बुध : सूर्यकुलातील सर्वांत लहान (कदाचित कुबेर-प्लुटो-याहून लहान असू शकेल) व सूर्याला सर्वांत जवळ असलेला ग्रह. शुक्र, मंगळ व गुरू यांच्या नंतरचा हा तेजस्वी ग्रह असून याची कक्षेतील गती (सरासरी सेकंदाला ४८ किमी.) सर्व ग्रहांमध्ये जास्त आहे. बुधाचे सूर्यापासूनचे अंतर ५ कोटी ७९ लाख किमी. म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतराच्या निम्म्याहून थोडे कमी आहे. बुध सूर्याभोवती विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) कक्षेत फिरतो आणि ही कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत असल्याने त्याला अंतर्ग्रह म्हणतात. यामुळे सूर्याभोवतीच्या प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळी तो सूर्य व पृथ्वी यांच्यामधून जातो. पृथ्वीवरून पाहिले असता बुध व सूर्य यांच्यातील कोनीय अंतर २८ अंशांपेक्षा जास्त होत नाही. सूर्याच्या पश्चिमेस सु. ११ अंशांहून दूर अंतरावर गेल्यावर सूर्योदयापूर्वी पूर्व आकाशात आणि सूर्याच्या पूर्वेस ११ अंशांहून जास्त अंतरावर असतो तेव्हा संध्याकाळी पश्चिम आकाशात अगदी थोडा वेळ बुध दिसू शकतो. अशा प्रकारे उत्तर गोलार्धात मार्च-एप्रिलमध्ये संध्याकाळी तर सप्टेंबर-ऑक्टोबरात सकाळी हा चांगला पाहता येतो. याचा भासमान व्यास ५ ते १३ सेकंद एवढा आढळतो. बुध झगझगीत सूर्यप्रकाशाजवळच असल्याने लक्षपूर्वक पाहिल्यासच तो नुसत्या डोळ्यांनी अर्धा-पाऊण तास दिसू शकतो. तो नेहमीच क्षितिजानजीक दिसत असल्याने वातावरणाच्या धूसरतेमुळे तो पिवळट शेंदरी व मंद वाटतो आणि त्याचा प्रकाश क्षितिजाजवळून येताना भूपृष्ठानजीकच्या अधिक दाट वातावरणातून येत असतो म्हणून तो लुकलुकताना दिसतो. अंतर्युतीच्या किंवा बहिर्युतीच्या [⟶ युति] जवळपास नसेल तेव्हा बुध दिवसासुद्धा दुर्बिणीतून दिसू शकतो सूर्यग्रहणाच्या खग्रास अवस्थेत त्याची युती नसेल, तर तो दिवसा नुसत्या डोळ्यांनीही पाहता येतो. उदा., १६ फेब्रुवारी १९८० रोजी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी कारवार ते जगन्नाथपुरी या पट्ट्यात अनेकांना दुपारी तीनच्या सुमारास सूर्याच्या पूर्वेकडे बुध व शुक्र स्पष्टपणे दिसले होते. दुर्बिणीतून बुध पांढरट व कमी रेखीव दिसतो. तसेच त्याच्या पृष्ठावर करडे-काळे पट्टे दिसतात ते आपली जागा बदलत नाहीत.व त्यांच्या वेधांवरून बुधास अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा काळ काढण्याचे प्रयत्न झाले होते.बुधाला एकही उपग्रह नाही.

सुमेरियन काळात (इ.स. पू. ३०००) बुध ग्रह म्हणून माहीत होता. हेराक्लायटस (इ.स. पू. सहावे-पाचवे शतक) यांनी बुध व शुक्र पृथ्वीऐवजी सूर्याभोवती फिरत असल्याचे म्हटले होते (म्हणजे सूर्य विश्वाच्या केंद्राशी आहे या कोपर्निकस यांच्या सूर्यकेंद्रीय विश्वाच्या कल्पनेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे तत्त्वज्ञ होत). इ.स. पू. चवथ्या शतकात बॅबिलोनियन लोकांनी बुध पाहिल्याचा, तर इ.स.पू. २६४ मध्ये याचे वेध घेण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. हा कधी सूर्योदयापूर्वी, तर कधी सूर्यास्तानंतर दिसत असल्याने काहींना हे दोन ग्रह वाटले आणि काहींनी त्यांना दोन वेगवेगळी नावेही दिली होती  उदा., पूर्वेस दिसणाऱ्याला अपोलो व पश्चिमेस दिसणाऱ्याला मर्क्युरी वा हर्मिझ (मर्क्युरीशी तुल्य अशी ग्रीक देवता). मात्र ही एकाच ग्रहाची दोन रूपे असल्याचेही काहींना माहीत होते. कोपर्निकस यांनी बुध पाहिला नव्हता परंतु गॅलिलीओ यांनी दुर्बिणीतून याच्या (चंद्राप्रमाणे) कला दाखवून कोपर्निकस यांची सूर्यकेंद्रीय विश्वाची कल्पना बरोबर असल्याचा आणखी एक पुरावा मिळवून दिला होता.

बुध हा वेदोत्तर काळी महत्त्व पावलेला ग्रह असून फलज्योतिषात मिथुन राशीचा (तसेच उत्तर दिशा, अथर्ववेद व पाचू यांचाही) अधिपती मानलेला आहे. सामान्यतः तो शुभ असून पापग्रहाशी युक्त झाल्यास अशुभ होतो. याचाही संबंध बुद्धीशी मानला असून बुद्धिमत्ता हा त्याचा प्रधान धर्म आहे. ज्याच्या कुंडलीत बुध बलवान असतो, तो मनुष्य नामांकित वक्ता किंवा लेखक होतो, असे मानतात.

