बिहार राज्य : उत्तर भारतातील एक राज्य. २१० ५८’ ते २७० ३१’ उत्तर अक्षांश आणि ८३० २०’ ते ८८० ३२’ पूर्व रेखांश यांदरम्यान ते विस्तारलेले आहे. याच्या उत्तरेस नेपाळ हा देश असून पूर्वेस पश्चिम बंगाल, दक्षिणेस ओरिसा, पश्चिमेस मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश ही भारतातील राज्ये आहेत. क्षेत्रफळ १,७३,८७६ चौ. किमी. व लोकसंख्या ६,९८,२३,१५४ (१९८१). पाटणा (महानगरीय लोकसंख्या ९,१६,१०२) ही राज्याची राजधानी आहे.
भूवर्णन : राज्याचा उत्तरेकडील प्रदेश गंगेच्या मैदानाचा असून दक्षिणेकडील प्रदेश बव्हंशी छोटा नागपूर पठाराचा भाग आहे. पश्चिम भागात विंध्यश्रेणींतील कैमूर टेकड्यांचा डोंगराळ प्रदेश आहे. राज्याचा उत्तर भाग म्हणजे हिमालय पर्वताच्या पायथ्याचा तराई प्रदेश होय. राज्यातील नदीगाळाच्या सुपीक भूमीचा उतार दक्षिणेकडे असून ही भूमी राज्यातून पश्चिम-पूर्व वाहणाऱ्या गंगा नदीपर्यंत पसरलेली आहे. हिमालयात उगम पावणाऱ्या, मुख्यतः गंडक, बुरी गंडक, कोसी आणि बाघमती या नद्या, या राज्यातून वाहतात व गंगेला मिळतात. गंगेच्या उजव्या तीरावरून येणाऱ्या नद्यांमध्ये मध्य प्रदेशातून आलेली उत्तरवाहिनी शोण ही गंगेची प्रमुख उपनदी होय. बराकर, कोनार व बोकारो या दामोदर नदीच्या उपनद्या आणि सुवर्णरेखा, उत्तर कोएल आणि दक्षिण कोएल या नद्या राज्यातून वाहतात. गंगेच्या मैदानावर दक्षिणेकडे छोटा नागपूर पठाराचे अनेक फाटे आलेले आहेत. या त्रुटित पठाराची साधारण उंची उत्तरेकडून ६२० मी. पासून दक्षिणेकडे १,०८५ मी. पर्यंत वाढलेली असून वनाच्छादित टेकड्या आणि त्यांतील अरुंद खोल दऱ्या, असे या प्रदेशाचे स्वरूप आहे. पठाराचा ईशान्य भाग राजमहाल टेकड्यांचा असून पारसनाथ हे सर्वोच्च शिखर (१,३६६ मी.) हजारीबाग जिल्ह्यात आहे. बिहारच्या उत्तर भागाला १९३४ साली भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता.
राज्यातील मृदा उत्तर भागात पिवळसर बांगर किंवा जुन्या गाळाची असून ती पुष्कळदा कंकरमिश्रित आढळते. सखल भागात गंगेला मिळणाऱ्या नद्यांच्या पुरांनी हिमालयातून वाहून आणलेला गाळ आढळतो. छोटा नागपूर पठारावर खडे व पालापाचोळामिश्रित लाल माती दिसून येते. या पठाराचा गाभा नीस खडकांचा असून त्याच्याभोवती अभ्रक, सिलिका व हॉर्नब्लेंडयुक्त शिस्ट आढळतात. त्यात विविध धातूंच्या शिरा दिसून येतात. रूपांतरित खडकांच्या अनेक टेकड्या राज्याच्या दक्षिण भागात आहेत. राजमहाल टेकड्यांवर जांभा खडक आढळतो, तर विंध्यश्रेणींशी संबंधित अशा शाहाबाद जिल्ह्यात वालुकाश्म, शेल व चुनखडक हे प्रकार दिसून येतात. बिहार राज्य खनिजांनी विशेष संपन्न आहे. १९७८ च्या आकडेवारीप्रमाणे जगातील सर्वाधिक अभ्रक भारतात सापडले. त्यापैकी सु. ६०% या राज्यात, त्यातीलही ४०% गया, हजारीबाग व मोंघीर या जिल्ह्यांतून उपलब्ध होते. देशातील निम्मा कोळसा, ४०% लोहधातुक, शिवाय तांबे, चुनखडक, बॉक्साइट, मॅंगॅनीज, बेंटोमाइट, कायनाइट, क्रोमाइट, ॲस्बेस्टस आणि रेडियम देणारे पिचब्लेंड अशी अनेक महत्त्वाची खनीजे कमीजास्त प्रमाणात या राज्यात उपलब्ध आहेत. बिहारमध्ये मोठी नैसर्गिक सरोवरे नसली, तरी दामोदर नदी प्रकल्पामुळे तिलैया, कोनार, बोकारो, अइयार, बलिपहरी, मैथॉन, पानचेतहिल अशी अनेक धरणे तयार झाली आहेत. त्यांच्या पाण्याचा उपयोग मुख्यतः शेतीला आणि काही प्रमाणात वीजनिर्मितीसाठी होतो.
