी दोन जाती फार उपयुक्त ठरल्या आहेत. [⟶ ॲस्कोमायसिटीज].

 

(इ) फंजाय इंपरफेक्टाय: (अपूर्ण कवक). या वर्गात मोनिलिएसी कुलातील ट्रायकोथेसियमजिओट्रिकम आणि डिमॅटिएसी कुलातील क्लॅडोस्पोरियम व आल्टर्नेंरिया या वंशातील काही जातींचा बुरशीमध्ये समावेश केला जातो ट्रायकोथेसियम रोझियम ही गुलाबी रंगाची बुरशी प्रथम खवड्या रोगाने ग्रस्त झालेल्या सफरचंदांवर आढळते. जिओट्रिकम कॅंडिडम ही जाती दूध व त्यापासून तयार केलेल्या पदार्थांवर आढळते. क्लॅडोस्पोरियम वंशातील जाती कुजणारे लाकूड, पालापाचोळा, फळे इत्यादींवर गर्द हिरव्या अथवा काळपट करड्या रंगात आढळून येते. आल्टर्नेरिया वंशातील काही जाती कुजणाऱ्या वनस्पतींवर वाढतात.  

 

मोनिलिएसी कुलातील बुरशीच्या काही जातींवर जनावरे आणि मनुष्यांना चर्मरोग होतात उदा., गजकर्ण, चिखली [⟶कवकसंसर्ग रोग फंजाय इंपरफेक्टाय].

 

संदर्भ :    1.Alexopoulos, C.J.Introductory Mycology, New York, 1978.

            2.Bessey, E.A. Morphology and Taxonomy of Fungl, New York, 1964.

            3.Frobisher M.Fundamentals of Microblology. Tokyo, 1961

            4.Kavaler, L.Mushrooms, Moulds and Miracles, London, 1967.

            5. Prescott, S.C. Dunn, C.G.Industrial Microblology, New York, 1959.

 

रूईकर, स. के, परांडेकर, शं. आ. गोखले, वा. पु.