कक्षा, कक्षीय व अक्षीय परिभ्रमणे : बुधाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर ५७.९ x x१० किमी. असले, तरी त्याच्या कक्षेची विमध्यता (वर्तुळाकार कक्षेपासून होणारे विचलन दर्शविणारे गुणोत्तर) जास्त (०.२०५६) असल्याने त्याच्या सूर्यापासूनच्या कमाल (६९.८ x १० किमी.) व किमान (४५.९ x १० किमी.) अंतरांमध्ये पुष्कळच तफावत पडते. बुध व पृथ्वी यांच्या कक्षीय प्रतलांमध्ये ७ अंशांचा कोन असून कुबेर वगळता सर्व ग्रहांत हा कोन जास्त आहे. बुधाचा अक्ष त्याच्या कक्षीय प्रतलास जवळजवळ लंबरूप आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी जे.एच्‍.‍श्रटर यांनी वेळोवेळी दिसलेल्या वैशिष्ट्यांसह बुधाच्या पृष्ठाची रेखाचित्रे काढून प्रसिद्ध केली होती. त्यांच्यावरून एफ्‍.डब्ल्यू.बेसेल यांनी बुधाला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास २४ तास ५३ सेकंद लागत असावेत, असा अंदाज केला होता. १८८१-८९ दरम्यान अस्पष्ट खाणाखुणांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून जी.व्ही.स्कॅपारेल्ली यांनी हाच काळ ८८ दिवस असल्याचे अनुमान काढले होते. बुध व चंद्र यांच्यात इतर काही बाबतींत साम्य असल्या कारणाने व ८८ दिवस हा अक्षीय भ्रमणकाळ कक्षीय भ्रमणकाळाइतकाच असल्यामुळे बरोबर असावा, असे काही वर्षे मानण्यात आले. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे गतिरोधन होऊन ग्रहाच्या अक्षीय भ्रमणात सावकाश बदल होतो आणि अक्षीय व कक्षीय भ्रमणकाळ सारखे होऊन स्थैर्य प्राप्त होते. यालाच समकालिक अवस्था प्राप्त झाली असे म्हणतात.

पृथ्वी व चंद्राप्रमाणे बुध व सूर्य यांच्या बाबतीत समकालीकरण झाल्याचे मानण्यात काही अडचणी येऊ लागल्या. १९६२ साली परम इनापगम (पृथ्वीवरून पाहिल्यास बुध व सूर्य यांच्यात कमाल कोनीय अंतर असतानाच्या) स्थितीत असताना बुधाच्या प्रकाशित आणि अप्रकाशित भागांच्या तापमानांमध्ये विशेष फरक नसल्याचे रेडिओ तरंगाद्वारे कळून आले. (समकालीकरण होऊन) बुधाची एकच बाजू सूर्यासमोर राहत असती, तर अप्रकाशित भागावर कधीच सूर्यप्रकाश पडला नसता व दोन्ही भागांवरील तापमानांत खूप तफावत पडली असती. वातावरणातील वायुप्रवाहांनी अशी तफावत कमी होणे शक्य असते परंतु बुधावरील वातावरण क्षुल्लक असल्याने ही शक्यताही नाही. यामुळे अक्षीय भ्रमणकाळ ८८ दिवस असून त्याचे कक्षीय भ्रमणकाळाशी समकालीकरण झाल्याचे गृहीत धरण्यात चूक झाल्याचे लक्षात आले.


रडारच्या साहाय्याने पाठविलेल्या व बुधबिंबाच्या दोन कडांवरून परावर्तन होऊन परत येणाऱ्या विद्युत चुंबकीय प्रारणाच्या तरंगलांबीत पडणारा फरक पाहून त्यावरून अक्षीय भ्रमणकाळ काढता येतो [⟶ डॉप्लर परिणाम] कारण अक्षीय भ्रमणामुळे बुधाची एकच बाजू पृथ्वीकडे, तर दुसरी पृथ्वीपासून दूर वळत असते. १९६५ साली केलेल्या अशा निरीक्षणांद्वारे बुधाचा अक्षीय भ्रमणकाळ ५९± ३ दिवस आला. हा काळ व ८८ दिवसांचा कक्षीय भ्रमणकाळ यांचे प्रमाण २:३ असल्याचे जूझेप्पे कोलंबो यांच्या लक्षात आले आणि ८८ चा दोन तृतीयांश म्हणजे ५८.६५६ दिवस हा अक्षीय भ्रमणकाळ अचूक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यानंतरचे रडारने घेतलेले वेध आणि मरिनर-१० या अवकाशयानाने घेतलेली छायाचित्रे यांच्यावरून बुधाचा अक्षीय भ्रमणकाळ ५८.६५६ दिवस [नाक्षत्र दिन ⟶ कालमापन] असल्याचे सिद्ध झाले म्हणजे बुधाच्या सूर्याभोवती दोन प्रदक्षिणा होतात तेव्हा स्वतःभोवती तीन फेऱ्या पूर्ण होतात. अशा प्रकारे दोघांच्या गतीत स्थैर्य निर्माण झाले आहे. या स्थितीनंतर प्राप्त होणारे अक्षीय व कक्षीय भ्रमणकाळांचे गुणोत्तर ग्रहाच्या कक्षेच्या विमध्यतेवरही अवलंबून असते. चंद्राची कक्षा सामान्यपणे वर्तुळाकार असल्याने हे गुणोत्तर १:१ होऊन समकालिक अवस्था प्राप्त झाली आहे. मात्र बुधाची विमध्यता ०.२०५६ असल्याने अक्षीय व कक्षीय भ्रमणकाळांचे प्रमाण २:३ असे स्थिर झाले आहे.

स्थिर पृथ्वीसापेक्ष गती व स्थाने : पृथ्वीची गती बुधापेक्षा कमी असल्याने पृथ्वी स्थिर मानल्यास पृथ्वीच्या संदर्भातील बुधाची त्याच्या कक्षेतील सहा स्थाने महत्त्वाची आहेत (पहा आकृती).