हवामान : हवामानाच्या बाबतीत बिहारचा प्रदेश गंगेच्या प्रवाहदिशेनुसार पश्चिमेच्या कोरड्या उत्तर प्रदेश राज्याकडून पूर्वेकडील बंगालच्या दमट प्रदेशाकडे जाणाऱ्या संक्रमणक्षेत्राचा आहे. सर्वसाधारण हवामान मैदानात उष्ण्कटिबंधीय, उन्हाळी पावसाच्या सॅव्हाना प्रदेशासारखे असून पठारी भागात ते उपपर्वतीय स्वरूपाचे आहे. राज्यातील तपमान किमान ३.९० ते ९.४० से. व कमाल ४०० ते ४६० से. यांदरम्यान असते. दक्षिणेच्या पठारावर हवा जास्त थंड राहते व पाऊस अधिक पडतो. राज्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९ ते १५९ सेंमी. असून ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते.
वनस्पती व प्राणी : राज्यातील तृणे, पीके व वनस्पती सामान्यतः उत्तर भारतात सर्वत्र आढळणाऱ्याच आहेत. वनाच्छादित भूमी १९% असून मैदानी प्रदेशात आंबा, नारळ, जांभूळ, बेल, कडुलिंब, पिंपळ, बोर, बाभळ इत्यादी तर डोंगराळ भागात प्रामुख्याने महुआ, शाल, शिसव इ. वृक्षप्रकार आढळतात. बांबू, गवत व विविध वनौषधीही दिसून येतात. एकेकाळी विपुल असलेले तराई प्रदेशातील वाघ गंगेकाठच्या सखल भागातील कोल्हा, लांडगा, साळिंदर दक्षिणेच्या पठारावरचे अस्वल, चित्ता, वानर असे वन्य प्राणी जमीन लागवडीच्या विस्तारामुळे आणि पूर्वी झालेल्या अनिर्बंध शिकारीमुळे फार कमी झाल्याने राज्यशासनाने आता वनप्रदेशात दोन राष्ट्रीय उद्याने व सोळा अभयारण्ये उभारली आहेत. मर्यादित मृगयेसाठी २३४ शिकारगाळ्यांची सोय केली आहे. हजारीबागनजीकच्या राष्ट्रीय उद्यानात, त्याचप्रमाणे दामोदर प्रकल्पाच्या परिसरात दरवर्षी स्थलांतरी पाणपक्षी आढळतात.
ओक, शा. नि. पंडित, अविनाश
इतिहास : बिहार हे विहारचे अपभ्रष्ट रूप आहे. मुसलमान आक्रमकांनी या प्रदेशातले विशेषतः उदंडपुर (सध्याचे बिहारशरीफ) जवळचे बौद्ध विहारांचे वैपुल्य पाहून हे नाव दिले. प्राचीन काळी गंगेच्या उत्तरेस विदेह, दक्षिणेस मगध व पूर्वेस असलेल्या अंग या राज्यांचा प्रदेश आधुनिक बिहारमध्ये मोडतो. ऋग्वेदात मगधचा उल्लेख विकोट असा आहे. शतपथ ब्राह्मणात विदेहचा उल्लेख आढळतो. अथर्ववेद, यजुर्वेद यांतील उल्लेखांवरून वैदिक आर्य या प्रदेशाला परकीय मानीत, असे दिसते. हळूहळू आर्यसंस्कृतीच्या प्रसाराला या प्रदेशात इ. स. पू. सु. हजार वर्षांपासून सुरुवात झाली असावी. त्याचा प्रारंभ उत्तर बिहारमध्ये झाला.
