बुक्क, पहिला : (?-१३७७). संगम वंशातील विजयानगरचा दुसरा राजा. संगमाला हरिहर, कंपन, बुक्क, मारप्पा आणि मद्दप्पा अशी पाच मुले होती. बुक्कची पहिली नेमणूक गुत्तीचा किल्लेदार म्हणून झाली. १३४० मध्ये बुक्कने होयसळ राजापासून पेनुकोंड्याचा किल्ला जिंकून घेतला. पुढे तर १३४३ मध्ये होयसळांचे राज्य त्याने जिंकून घेतले. हरिहरच्या म्हणजे त्याच्या वडील भावाच्या कारकीर्दीत तो होयसळ राज्यातील होसपट्टण येथे राज्यपाल होता व त्याची प्रशासन व्यवस्था चोख होती, असा कोरीव लेखांत उल्लेख आढळतो. हरिहरचा दुसरा भाऊ कंपन हा हरिहरपूर्वी मरण पावला होता (१३५५). हरिहर निपुत्रिक वारल्यानंतर अग्रजाधिकारानुसार बुक्क गादीवर आला (१३५६). त्यामुळे त्याच्या पुतण्यांनी व नातेवाईकांनी बंडाळी केली पण बुक्कने या बंडळींचा बीमोड केला, असा कोरीव लेखात वृत्तांत आहे. त्याच्या कारकीर्दीत (१३५६-७७) विजयानगरची भरभराट होऊन वैभवशाली हिंदू राज्य म्हणून त्यास नावलौकिक प्राप्त झाला.
बुक्कने प्रारंभी विजयानगरच्या अंमलाखालील विविध प्रांतात स्वतंत्रपणे सत्ता गाजविणाऱ्या आपल्या पुतण्यांना परत बोलावून त्यांच्या जागी भास्कर भवदूर, कुमार कंपन, विरूपण्ण, चिक्क-कंपन, मल्लप्पा, हरिहर या स्वतःच्या मुलांना युवराज-राज्यपाल नेमले. त्यामुळे साहजिकच केंद्रीय सत्तेपासून फुटून बाहेर पडणारे सर्व प्रदेश एकछत्री अंमलाखाली आले. त्यानंतर त्याने राज्यविस्ताराचे धोरण अंगीकारले आणि प्रथम तमिळनाडूचा राजा राजनारायण संबुवराय व त्याचा मुलगा वेनरुमंकोण्डान यांवर स्वारी करून त्यांना जिंकले (१३६०). त्यानंतर त्याच्या कारकीर्दीतील बरीच वर्षे बहमनी सुलतानाशी झगडण्यात गेली. बहमनी सुलतान महमूदशाहाबरोबर झालेल्या युद्धात बुक्कने कृष्णा-तुंगभद्रा दुआबातील काही भाग जिंकला. यानंतर त्याने कोंडवीडूच्या रेड्डींना जिंकले. पुढे संबुवराय आणि तोंडइमंडलम या दक्षिणेकडील राजांना पादाक्रांत करून मदुरेच्या सुलतानावर स्वारी केली (१३७०) आणि मदुरा विजयानगरच्या आधिपत्याखाली आणली. या सुमारास दक्षिणेकडील बहुतेक प्रदेश विजयानगरच्या अंमलाखाली आला होता. त्याचे राज्य मदुरेपासून उत्तरेस तुंगभद्रेपर्यंत विस्तृत प्रदेशावर पसरले होते. बुक्कने राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. त्याने सायणाचार्यांकडून वेदांवर भाष्य लिहून घेतले. यावेळी वैष्णव व जैन धर्मपंथीय यांमध्ये वाद निर्माण झाला. तेव्हा त्याने तो मिटवून एक घोषणा केली आणि त्याद्वारे आपल्या राज्यात सर्व धर्मांना समान वागणूक मिळेल, असे शासनातर्फे आश्वासन देण्यात आले स्वतः वेदमार्ग-प्रतिष्ठापक ही उपाधी धारण केली आणि धर्म पंडितांना व तेलगू साहित्याला उत्तेजन दिले. नाचन सोम ह्या श्रेष्ठ तेलुगू कवीस त्याने राजाश्रय दिला. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने राज्याचे विभाग पाडून त्यांवर राज्यपालांची (महामंडलेश्वर) नियुक्ती केली.
अखेरच्या दिवसांत त्याचा कर्ता व शूर मुलगा कुमार कंपन मरण पावला (१३७४). तेव्हा त्याने गौरांबिका राणीपासून झालेल्या व राजकीय घडामोडींपासून अलिप्त असलेल्या हरिहर (दुसरा) यास गादीचा अधिकृत वारस नेमले.
संदर्भ : 1. Filliozat, Vasundhara, Ed. Vijayanagar Empire, New Delhi, 1977.
2. Majumdar, R. C. Ed. The Delhi Sultanate, Vol. VI, Bombay, 1971.
देशपांडे, सु. र.