स्थिर पृथ्वीसापेक्ष बुधाची महत्त्वपूर्ण स्थाने: (१) अंतर्युती, (२,६)स्तंभी, (३)पश्चिम परम इनापगम, (४)बर्हियुती, (५)पूर्व परम इनापगम

बुध आकृतीत (१) येथे असताना अंतर्युती झाली असे म्हणतात. या वेळी पृथ्वीवरील निरीक्षकाच्या दृष्टीने बुध सूर्याच्याच दिशेत असतो व सूर्यतेजामुळे नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही. या वेळी सूर्य व बुध यांच्यातील पूर्व-पश्चिम कोनात्मक अंतर शून्य असते बुध पृथ्वीपासून सर्वांत जवळ (सु.९.२० कोटी किमी.) असतो व त्याच्या बिंबाचा व्यास सु.१३ सेकंद असतो. बुधाची अप्रकाशित बाजू पृथ्वीकडे असल्याने ही स्थिती अमावास्येसारखी असते. येथून तो सूर्याच्या पश्चिमेस सु. ११ जाईपर्यंत सूर्यतेजामुळे दिसत नाही. नंतर तो पूर्व आकाशात सूर्योदयापूर्वी दिसू लागतो. याला बुधाचा ’पूर्वोदय’ म्हणतात. आकृतीमधील (६ ते २) पर्यंतची बुधाची गती वक्री असते म्हणजे दूरच्या तारकासमूहांच्या संदर्भात बुध पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. (२) येथे वक्री गती शून्य होते व तेथे बुध ’स्तंभी’ झाला असे म्हणतात. (३) येथे बुध व सूर्य यांतील अंतर सर्वाधिक होते म्हणजे बुधाचा परम इनापगम होतो. या वेळी बुध उपसूर्य (सूर्यापासून सर्वात कमी अंतरावरच्या) बिंदूशी असल्यास सूर्यापासून १८ आणि अपसूर्य (सूर्यापासून सर्वांत जास्त अंतरावरच्या) बिंदूशी असल्यास २८ अंतरावर दिसतो. नंतर बुध-सूर्यातील अंतर घटत जाऊन सु. ११ झाले की, बुध दिसेनासा होतो म्हणजे त्याचा ’पूर्वास्त’ होतो. (४) येथे हे पूर्व-पश्विम अंतर शून्य होऊन बुध सूर्याच्या दुसऱ्या बाजूस जातो व ’बहिर्युती’ होते. या वेळी बुध पृथ्वीपासून कमाल (सु.२१.७० कोटी किमी.) अंतरावर असतो व त्याच्या बिंबाचा व्यास सु. ५ सेकंद दिसतो. या वेळी त्याची प्रकाशित बाजू पृथ्वीकडे असल्याने ही स्थिती पौर्णिमेसारखी असते मात्र सूर्यसान्निध्यामुळे बुध दिसू शकत नाही. नंतर तो सूर्याच्या पूर्वेस जाऊ लागतो व सु.११ अंतरावर गेल्यावर सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात दिसू लागतो म्हणजे त्याचा ’पश्चिमोदय’ होतो. नंतर मार्गी गती घटत असताना (५) येथे सूर्य-बुधातील अंतर कमाल होते, यास बुधाचा ’पूर्व परम इनापगम’ म्हणतात. (६) येथे बुध स्तंभी होतो. नंतर तो परत वक्री होऊन त्याचे सूर्यापासूनचे अंतर घटत जाते व सूर्यापासून सु.११ अंतरावर आल्यावर तो दिसेनासा होतो म्हणजे त्याचा ’पश्चिमास्त’ होतो. यानंतर पुनश्च अंतर्युती होऊन चक्र पूर्ण होते. पूर्व परम इनापगमानंतर २२ दिवसांनी अंतर्युती, नंतर २२ दिवसांनी पश्चिम परम इनापगम आणि त्यानंतर ७२ दिवसांनी पुन्हा पूर्व परम इनापगम ही स्थिती येते.

बुधाच्या कक्षेचा क्षितिजाशी होणारा कोन एकसारखा बदलत असल्याने पश्चिम परम इनापगमाच्या वेळी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सूर्योदयापूर्वी आणि पूर्व परम इनापगमाच्या वेळी मार्च-एप्रिलमध्ये सूर्यास्तानंतर तो चांगला दिसतो. अशा वेळी त्याची दृश्य प्रत [⟶ प्रत] – १.२ ते +१.१ इतकी असते म्हणजे तो व्याधाखालोखाल तेजस्वी दिसतो व त्याचे अर्धप्रकाशित बिंब चंद्राच्या अष्टमीच्या बिंबासारखे दिसते.

सूर्याजवळ असल्याने बुधाची कक्षीय गती सर्व ग्रहांत जास्त आहे. दूरच्या ताऱ्यांच्या संदर्भात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास त्याला ८७.९६९ दिवस लागतात. या काळात पृथ्वीही तिच्या कक्षेत थोडी पुढे जाते. यामुळे सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष त्याच स्थितीत येण्यास बुधाला ११५.८८ दिवस लागतात. या काळाला बुधाचा सांवासिक काळ म्हणतात म्हणजे लागोपाठच्या दोन अंतर्युत्यांमधील (वा बहिर्युत्यांतील) काळ ११५.८८ दिवस असतो. अशा तऱ्हेने पृथ्वीच्या एका वर्षात बुधाच्या ३ अंतर्युत्या घडतात.

कुबेर वगळता बुधाच्या कक्षेची विमध्यता सर्वाधिक आहे. बुध उपसूर्यी असतांना सूर्यापासून ४.५९ कोटी किमी. तर अपसूर्यी असतांना ६.९७ कोटी किमी. अंतरावर असतो. या अंतरानुसार त्याची गती बदलते [उदा., उपसूर्यी असतांना कमाल (६० किमी./से.) व अपसूर्यी असतांना किमान (४० किमी./से.)]. बुधाची सरासरी गती ४८ किमी./से. आहे.