या राज्यासंबंधी रामायण-महाभारत या महाकाव्यांत अनेक उल्लेख आढळतात. मगधची एका वेळची राजधानी गिरिव्रज (राजगृह किंवा राजगीर) येथे आढळणारा प्रचंड कोट जरासंधाने बांधला, अशी आख्यायिका आहे. रामायणात गिरिव्रजाची स्थापना विदेहचा राजा जनक याने केली असा उल्लेख असून राजधानी मिथिला नगरीचे वर्णन आहे. पुराणांत या राज्यकर्त्यांच्या वंशावळीही दिल्या आहेत. इ.स.पू. सहाव्या शतकात या प्रदेशात मगध आणि अंग ही राज्ये व वैशाली-विदेह प्रदेशांत लिच्छवींचे वृजी हे गणराज्य होते. मगधातील बृहद्रथ वंशीय राजांना बाजूला सारून बिंबिसाराने (सु. इ. स. पू. ५४५) अंग राज्यही जिंकले आणि विवाहसंबंध जोडून मुत्सद्देगिरीने मगधचे प्राबल्य वाढवले. मगधची तेव्हाची राजधानी राजगृह व अंगाची चंपा. गौतम बुद्ध व वर्धमान महावीर हे अनुक्रमे बौद्ध व जैन धर्मांचे संस्थापक याच काळातले. बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू याने लिच्छवी व कोसल जिंकले, नातू उदायिन याने पाटलिपुत्र (पाटणा) वसवले. महापद्मनंदाने मगध राज्याचे साम्राजात रूपांतर केले. अखेरचा नंद सम्राट धनानंद याला दूर करून चंद्रगुप्त मौर्याने मौर्य वंशाची स्थापना केली (इ. स. पू. ३२४). यात त्याला चाणक्याची मदत झाली. चंद्रगुप्तानेही राज्यविस्तार केला. त्यात त्याचा नातू सम्राट अशोक याने भर घातली. भारतभर पहिला एकछत्री अंमल स्थापन करणारे मौर्यच होत. कलिंग जिंकल्यावर हिंसेचा तिटकारा येऊन अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर मात्र मौर्यांची सत्ता क्षीण झाली. इ. स. पू. २२०-२०० च्या सुमारास बॅक्ट्रियन ग्रीकांनी मगधवर स्वारी केली. इ. स. पू. १८७ मध्ये पुष्यमित्र शुंगाने मगधचे राज्य बळकावले. तो वैदिक धर्मी होता. त्यानंतर शुंग (इ.स.पू. १८५-७५) आणि कण्व (इ.स.पू. ७५-३०) या वंशांनी राज्य केले. या काळात कलिंग राजा खारवेलने मगधवर दोनदा आक्रमण केले. इ. स.च्या पहिला शतकात कुशाणांचे वर्चस्व स्थापन झाले. इ. स. ३२० मध्ये गुप्त सम्राट चंद्रगुप्तापर्यंत मगधचा इतिहास फारसा स्पष्ट नाही. गुप्तकाल (इ. स. ३२०-५५०) बिहारच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील सुवर्णयुग समजतात. एकाहून एक पराक्रमी अशा या सम्राटांनी राज्यविस्ताराबरोबरच विद्या, कला, शास्त्रे यांना उत्तेजन दिले हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन केले आणि व्यापार वाढवला. चिनी प्रवाशांनी वर्णिलेल्या नालंदा व विक्रमशिला या मगधातील विद्यापीठांचा उत्कर्ष या व नंतरच्या काळात झाला. इ. स. ५५० मध्ये गुप्त वंशाचा ऱ्हास होऊन त्यांचे मांडलिक मौखरी प्रबल झाले पण त्यांनी फार काळ टिकाव धरला नाही. गौड राजा शशांक याने सातव्या शतकाच्या प्रारंभी मगधवर वर्चस्व स्थापले. त्याचे साम्राज्य मोठे होते पण त्याच्या मृत्यूनंतर ते टिकले नाही. मगधवर प्रथम पूर्णवर्मा आणि नंतर हर्षवर्धनाने प्रभुत्व स्थापले. हर्षवर्धनाच्या मृत्युनंतर तिबेटमधून मगधवर स्वाऱ्या झाल्या. सातव्या शतकाच्या मध्यास गुप्त वंशाचे पुनरुज्जीवन झाले, त्यातला देवगुप्त पराक्रमी होता पण इ. स. ७२५ नंतर गुप्त वंशाची ही शाखाही लुप्त पावली आणि कनौजच्या यशोवर्म्याने मगधवर स्वामित्व स्थापले. नंतरचा अस्थिर काळ सोडला तर इ. स. ७५० मध्ये बंगालमध्ये प्रबळ झालेला पाल वंशीय राजा गोपाल याने बिहारमध्ये आपली सत्ता स्थापली. पाल राजांनी बिहारवर सु. एक शतक (७५० – ८५८) राज्य केले. देवपाल हा त्यांतला सर्वांत कर्तबगार होता. पाल राजे बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांनी कलेला उत्तेजन दिले. नवव्या शतकाच्या अखेरीस प्रबळ झालेल्या गुर्जर प्रतिहारांना ते तोंड देऊ शकले नाहीत. दहाव्या शतकात कलचुरी व अकराव्या-बाराव्या शतकांत गाहडवाल या वंशांच्या राजांनी पालांची बिहारपर्यंतची सत्ता निर्बल केली. अकराव्या शतकाच्या अखेरीस कर्णाटक वंशाने मिथिलेचे राज्य हस्तगत केले. त्याचा संस्थापक नान्यदेव याची राजधानी सीमरामपुर (चंपारण्य जिल्हा) येथे होती. याच काळात मैथिली भाषेचा उदय झाला आणि न्याय-मीमांसा तत्त्वज्ञानाचा विस्तारही झाला.
