बुधवार : आठवड्यातील चथवा वार. या दिवसाच्या पहिल्या होऱ्याचा अधिपती बुध असतो म्हणून याचे बुधवार हे नाव पडले आहे. हिंदूंमध्ये हा विठ्ठलाचा वार मानला जातो. या दिवशी भाविक लोक विठ्ठलाचे क्षेत्र पंढरपूर सोडीत नाहीत.व काही लोक(विशेषतः माहेरी आलेल्या स्त्रिया)प्रवासाला निघत नाहीत. पैशांच्या व्यवहारास बुधवार अशुभ मानतात पण लेखन, अध्ययन वगैरेंची सुरुवात या दिवशी करावी, असा संकेत आहे. मुसलमान हा दिवस भाग्याचा मानतात. ट्युटॉनिक पुराणकथांतील प्रमुख देवता वोडन (ओडिन) वरून याला प्रथम वोडन्स डे (वोडनचा दिवस) हे नाव पडले व त्याचेच पुढे वेन्सडे झाले असावे. वारांना पुराणकथांतील देवतांची नावे देण्यास प्राचीन ग्रीकांनी सुरुवात केली. त्यांची चवथ्या दिवसाला बुधाचे नाव दिले होते व निरनिराळ्या पाश्चात्त्य भाषांमध्ये बुधाचा दिवस या अर्थी याची नावे आली आहेत (उदा., रोमन-मर्क्युराय, फ्रेंच-मर्क्रेदी इ.). रोमन कॅथलिक, अँग्‍लिकन वगैरे ख्रिश्चनांत ‘ॲशवेन्सडे’ हा महत्त्वाचा दिवस असून ईस्टर या सणाच्या आधी येणाऱ्या ‘लेंट’ या उपवासाच्या व पश्चात्तापाच्या काळाची सुरुवात या बुधावारी होते.

पहा : वार-१

ठाकूर, अ. ना.