कला व अधिक्रमणे : बुध अंतर्ग्रह असून तो सूर्यप्रकाशाने प्रकाशित होतो म्हणून पृथ्वीवरून पाहताना याच्याही चंद्राच्या कलांप्रमाणेच सर्व कला दिसतात. पृथ्वीच्या क्षितिजाजवळील वातावरणाच्या धूसरतेमुळे व झाकळीमुळे नुसत्या डोळ्यांनी कला दिसत नाहीत मात्र लहान दुर्बिणीतून ह्या स्पष्टपणे दिसू शकतात. चंद्र व बुध यांच्या कलांमध्ये थोडा फरक आहे. बुधाची कक्षा बरीच विवृत्ताकार असल्याने बुध व पृथ्वी यांच्यातील अंतर खूप बदलत असते आणि पृथ्वी व सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेच्या संदर्भात तो विविध स्थानी असतो तेव्हा त्याच्या बिंबाचा आकार बदलतो. त्याचा दृश्य कोनीय व्यास ५ ते १३ सेकंद इतका बदलताना दिसतो. चंद्र-बिंबाच्या आकारात असे लक्षणीय बदल होत नाहीत. अंतर्युतीनंतर बुधाची लांबट कोर दिसते व तेव्हा त्याचे आकारमान मोठे भासते. जसजशा कला वाढत जातात तसतसे बुधाचे बिंब लहान होत जाऊन पूर्ण कलेच्या (पौर्णिमेच्या) वेळी ते सर्वात लहान दिसते. कलांनुसार बिंबाच्या तेजस्वितेतही खूप बदल होताना दिसतात. बुधाच्या कलांचे चक्र पूर्ण होण्यास (उदा., लागोपाठच्या दोन पूर्ण कला होण्यास) ११५.८ दिवस लागतात.

बुध व पृथ्वी यांच्या कक्षांच्या प्रतलांमध्ये सु. ७ अंशांचा कोन आहे. दोन्ही कक्षा एकमेकींस दोन पातबिंदूंत [⟶पात] छेदतात. यांपैकी एका पातबिंदूवर बुध असताना अंतर्युती झाल्यास सूर्य, पृथ्वी व बुध सरळ रेषेत येतात आणि अत्यंत रेखीव काळ्या ठिपक्यासारखे बुधाचे (अमावस्येचे) बिंब सूर्यबिंबावरून सरकत जाताना दिसते. मोठ्या सूर्यबिंबावरून (दृश्य व्यास १,८०० सेकंद) लहान बुधबिंब (दृश्य व्यास सु. १० सेकंद) जात असल्याने या घटनेला ग्रहणाऐवजी अधिक्रमण म्हणतात. असे अधिक्रमण पूर्ण होण्यास जास्तीत जास्त ७-८ तास लागतात. प्रत्येक अंतर्युतीच्या वेळी बुध पातबिंदूवर असेल असे नाही व तेव्हा तो सूर्यबिंबाच्या उत्तरेकडून वा दक्षिणेकडून जातो. खास प्रकारच्या प्रकाश गाळण्या वापरून दुर्बिणीच्या साहाय्यानेच अधिक्रमण पाहता येते. दुर्बिणीच्या शोधानंतर ७ नोव्हेंबर ६३११ रोजी प्येअर गासॅंदी यांनी प्रथम अधिक्रमण पाहिले होते. अधिक्रमणाच्या वेळी वेध घेऊन बुधाविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकते. उदा., त्याच्या कक्षेची अंगे [⟶ कक्षा] अचूकपणे ठरविता येतात.

पृथ्वी ७ मे व ९ नोव्हेंबरच्या सुमारास बुधाच्या कक्षेच्या पातबिंदूंना जोडणाऱ्या रेषेजवळ येत असल्याने या तारखांच्या जवळपास अधिक्रमण घडण्यास अनुकूल परिस्थिती असते. नोव्हेंबरात बुध उपसूर्यबिंदूच्या नजीक येत असल्याने मेपेक्षा नोव्हेंबरात अधिक्रमण घडण्यास अधिक अनुकूल परिस्थिती असते. यामुळे नोव्हेंबर व मेमध्ये होणाऱ्या अधिक्रमणांचे प्रमाण ७:३ पडते. नोव्हेंबरात होणाऱ्या अधिक्रमणांचे मार्ग एकमेकांस समांतर असतात. त्याचप्रमाणे मेमधील अधिक्रमणांचे मार्गही एकमेकांस समांतर असतात. मात्र या मार्गांची लांबी अधिक्रमण सूर्यबिंबाच्या कोणत्या भागावरून होते त्यावर अवलंबून असते. पृथ्वी व बुध यांच्या भ्रमणकाळांचा विचार करता अधिक्रमणे सामान्यतः ३, ७, १० व १३ वर्षांनी होतात. एका शतकात सर्वसाधारणपणे १३ अधिक्रमणे होतात. १२ नोव्हेंबर १९८६, ६ नोव्हेंबर १९९३ आणि १४ नोव्हेंबर १९९९ (या वेळी बुध सूर्यबिंबाच्या अगदी कडेने जाईल) ह्या विसाव्या शतकातील अधिक्रमणांच्या तारखा असून एकविसाव्या शतकातील पहिले अधिक्रमण ६ मे २००३ च्या सुमारास संभवते. [⟶ अधिक्रमण].

आकारमान, वस्तुमान, गुरुत्वाकर्षण इ. : दुर्बिणीने घेतलेल्या वेधांवरून काढलेला बुधाचा व्यास ४,८४० किमी. आला होता मात्र १९६५ साली रडारच्या साहाय्याने काढलेला व्यास ४,८७८±२किमी. आढळून आलेला आहे. म्हणजे बुध हा आकारमानाने चंद्रापेक्षा थोडा मोठा असून त्याचे घनफळ ५.९५ x १०१९घ.मी. म्हणजे पृथ्वीच्या घनफळाच्या ०.०६ पट आहे. बुधाला उपग्रह नाही व याचे वस्तुमान कमी (पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ५.५ टक्के) असल्याने इतर ग्रहांच्या कक्षेत लक्षणीय विक्षोभ निर्माण होऊ शकत नाही. (उदा., लगतच्या शुक्राच्या कक्षेवर याच्या वस्तुमानाचे परिणाम अगदीच नगण्य होतात). शिवाय हा प्रचंड वस्तुमानाच्या सूर्यानजीक असल्यामुळे याचे वस्तुमान निश्चित करणे सोपे नाही. एरॉस हा लघुग्रह (मंगळ व गुरू यांच्या दरम्यान कक्षा असलेल्या अनेक लहान ग्रहांपैकी एक) क्वचितच बुधाजवळ येतो. त्या वेळी बुधामुळे त्याच्या कक्षेत होणाऱ्या विक्षोभावरून बुधाचे वस्तुमान काढण्यात आले होते. १८९५ साली सायमन न्यूकम या ज्योतिर्विदांनी काढलेले बुधाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०५५ पट आले होते. १९८० साली रेमंड लिट्‍लटन यांनी न्यूकम यांच्या आकडेमोडीची तपासणी केली असता बुधाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०४ पट येत असल्याचे त्यांना आढळले मात्र मरिनर-१० अवकाशयान बुधाजवळून जाताना त्याच्या कक्षेत झालेले विक्षोभ दोन वेळा मोजण्यात आले. त्यांवरून काढलेले बुधाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०५४३ पट म्हणजे ३.३०१ x १०२६ ग्रॅम एवढे आले. हेच वस्तुमान आधारभूत धरून मरिनर-१० यानाची कक्षा वेळोवेळी ठरविण्यात आली व तिच्यात काहीही चूक झाल्याचे आढळले नाही.