बाराव्या शतकाच्या अखेरीस बख्तियार खल्जीने बिहारवर स्वारी करून तो आपल्या कबजात आणला. तत्पूर्वीच इस्लामी संस्कृतीचा बिहारला परिचय झाला असावा. बख्तियार अयोध्येच्या सुभेदारीवर असून महत्त्वाकांक्षी होता. त्याने उदंडपुर, विक्रमशिला आदी विहारांचा नाश केला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या उमरावांत माजलेल्या तंट्यांमुळे दिल्लीचा सुलतान कुत्बुद्दीन ऐबकला बिहारवर वर्चस्व स्थापण्याची संधी मिळाली. यानंतर बंगालवर अंमल गाजवू लागलेल्या मुसलमान सुभेदारांनी बिहारवर सत्ता गाजवू पाहावी आणि दिल्लीच्या सुलतानांनी त्याविरुद्ध मोहिमा काढाव्यात, असा प्रकार सुरू झाला. तुघलकांनी ताब्यात आणलेला बिहार चौदाव्या शतकात जौनपूरच्या शर्की सुलतानांनी जिंकला. सिकंदर लोदीने पुन्हा एकदा दिल्लीचा पगडा बसविला पण नंतर नुहानी अफगाण प्रबळ झाले. या काळात मिथिलेच्या कर्णाटकांकडून ऑइनवार वंशाकडे गेलेले राज्य नाममात्र मांडलिक होते. संस्कृत विद्या तिथे फुलत राहिली. विद्यापती हा मैथिली कवी याच काळातला. सुफी पंथामुळे बिहारच्या बऱ्याचशा भागात इस्लामचा प्रसार झाला. १५२९ मध्ये गोग्राच्या लढाईत अफगाणांचा पराभव करून बाबरने बिहारमध्ये मोगल सत्तेची स्थापना केली. ससारामचा जहागीरदार शेरशाह सूर (कार. १५३८-४५) याने अफगाणांचे पुनरुज्जीवन केले. शेरशाहने बिहारच्या प्रशासनासाठी केलेली व्यवस्था मोगल शासनाला पायाभूत ठरली. अनेक बंडाळ्या मोडून मोगल सम्राट अकबराने बिहार हा आपल्या साम्राज्याचा स्वतंत्र सुभा निर्माण केला (१५७५). शाहजहानने बापाविरुद्ध बंडाळी केली, तेव्हा इथे आश्रय घेतला. त्याच्या मुलांपैकी शुजाच्या ताब्यातही काही काळ बिहार होता. त्याचा पराभव करून गादी बळकावल्यावर औरंगजेबने आपले सुभेदार नेमायला सुरुवात केली. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याच्या शाइस्ताखान, दाऊदखान इ. सुभेदारांनी राजा प्रतापला जिंकून पालामाऊवर कबजा मिळवला. १७०३ मध्ये औरंगजेबाने त्याचा नातू अझीम-उश-शान याला बंगालबरोबर बिहारची सुभेदारी दिली. पुन्हा एकवार बंगालच्या सुभेदारांचे बिहारवर स्वामित्व सुरू झाले. मोगलसत्तेचा ऱ्हास होऊ लागताच बिहारमध्येही राजकीय अस्थिरता निर्माण झाली. अलीवर्दीखानाने बंगालची सुभेदारी बळकावल्यावर (१७४०) नागपूरकर भोसल्यांनी बंगालबरोबर बिहारवरही स्वाऱ्या करून खंडणी जमा केली. सिराजुद्दौल्याचा क्लाईव्हने प्लासीच्या लढाईत पराभव केला (१७५७). तेव्हा सिराजचा बिहारमधला नायब राजा रामनारायण होता.
सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने पाटणा, छप्रा वगैरे शहरांत वखारी उघडल्या होत्या. कंपनीने बंगालच्या सुभेदारीवर मिळविलेल्या वर्चस्वाचा परिणाम बिहारवरही झाला. क्लाईव्हने गादीवर आणलेल्या बंगालचा सुभेदार मीर जाफर याजकडून सोन्याचा एकाधिकार मिळवला (१७५८). सोरा बिहारमध्येच निर्माण होई व बंदुकांच्या दारूसाठी तो अत्यंत आवश्यक होता. त्याचा पुढील युद्धांत कंपनीला चांगलाच उपयोग झाला. १७६० मध्ये सुभेदारी बळकावलेल्या मीर कासिमने बिहारवर पुरता अंमल बसवण्यासाठी मोंघीरला राजधानी हलवली आणि विरोधी जमीदारांवर जरब बसवली पण खाजगी व्यापाराच्या प्रश्नावरून त्याचा कंपनीशी संघर्ष झाला आणि बिहारमधल्या तीनचार लढायांत त्याचा पराभव झाला. याच काळात (१७५९-६४) झालेल्या मोगलांच्या आक्रमणाला इंग्रजांनी चोख उत्तर दिले तथापि बादशाह शाह आलम (दुसरा) दिल्लीच्या तख्तावर राहिलाच. पराभूत मीर कासिमने त्याचे व अयोध्येचा नबाब शुजाउद्दौला यांचे साह्य घेतले पण बक्सारच्या लढाईत शुजाचाही पराभव झाला (१७६४). पुढल्या वर्षी शाह आलमने कंपनीला बंगाल-ओरिसाबरोबर बिहारचीही दिवाणी (महसूल वसुलीचा हक्क) दिली आणि बिहार इंग्रजांच्या पूर्ण कबजात आला.
बिहारच्या रयतेची स्थिती १७६८-७० च्या भयानक दुष्काळात अतिशय हलाखीची झाली. वसुली कंपनीची आणि कारभार सुभेदारांचा या पद्धतीमुळे प्रजेचे हाल वाढले. १७७२ पासून मात्र त्यात बदल झाला. सुरुवातीला प्रत्यक्ष वसुलीचे काम भारतीयांकडेच असे पण कॉर्नवॉलिसच्या धोरणानुसार शासनात सर्वत्र यूरोपीयांची भरती होऊ लागली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर (१७६१) मराठ्यांचे उत्तर भारतात पुनरुज्जीवन होऊ लागले. त्यांच्या हालचालींवर नजर ठेऊन पायबंद घालण्यासाठी कंपनीला बिहारचा चांगलाच उपयोग झाला. बिहारच्या सखल भागावर कंपनी अंमल बसवू शकली, तरी छोटा नागपूर, संथाळ परगणा यांसारख्या डोंगराळ, जंगल माजलेल्या भागांवर तो बसवणे सोपे नव्हते. या भागातील आदिवासी वरचेवर कंपनीची सत्ता झुगारून देत. त्याचे मुख्य कारण आर्थिक होते. अशा बंडाळ्यांपैकी १८२०-३२ मधले कोल, भूंजिया, भूमिज, हो जमातींचे उठाव १८५५-५६ व १८७०-७५ दरम्यान संथाळांची आंदोलने आणि १८९८-१८९९ दरम्यानचा बिर्सा भगवान (मुंडा) याच्या नेतॄत्वाखालील उठाव हे इंग्रजांना सैन्य वापरूनच दडपावे लागले.
