‘बुच्चिबाबू ’ शिवराजू - वेंकटसुब्बारावू

‘बुच्चिबाबू’: (१६ जून १९१६-? १९६७). आधुनिक तेलुगू कथा-कादंबरीकार व समीक्षक. संपूर्ण नाव शिवराजू वेंकटसुब्बारावू तथापि ते ’बुच्चिबाबू’ ह्या टोपणनावानेच विशेष प्रसिद्ध आहेत. जन्म पश्चिम गोदावरी जिल्ह्यात एटूरू ह्या गावी. इंग्रजी विषय घेऊन ते एम्‍.ए. झाले. नागपूर व मद्रास विद्यापीठांत त्यांचे शिक्षण झाले. काही दिवस त्यांनी अध्यापनाचे काम केले. १९४५-६७ आकाशवाणीच्या हैदराबाद, विजयवाडा इ. केंद्रांवर ते कार्यक्रम निर्वाहक म्हणून काम करीत होते.

इंग्रजीचे अध्ययन-अध्यापन करीत असताना सार्त्र, जॉइस आदी लेखकांच्या व फॉइड, मार्क्स इत्यादींच्या विचारांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी प्रतिपादिलेल्या संज्ञाप्रवाहाच्या सिद्धांतांचा त्यांनी आपल्या जवळजवळ सर्व कथाकादंबऱ्यांतून वापर केला आहे. त्यांच्या तेलुगू लिखाणावर पाश्चात्य लेखकांचा, त्यांच्या शैलीचा, किंबहुना त्यांच्या पदसंहतींचाही स्पष्ट प्रभाव पडलेला आहे.

चैतन्यस्रवन्ती (१९५२) हा त्यांचा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे. बुच्चिबाबूकथलु (१९३९), निरंतरमयम् (१९५९) हे त्यांचे आणखी दोन उल्लेखनीय कथासंग्रह होत. त्यांच्या कथांतून आत्मनिष्ठता व अंतर्मुखता प्रतीत होत. जीवन, मृत्यू आणि भय यांच्या कचाट्यात सापडलेला प्राणी म्हणजे माणूस होय, असे त्यांचे प्रतिपादन आहे. नाटिका-नाटिकलु (१९६५) या ग्रंथात त्यांच्या काही लहान मोठ्या नाटकांचे आणि एकांकिकांचे संकलन असून त्यांच्या ह्या एकांकिका विशेष लोकप्रिय आहेत. आत्मवंचना (१९५१) व उत्तमाइल्लालु (म.शी. गुणी गृहलक्ष्मी १९५३) ही त्यांची नाटके सरस उतरली आहेत. मेड मेट्‍लु (१९५६) आणि गाजु मेड (१९५९) या त्यांच्या कादंबऱ्यातील पात्रे एक प्रकारच्या गतिरोधाने किंवा विवशतेने ग्रस्त झालेली दिसतात. त्यांची अतिशय गाजलेली मनोविश्लेषणात्मक कादंबरी चिवरकु मिगिलेंदि (म.शी. शेवटी काय उरले? १९५२) ही होय. तिच्यातील दयानिधी हा नायक मज्जाविकृत असून तो हॅम्लेटचाच एक नवीन अवतार आहे, असे वाटते. संज्ञाप्रवाहाच्या आधारे त्यांनी शेक्सपिअरच्या काही नाटकांचे परीक्षण शेक्सपिअर साहितीपरामर्शमु (१९६६) या ग्रंथात केले आहे. तेलुगू साहित्यात संज्ञाप्रवाहाचा व मनोविश्लेषणाचा कलात्मकतेने वापर करणारे बुच्चिबाबू हेच पाहिले लेखक आहेत.

संदर्भ : भीमसेन ’निर्मल’, संपा. तेलुगु का उपन्यास साहित्यः चिवरकु मिगिलेदि (पृ. १९३ ते २०७), हैदराबाद, १९६७.

लाळे, प्र. ग.