वस्तुमान व आकारमान यांवरून काढलेली बुधाची सरासरी घनता ५.२ ग्रॅ./घ.सेंमी. एवढी म्हणजे पृथ्वीच्या सरासरी घनतेपेक्षा थोडीच कमी आली आहे. अशा प्रकारे पृथ्वी वगळता याची घनता सर्व ग्रहांत जास्त आहे. उच्च घनता व लहान आकारमान यांवरून बुधाच्या अंतर्भागी लोह, निकेल यांसारखी जड मूलद्रव्ये प्रमुख घटक असावीत म्हणजे उच्च घनता संकोचनामुळे आलेली नसावी.

पृथ्वीच्या मानाने बुधाचे गुरुत्वाकर्षण कमी आहे. याच्या पृष्ठावरील गुरुत्वीय प्रवेग पृथ्वीच्या गुरुत्वीय प्रवेगाच्या फक्त ३७ टक्के आहे. ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी ग्रहावरील वस्तूला जी गती असावी लागते तिला मुक्तिवेग म्हणतात व बुधाच्या बाबतीत मुक्तिवेग फक्त सेकंदाला ४.१९ किमी. एवढाच आहे.


वातावरण : बुध सूर्याजवळ असल्याने त्याच्या सूर्याकडील बाजूचे तापमान सु. ४०० से. पेक्षा जास्तच असते. वाढत्या तापमानानुसार वायुरेणूंचे वेग वाढत जातात. अशा प्रकारे उच्च तापमान व कमी मुक्तिवेग यांच्यामुळे बुधाच्या पृष्ठभागी वायूंचे रेणू पकडून ठेवले जाऊ शकत नाहीत त्यामुळे बुधावर वातावरण असावे, अशी अपेक्षा करता येत नाही. अधिक्रमणाच्या वेळी सूर्यबिंबावरून बुधाच्या बिंबाचा काळा ठिपका सरकत जाताना दिसतो तेव्हा तो रेखीव असा दिसतो. त्याचा रेखीवपणा तेथे वातावरण जवळजवळ नसल्याचे सूचित करतो. कारण जर बुधावर वातावरणाचे आवरण असते, तर वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचे प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशकिरण जाताना त्यांच्या दिशेत बदल होण्याची क्रिया) व विकिरण (विखुरले जाण्याची क्रिया) होऊन बुधाच्या बिंबाच्या कडा रेखीव दिसल्या नसत्या. १९६३ साली निकोलाय कोझिरेव्ह यांनी बुधावरून येणाऱ्या प्रकाशाच्या वर्णपटांचा अभ्यास केला तेव्हा त्यांना तेथे पृथ्वीच्या वातावरणाच्या एक हजारांश पट दाट हायड्रोजन वायूचे आवरण असावे असे आढळले. व्हासिली आय्‍. मोरोझ या ज्योतिर्विदांनी बुधावर कार्बन डाय-ऑक्साइड वायू असल्याचे १९६५ साली सांगितले होते. अशा प्रकारे तेथे वातावरण लेशमात्रच असावे. ए.डॉल्टफस यांच्या मते ते पृथ्वीच्या वातावरणाच्या ०.००३ पट, तर इतर काहींच्या मते एक अब्जांश पट विरळ असावे आणि त्याचा दाब पृथ्वीच्या वातावरणीय दाबाच्या एक हजारांशाहूनही (१ मिलीबार) कमी असावा. हीलियम हा तेथील वातावरणाचा प्रमुख घटक असावा.  सौरवाताबरोबर (सूर्यापासून अखंडपणे बाहेर पडणाऱ्या आयनीभूत विद्युत् भारित अणू व रेणूंच्या बनलेल्या-वायूच्या प्रवाहाबरोबर) बुधाकडे येणारे तसेच पृष्ठभागी आघाताने विवरे निर्माण होताना उत्सर्जित झालेले हीलियमाचे अणू चुंबकीय क्षेत्राने पकडून ठेवले जात असावेत. आर्‍गॉन, निऑन, कार्बन डाय-ऑक्साइड यांसारखे जड रेणू कदाचित झेनॉन आणि अगदी अल्प हायड्रोजन हे तेथील वातावरणाचे इतर घटक असावेत.

पृष्ठीय वैशिष्ट्ये व भूविज्ञान : पृथ्वीवरून मध्यम दुर्बिणीच्या साहाय्याने केलेल्या निरीक्षणांद्वारे बुधाविषयी बरीच माहिती एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मिळाली परंतु तो सूर्यानजीक असल्याने त्याच्या पृष्ठावरील स्वरूपांविषयी विश्वासार्ह माहिती मिळू शकली नाही. तथापि एप्रिल १९६४ मध्ये प्रथमच रडारने बुधाची निरीक्षणे करण्यात आली. तसेच २९ मार्च १९७४ व २१ सप्टेंबर १९७४ रोजी मरिनर-१० यानाने बुधाच्या जवळजवळ निम्म्या भागाची छायाचित्रे घेतलीतसेच वेधही घेतले. त्यांवरून बुधाच्या पृष्ठभागाची तपशीलवार माहिती आता उपलब्ध झाली आहे.

