बुरदुर : तुर्कस्तानमधील याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ६१,७३५ (१९७० अंदाज). हे कोन्याच्या पश्चिमेस १९२ किमी. बुरदुर सरोवराच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले आहे. आंताल्या – आफ्यॉन्काराहिसार या महामार्गावर हे असून आफ्यॉन्काराहिसारहून येथे लोहमार्ग जातो.

मध्यमयुगात ते `पॉलिडॉरिअन‘ या नावाने ओळखले जाई. सेल्जुक तुर्कांनी या शहरावर बाराव्या शतकात

अंमल प्रस्थापित केला होता ऑटोमन साम्राज्यकाळात या शहराचा विकास घडून आला. विसाव्या शतकात, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर, एक औद्योगिक शहर म्हणून याची जडणघडण झाली. याच्या परिसरात कापडउद्योग, गुलाबाचे अत्तर, तांबे उत्पादन इ. उद्योग विकास पावले आहेत. येथील पुरावस्तुसंग्रहालय उल्लेखनीय आहे.

लिमये, दि. ह.