बिहारच्या जमीनदारांनी बनारसचा राजा चेतसिंग व अयोध्येचा पदच्युत नबाब वझीर अली यांना दाखवलेल्या सहानुभूतीमागे ब्रिटीशांविरुद्धचा असंतोषही असावा. १८५७ मध्ये या असंतोषाचा भडका उडाला. दानपूर, भागलपूर, हजारीबाज इ. ठाण्यांच्या शिपायांनी तर बंड केलेच पण जगदीशपूरचे राजे कुँवरसिंह, त्यांचे बंधू अमरसिंह इत्यादींच्या नेतॄत्वाखालील आंदोलने बिहारभर पसरली. सैन्यबलानेच त्याचा बीमोड झाला. वहाबी या ब्रिटिश विरोधी कडव्या मुस्लिम पंथाचेही पाटणा हे महत्त्वाचे केंद्र होते. १८६४ मध्ये त्यांचा पुढारी अहमदुल्ला याला काळ्या पाण्याच्या शिक्षेवर धाडल्यावरच ती चळवळ थंडावली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बंगाली क्रांतिकारकांचे लोण बिहारपर्यंत पोहोचले. संथाळ परगणा हे त्यांचे केंद्र. बंगालमध्ये स्थायिक झालेले महाराष्ट्रीय सखाराम गणेश देऊस्कर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. १९०८ मध्ये खुदिराम बोसने मुझफरपूरला बाँब फेकला त्यात दोन युरोपीय ठार झाले. खुदिराम फाशी गेला. बिहार प्रांतिक काँग्रेस समिती १९१२ मध्ये स्थापन झाली. अनुशीलन समितीची शाखाही पाटण्याला स्थापन झाली होती (१९१३). १९१७ मध्ये गांधीजींनी चंपारण्यामधल्या निळीच्या मजुरांच्या गाऱ्हाण्यांची आंदोलने करून दाद लावून घेतली. त्याच वर्षी पाटणा विद्यापीठ विधेयकातील प्रतिगामी कलमांच्या विचारांसाठी प्रांतिक काँग्रेसची खास बैठक आणि तिच्या कार्यकारी मंडळाची अधिवेशने इत्यादींमुळे राजकीय जागृती मोठ्या प्रमाणावर झाली. होमरूल लीग, असहकार, खिलाफत, चळवळ, सविनय कायदेभंग, भारत छोडो अशा काँग्रेसप्रणीत सर्व राष्ट्रीय चळवळींत बिहारी जनतेने भाग घेतला वैयक्तिक व सामुदायिक सत्याग्रह केले खादी, मद्यपाननिषेध, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी अशा अनेक कार्यक्रमांना प्रतिसाद दिला. १९२१ मध्ये बिहार राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन झाले. १९३४ मधल्या भूकंपाने बिहारवर साऱ्या देशाचे लक्ष केंद्रित झाले. स्वराज्य पक्षाच्या आदेशानुसार नगरपालिका, विधिमंडळ यांच्या निवडणुकांत बिहार भाग घेतच असे. १९३७ मध्ये पहिले काँग्रेस मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. त्याने पक्षाच्या आदेशानुसार १९३९ मध्ये राजीनामा दिला. विसाव्या शतकाच्या प्रारंभी दिसलेले हिंदु-मुस्लिम ऐक्य मात्र पुन्हा दिसले नाही. १९२४, १९२६-२७ आणि विशेषतः १९४६-४७ मध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगे उसळले. १९४२ च्या चळवळीत पाटण्यात मारल्या गेलेल्या सात विद्यार्थ्यांच्या स्मृतिनिमित्त १५ ऑगस्ट १९४७ रोजी पाटणा सचिवालयाजवळ हुतात्म्यांचे स्मारक उभारले गेले.
बिहार प्रांतिक परिषदेने केलेल्या १९०८ मधील ठरावात वेगळ्या बिहार प्रांताची मागणी होती. त्याच वर्षी सरकारला तत्संबंधी निवेदन पाठवण्यात आले. त्याच्या व वंगभंगाच्या आंदोलनाच्या परिणामी १९१२ मध्ये बिहार-ओरिसा बंगालपासून अलग करण्यात आला. १९३६ मध्ये बिहार ओरिसापासूनही विलग झाला. स्वातंत्र्योत्तर काळात १९४८ मध्ये सराईकेला आणि खर्सावान ही सिंगभूम जिल्ह्यालगतची संस्थाने विलीन झाली. १९५६ मध्ये राज्यपुनर्रचना समितीच्या अहवालानुसार पुर्णिया जिल्ह्याचा काही भाग व मानभूम (पुरूलिया) जिल्ह्याचा बराचसा भाग (सु ५,००० चौ.किमी.) शासनाच्या सोयीसाठी प. बंगालला जोडण्यात आला.
राज्यव्यवस्था : भारतीय संघराज्यातील हे एक घटक राज्य आहे. राष्ट्रपतींनी नेमलेला राज्यपाल राज्यप्रमुख असला, तरी विधिमंडळाला जबाबदार असलेला मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कामकाज पाहतात. विधिमंडळ द्विसदनी असून विधानसभेत ३१४ आणि विधानपरिषदेत ९६ सदस्य असतात. लोकसभेवर ५३ व राज्यसभेवर २२ सदस्य राज्यातून निवडून जातात. शासनाच्या सोयीसाठी पाटणा, भागलपूर, तिर्हूत व छोटा नागपूर असे चार विभाग केलेले असून ३१ जिल्हे आहेत. पाटणा ही राज्याची राजधानी आहे.