बुध चंद्रापेक्षा थोडा मोठा असून उभयतांच्या पृष्ठांवरील स्वरूपांमध्ये खूपच साम्य असल्याचे आढळले आहे तसेच बुधाचे कवच वरवर पाहता पृथ्वी, मंगळ आणि चंद्र यांच्या कवचाप्रमाणे आहे. मरिनर-१० यानाने अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) प्रारणाच्या साहाय्याने केलेल्या तापमापनाद्वारे कवच हे चांगले उष्णतानिरोधक असल्याचे आढळले. यावरून ते सच्छिद्र मृदेचे अथवा चंद्रावरील आवरणशिलेसारख्या (आधारशैलांना झाकणाऱ्या पदार्थांच्या राशीसारख्या) खडकांच्या चुऱ्याचे (केवळ खडकाचे नव्हे) बनवलेले असावे. बुधाचा ⇨ प्रतिक्षेप ०.०६ आहे म्हणजे त्याच्या पृष्ठावर पडलेल्या सूर्यप्रकाशापैकी ६ टक्के प्रकाशाचे परावर्तन होते, तर चंद्राचा प्रतिक्षेप ७ आहे. यावरून बुधाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे खडबडीत व गडद रंगाच्या खडकांचा बनला असावा, असा अंदाज होता. मरिनर-१० ने केलेल्या निरीक्षणांनी हा अंदाज खरा ठरला असून बुधाचे पृष्ठ सिलिकेटी खडकांचे बनले आहे व त्यावर सिलिकेटी खनिजांची धूळ पसरलेली आहे. बुधाच्या पृष्ठावर ४ अब्ज वर्षांहून जास्त काळ अशनींचे (बाहेरून येऊन पडणाऱ्या खडकांचे) आघात होऊन खाचखळगे निर्माण झाले आहेत. तेथे वातावरण जवळजवळ नसल्याने ही भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये बहुतांशी जशीच्या तशी टिकून राहिली आहेत. लहानमोठी विवरे, मैदाने, उंचवटे, कडे, द्रोण्या इ. येथील प्रमुख पृष्ठीय स्वरूपे आहेत.

यांपैकी विवरे हे प्रमुख भूवैज्ञानिक वैशिष्ट्य असून ती पुष्कळ आहेत. तेथे वातावरण नसल्याने अशनींचा वेग कमी न होता वा ते न जळता पृष्ठावर आल्याने त्यांचे आघात जोरदारपणे झाले असावेत. यांपैकी मोठी विवरे सु.४ अब्ज वर्षांपूर्वीची असावीत. २०० किमी.पेक्षा जास्त व्यासाची विसाहून जास्त विवरे असून ’कॅलॉरिस द्रोणी’ या सर्वांत मोठ्या विवराची बरीच माहिती मिळाली आहे. त्याचा व्यास सु. १,३०० किमी. असून त्याच्या सभोवती उंच असा कॅलॉरिस पर्वत आहे. यामध्ये लाव्हा भरलेला असून आतील भागात एकच मध्य घेऊन वेगवेगळ्या त्रिज्यांनी वर्तुळे काढावीत अशा भेगा आहेत. शिवाय लाव्हा थंड होताना आकुंचनाने व खचण्याने पडलेल्या भेगा-उंचवटेही त्यात आहेत. अशा मोठ्या विवरांभोवती सापेक्षतः सपाट मैदाने असून त्यांच्यावरही लाव्ह्याचे प्रवाह आढळतात. अशा प्रकारे बुधावर पुष्कळ भागांत लाव्हा प्रवाह आढळत असले, तरी ज्वालामुखी सर्वत्र आढळले नाहीत. यांशिवाय २० ते ५० किमी. व्यासाची पुष्कळ विवरेही तेथे विखुरलेली आहेत. मोठ्या विवरांच्या निर्मितीच्या वेळी उडालेले खडकांचे तुकडे आदळून बनलेली गौण विवरे बुधाच्या मुख्य विवराच्या जवळपासच आढळतात. चंद्रावर मात्र गौण विवरे मुख्य विवरापासून दूरवर विखुरलेली आढळतात. बुधावर गुरुत्वाकर्षण चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या सु. दुप्पट असल्याने असे घडले असावे, असे डॉनल्ड ई. गॉल्ट यांचे मत आहे. जास्त गुरुत्वाकर्षणामुळे बुधावर उडालेले तुकडे जास्त उंच उडून अधिक दूरवर जाऊन पडत नाहीत. ध्रुवालगलच्या भागात सभोवती सरळ उभ्या भिंती असलेली लहान विवरे असून त्यांच्यावर सूर्यप्रकाश पडत नसल्याने हे भाग ’शीत केंद्रे’ बनली आहेत. थंड होताना बुधाच्या अंतरंगाचे आकुंचन होऊन बनलेले कडे वा पहाड पुष्कळ आहेत. ते ओबडधोबड असून त्यांची उंची १ किमी. पर्यंत आणि व्यास शेकडो किमी. पर्यंत आहे. ते इतर संरचनांच्या आडव्या दिशेत तुटलेले आढळतात. आकुंचनाने बनलेली अशी मोठी स्वरूपे पृथ्वीशिवाय इतर ग्रहांवर आढळलेली नाहीत. बुधाच्या पूर्वेकडील व उत्तरेकडील भागात विवरे व खाचखळगे कमी असून तेथील मैदाने हजारो किमी. पर्यंत पसरलेली आहेत.

अशा प्रकारे बुधाचे पृष्ठ पृथ्वीप्रमाणे सिलिकेटी खडकांचे असूनही त्याचे बाह्य स्वरूप बहुतांशी चंद्राप्रमाणे आहे. मात्र बुधाचे अंतरंग पृथ्वीप्रमाणे असावे कारण त्याची घनता चंद्र व मंगळ यांच्यापेक्षा जास्त पण पृथ्वीपेक्षा थोडीच कमी आहे. जास्त घनता व कमी आकारमान यांच्यावरून त्याच्या अंतरंगात लोह-निकेलासारखी जड मूलद्रव्ये मुख्यत्वे असावीत आणि त्याच्या अशा लोहमय माभ्याची त्रिज्या सु. १,८०० किमी. असावी.

तापमान : बुध सूर्याला जवळ असल्यामुळे त्याच्या पष्ठभागावर तीव्र प्रारण पडत असून त्याचा परिसर बाकीच्या ग्रहांच्या मानाने अधिक रुक्ष बनलेला आहे. बुधावरील एक दिवस पृथ्वीवरील जवळजवळ १७६ दिवसांइतका म्हणजे दोन प्रदक्षिणांस लागणाऱ्या कालावधीइतका मोठा आहे. म्हणजे बुधाच्या एखाद्या स्थानी सूर्य एकदा पूर्वक्षितिजावर (किंवा मध्यमंडलावर) दिसला की, १७६ पृथ्वीवरील दिवसांनंतर तो पुन्हा पूर्व क्षितिजावर (किंवा मध्यमंडलावर) दिसेल.

बुधाचे सरासरी तापमान १७७ से. आहे. त्यावरील कमाल तापमान हे त्याच्या सूर्यापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. उपसूर्यी असताना त्याच्या विषुववृत्तावर दुपारचे तापमान सु. ४२७ से. (७०० के.) असते. या स्थितीत बुधावर चंद्राच्या दहापट सौर प्रारण पडत असते. याच्याभोवती उष्णता निरोधन करील असे वातावरण नसल्याने रात्रीचे किमान तापमान — १७३ से. पर्यंत उतरते.

बुधाच्या अक्षीय व कक्षीय भ्रमणकाळांच्या २ : ३ या प्रमाणामुळे व कक्षेच्या जास्त विमध्यतेमुळे त्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात काही वैशिष्ट्यपूर्ण घटना घडतात.

बुध उपसूर्यी असताना सूर्यासमोर येणाऱ्या रेखांशास ० रेखांश मानल्यास या रेखांशाच्या आसपासच्या प्रदेशावर दुपारचा कालावधी फारच मोठा असेल. येथे सूर्य डोक्यावर असता काळ्या आकाशात सूर्याचे बिंब सु. १.६ व्यासाचे म्हणजे पृथ्वीवरून दिसणाऱ्या व्यासाच्या सु. तिप्पट व्यासाचे दिसेल. सूर्योदयी लहान दिसणारा सूर्य (दृश्य व्यास १. १) जसजसा डोक्यावर येईल, तसतशी त्याची गती कमी होत जाऊन तो आकाशात स्थिर झालेला दिसेल, इतकेच नव्हे, तर नक्षत्रसापेक्ष ८ दिवसांपर्यंत त्याची गती वक्री होईल. दुसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळी बुध उपसूर्यी येईल तेव्हा या रेखांशाच्या विरुद्ध बाजूस असलेला रेखांश म्हणजे १८० रेखांश सूर्यासमोर येऊन तेथेही वरीलप्रमाणेच घटना घडतील, यांमुळे ० आणि १८० रेखांशांच्या आसपासच्या बुधप्रदेशावर सर्वाधिक सौर प्रारण मिळते.


९० व २७० रेखांशाच्या आसपासच्या प्रदेशांची दुपार बुध अपसूर्यी येतो त्या वेळी होते. या वेळी बुध सूर्यापासून दूर असतो व सूर्याची आकाशातील गतीही अधिक असल्यामुळे हे भूप्रदेश कमी तापतील. उपसूर्यी असताना बुधावर पडणारे सौर प्रारण अपसूर्यी असताना पडणाऱ्या प्रारणाच्या जवळजवळ अडीच पट अधिक तीव्र असते. याशिवाय बुधाचा अक्ष त्याच्या कक्षेच्या प्रतलाला जवळजवळ लंबच (कक्षेच्या लंबांशी अक्षाचा कोन सु. ३) असल्याने बुधपृष्ठावरील वर्षभरात घडणारे तापमानांतील बदल पृथ्वीप्रमाणे अक्षांशांनुसार न होता रेखांशांनुसार होतात. बुधाचे विषुववृत्त ० व १८० रेखावृत्तांना जेथे छेदते ते दोन बिंदू ‘उच्च ऊष्मीय ध्रुव’ व यांच्यापासून ९० अंतरावरील बिंदू (९० आणि २७०रेखावृत्तावरील ‘नीच ऊष्मीय ध्रुव’ बनले आहेत.

बुधाच्या पृष्ठभागाखाली १ मीटर खोलीवरील तापमान विषुववृत्ताजवळ पाण्याच्या गोठणबिंदूहून थोडे अधिक व ध्रुवप्रदेशाजवळ गोठणबिंदूहून बरेच कमी असावे.

चुंबकीय क्षेत्र : मरिनर — १० अवकाशयान तिसऱ्या वेळी बुधाच्या अगदी जवळून (३२७ किमी.वरून) गेले, तेव्हा त्याने बुधालगतच्या परिसराचे प्रत्यक्ष अनुसंधान केले. या वेळी तेथे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या १% (३५० ते ७०० गॅमा) एवढे चुंबकीय क्षेत्र असल्याची नोंद झाली होती. शुक्र व मंगळ यांच्यापेक्षा बुधाचे चुंबकीय क्षेत्र प्रभावी आहे. यावरून त्याचा उद्‌गम विवक्षित भागच नसून बुधाच्या सर्व भागातून होत असावा, असा तर्क आहे. बुधाचा चुंबकीय अक्ष पृथ्वीप्रमाणेच सामान्यपणे भ्रमणाक्षाच्या दिशेत आहे. आघात तरंग निर्माण करून सौरवात विचलित करण्यास आणि सौरवाताच्या बुधानजिक आलेल्या विद्युत् भारित कणांना प्रवेगित करण्यास बुधाचे चुंबकीय क्षेत्र पुरेसे प्रबळ आहे. बुधाचे पृष्ठ जेव्हा अधिक तप्त आणि सूर्याचे चुंबकीय क्षेत्र अधिक तीव्र होते, त्या प्राचीन काळापासून टिकून राहिलेल्या बुधाच्या कवचातील अवशिष्ट चुंबकत्वापासून हल्लीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले असणे शक्य आहे. मात्र काहींना स्वयंउत्तेजित विद्युत् जनित्राप्रमाणे [⟶ विद्युत् जनित्र] ते निर्माण होत असावे, असे वाटते. अशा जनित्रात लोहरसयुक्त गाभ्यात चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्याला बुधाच्या अक्षीय भ्रमणाद्वारे ऊर्जा मिळते. मात्र या जमित्राच्या यंत्रणेचा तपशील थोडाच माहीत झाला आहे. याविषयीची अधिक माहिती सूर्यकुलाच्या उत्पात्तीच्या दृष्टीने पण महत्त्वाची ठरू शकेल.