इ. स. १९५०-५१ व १९६५-६६ मध्ये दुष्काळ आणि १९५४ मध्ये महापूर यांमुळे निराश्रित झालेल्या लोकांचे पुनर्वसन, आर्थिक मदत हे शासनाचे प्रमुख प्रश्न होते. स्वातंत्र्योत्तर काळात जमीनदारी नाहीशी व्हावी, ‘बकस्त’ जमिनीचे तंटे मिटावे, म्हणून खास कायदे करण्यात आले. ‘पंचायती राज’च्या कायद्यानुसार ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा-परिषद अशी त्रिसूत्री पंचायत योजना अंमलात आली असून औद्योगिकीकरण, शिक्षण, आरोग्य, वीज, पाटबंधारे, घरबांधणी, समाजकल्याण या क्षेत्रांत राज्याने प्रगती केली आहे. पुरांपासून संरक्षण, वनसंरक्षण आणि आदिवासींचे कल्याण हे राज्याचे खास प्रश्न आहेत.
एप्रिल १९६४ पासून फेब्रुवारी १९६७ पर्यंत काँग्रेस पक्ष अधिकारावर होता. त्यानंतर दोन निवडणुका झाल्या तरी कोणत्याच पक्षाला निर्विवाद बहुमत मिळू शकले नाही. १९६७ पासून सातवेळा मुख्यमंत्री बदलले आणि जून १९६८-फेब्रुवारी १९६९ व सप्टेंबर १९६९-फेब्रुवारी १९७० अशी दोनदा राष्ट्रपतींची राजवट लागू करावी लागली. १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव करून प्रथमच काँग्रेसविरोधी सरकार स्थापन केले पण ते अल्पकाळच टिकले. २८-३१ मे १९८० च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस (इं.) पक्षाला बहुमत मिळाले आणि त्या पक्षाचे मंत्रिमंडळ सत्तारूढ झाले. विधानसभेच्या एकूण ३१४ जागांपैकी ३१० जागांच्या निवडणुका होऊन त्यात पक्षोपपक्षांचे बळ खालीलप्रमाणे होते : काँग्रेस (इं.)-१६६, काँग्रेस (अ)-१४, भारतीय जनता पक्ष-२१, जनता पक्ष-१३, लोकदल-४२, कम्युनिस्ट पक्ष-२३, झारखंड मुक्तिमोर्चा-१३, कम्युनिस्ट पक्ष-(मार्क्सिस्ट)-६, स्वतंत्र-१९ व इतर-३. झारखंड मुक्तिमोर्चा, ऑल इंडिया फॉर्व्रर्ड ब्लॉक इ. प्रादेशिक पक्षांनीही या निवडणुकीत भाग घेतला होता.
गोखले, कमल
आर्थिक स्थिती : देशाची ५.७% भूमी व १०.६% प्रजा असणाऱ्या या राज्यात शेतीवर अवलंबून असणारांची संख्या सु. ७७% आहे. १९७५-७६ मध्ये राज्याच्या एकूण सु. पावणेदोन लाख चौ. किमी. भौगोलिक क्षेत्रापैकी २९,००० चौ. किमी. वनाच्छादित २७,००० चौ. किमी. बिगरशेती उपयोगात ११,६०० चौ. किमी. नापीक २००० चौ. किमी. चराईखाली २००० चौ. किमी. वृक्षारोपित ६००० चौ. किमी. शेतीयोग्य पडिक असून बाकीची लागवडीखाली आहे. लागवडीखालील जमिनीपैकी तांदूळ, गहू, मका, डाळी इ. अन्नधान्ये ८१,००० चौ. किमी. मध्ये तेलबिया १०,८०० चौ. किमी. मध्ये कपाशी-ताग-अंबाडी-वाख मिळून २३०० चौ. किमी. आणि तंबाखू, करडई, हळद, बटाटे इ. इतर पिके मिळून १००० चौ. किमी. अशा क्षेत्रांतून लावली होती. त्यांतून उत्पादन (हजार मेट्रिक टनांत) अन्नधान्ये ९८६४ तेलबिया १०१ कापूस ९२ हजार गासड्या व इतर ६१९६ याप्रमाणे झाले. या भुमि-उपयोगात १९७७-७८ मध्येही काही विशेष फरक झालेला नाही व नगदी पिकांपैकी ऊस उत्तरेकडील, ताग पूर्वेकडील व तंबाखू मोंघीरशेजारच्या जिल्ह्यांतून घेतला जातो. खतांचे वितरण राज्य सहकारी संस्थेमार्फत होते.