पूर्वेतिहास : ज्या अभ्रिकेपासून (आंतरतारकीय अवकाशातील धूळ व वायू यांच्या ढगापासून) सूर्य बनला ती अभ्रिका थंड होताना धूळ व वायू यांचे एकत्रीकरण होऊन इतर ग्रह बनले तेव्हा म्हणजे सु. ४.५ अब्ज वर्षांपूर्वीच ग्रहकांपासून (छोट्या ग्रहांपासून) बुधही बनला. तो सूर्यानजिक असल्याने अधिक तप्त होता म्हणून त्यावर बाष्पनशील (बाष्परूपात ऊडून जाऊ शकणारी) द्रव्ये एकत्रित होऊ शकली नाहीत. त्यामुळे इतर ग्रहांच्या तुलनेत बुधावर लोखंड व इतर जड धातूंची विपुलता अधिक झाली आहे. नंतर लोखंड गाभ्यात एकवटले जाऊन कवच सिलिकेटांचे बनत गेले. अशा प्रकारचे भिन्न भवन (एकाच द्रव्यापासून वेगवेगळ्या संघटनांचे घटक बनण्याची क्रिया) व कवच थंड होण्याची क्रिया तेथे आधीच्या काळातच झाली असावी कारण बुधाच्या पृष्ठावरील अघाताने निर्माण झालेले खाचखळगे प्राचीन काळातील आहेत. तेव्हापासून आघात व अंतर्गत क्रिया यांच्याद्वारे कवचाला आकार प्राप्त होत गेला आहे. मात्र द्रवरूप लोहयुक्त गाभा सावकाश थंड होताना त्यात अल्पसाच बदल झाला आहे. पृथ्वी-गटातील इतर ग्रहांचा पूर्वेतिहासही अशाच प्रकारचा असावा परंतु तेथील विस्तृत भूवैज्ञानिक क्रियांमुळे त्यांच्या पृष्ठभागावरील खाचखळग्यांच्या अशा खुणा अस्पष्ट झाल्या असाव्यात.

जीवसृष्टी : बुधाचे सूर्याशी सन्निध असलेले स्थान, वातवरण व ऑक्सिजनाचा अभाव, पृष्ठावरील तापमानातील आत्यंतिक तफावत यांमुळे त्यावर पृथ्वीवरील ज्ञात जीवसृष्टीसारखी जीवसृष्टी असण्याची शक्यता नाही. तथापि काहींच्या मते तेथे आदिम प्रकारचे जीव असावेत. यामुळे बुधावर कोणत्याही स्वरूपाची जीवसृष्टी अस्तित्वात आहे की नाही, हे अजून ठामपणे सांगता आलेले नाही.

सापेक्षता सिद्धांताच्या दृष्टीने महत्त्व : सूर्य व इतर ग्रहांच्या गुरुत्वीय प्रभावाने बुधाची कक्षा तिच्याच पातळीत सावकाश चल असते [उदा., कक्षेतील उपसूर्यबिंदू कालांतराने पूर्वेकडे सरकतो]. अशा प्रकारे होणारे बुधाच्या कक्षेच्या बृहदक्षांच्या वेधांवरून आलेले प्रत्यक्ष वलय १०० वर्षांत ५७५ सेकंद आले आहे तर न्यूटन यांच्या गुरुत्वीय नियमांनुसार ते ५३२ सेकंद म्हणजे ४३ सेकंद कमी येते (१८४५ सालीच यूरबँ लव्हेऱ्ये यांना हा फरक शतकात ३५ सेकंद एवढा येत असल्याचे आढळले होते). न्यूटन यांच्या नियमांच्या संदर्भात बुध व सूर्य यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे अस फरक पडत असावा, असे यांचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी असा ग्रह शोधून काढण्याचे खूप प्रयत्‍न झाले पण त्याचा शोध लागलेला नाही. शेवटी १९१५ साली आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताद्वारे [⟶ सापेक्षता सिद्धांत] या फरकाचे स्पष्टीकरण देता आले. सूर्यानजिक असल्याने बुधावरील असलेल्या प्रभावी गुरुत्वीय क्षेत्राचा विचार करताना न्यूटन यांची समीकरणे आहेत तशीच न वापरता त्यांच्यावर काही संस्कार करावे लागतात. अशा प्रकारे संस्कार करून आलेल्या समीकरणांवरून काढलेले बुधाच्या बृहदक्षाचे वलन प्रत्यक्ष वेघांवरून आलेल्या वलनाएवढे आले.

जास्त वस्तुमानाच्या खस्थ पदार्थाजवळून जाताना त्याच्या गुरुत्वाकर्षणाने विद्युत् चुंबकीय प्रारणाचा मार्ग वक्र होतो, असे सापेक्षता सिद्धांत म्हणतो. अशा तऱ्हेने प्रारणाच्या मार्गाची लांबी वाढल्याने त्याला अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यास जास्त वेळ लागेल. १९६७ साली बुध बहिर्युतीजवळ असताना त्याच्याकडे रडारने असे प्रारण पाठविण्यात आले तेव्हा त्यावर सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होऊन ते बुधावर पोचून परत येण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला, असे आढळले आणि यावरून सापेक्षता सिद्धांताचा पडताळा पहाता आला.

पहा : ग्रह सूर्यकुल.

संदर्भ :   1.  Dole, S. H. Asimov, I. Planets for Man, London, 1965.

             2. Firsoff, V. A. The Interior Planets, London, 1968.

             3. Inglis, S. J. Planets, Stars and Galaxies, New York, 1961.

             4. Moore, P. The Planets, London, 1962.

             5. Murray, B. C. Mercury, Scientific American, September, 1975.

मोडक, वि. वि. नेने, य. रा. ठाकूर, अ. ना.