लागवडीखालच्या जमिनीपैकी ३१% किंवा ३,३६३ चौ. किमी. जमीन पाटाच्या पाण्याने भिजते. बिहारमधील जमीनदारी पद्धत संपूर्णपणे नष्ट करण्यात आली असून जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून शासनाला खंड मिळू लागला आहे. १९७२ साली राज्यातील पशुधनात सु. दीड कोटी गाईबैल, ३६ लाख म्हशीरेडे, ९.८२ लाख मेंढ्या, ७३.६३ लाख बकऱ्या, ८.७८ लाख डुकरे, ९८ हजार घोडीतट्टे, ४८३ खेचरे, ३० हजार गाढवे, सव्वाशे उंट व सव्वा कोटीच्यावर कोंबड्या होत्या. १९७४-७५ मध्ये राज्याच्या सु. ३० हजार चौ. किमी. घनप्रदेशातून इमारती लाकूड, जळाऊ लाकूड, बांबू, सबाई गवत, केंडूची पाने इत्यादींद्वारे १.२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यात बिहारच्या छोटा नागपूर पठाराचा वाटा मोठा आहे.
उद्योग : स्वातंत्र्यपूर्व काळात बिहारमध्ये जमशेटपूर येथे टाटांच्या पोलाद कारखान्याचा एकच मोठा औद्योगिक प्रकल्प होता. स्वातंत्र्योत्तर काळात या प्रकल्पाची आणखीनच वाढ झाली व जमशेटपूर येथेच विजेची एंजिने तयार करण्याचा कारखाना सुरू झाला. सार्वजनिक क्षेत्रातही अनेक कारखाने राज्यात निघाले. उदा. बोकारो येथील पोलाद कारखाना, सिंद्रीचा खत कारखाना, बरौनी येथील तेल शुद्धीकरण कारखाना, रांची येथील अवजड यंत्रे आणि अवजड यंत्रावजारे इत्यादींचे कारखाने आहेत. जमालपूरची रेल्वे कर्मशाळा, मुरी येथील ॲल्युमिनियमचा कारखाना व गोमियाचा स्फोटकांचा कारखाना हे केंद्र सरकारचेच उपक्रम आहेत. यांशिवाय कागद (डालमियानगर), तांबे (घाटसिला), जस्त (तुंडू), स्कूटर (फतवा) इत्यादींचे महत्त्वाचे कारखाने आहेत. राज्यात २९ साखर कारखाने, ७ सिमेंट कारखाने, ७ ऊर्ध्वपातन भट्ट्या व तीन ताग गिरण्याही आहेत. रांची येथील राष्ट्रीय कोळसा विकास संशोधन महामंडळाचे केंद्रीय कार्यालय व ओतकाम तंत्राची राष्ट्रीय संस्था आहे तर धनबाद येथे इंधन संशोधन संस्था व खाणकामाचे शिक्षण केंद्र आहे. उद्योगधंद्यांच्या विकासाकरिता बिहार उद्योग विकास महामंडळ, बिहार राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ, बिहार राज्य अर्थ महामंडळ, बिहार राज्य लघुउद्योग महामंडळ यांमार्फत कार्य केले जात आहे. राज्यशासनाने रेशीम गिरणी (भागलपूर), वीजसामग्रीचा कारखाना (रांची) असे अनेक नवे औद्योगिक उपक्रम सुरू केले आहेत. बोकारो, दरभंगा, आदित्यपूर, रांची, मुझफरपूर, पाटणा येथे औद्योगिक क्षेत्रे व राज्यातील दहा केंद्रांत औद्योगिक वसाहती स्थापन करून छोट्या कारखान्यांसाठी १८३ छपऱ्या उभारून त्यांपैकी ११० कर्मशाळांकडे सोपविल्या आहेत. राज्यातील कुटिरोद्योगांत हातमाग कापड उत्पादन हा सर्वांत जास्त सुसंघटीत उद्योग आहे. राज्यात वेतकाम, कागदलगदा, काशाची व पितळेची भांडी हे हस्तव्यवसायही चालतात. टसर रेशमाचे देशातील सर्वाधिक उत्पन्न या राज्यात होते. रेशीमकिडे पाळण्यापासून रेशमी कापड विणकामापर्यंत सर्व कामात मिळून सु. १ लाख लोक गुंतलेले असून, शासन त्यांना विविध सहकारी संस्थांमार्फत मार्गदर्शन करते. देशाचे ३५% खनिज संपत्ती बिहारमध्येच असल्यामुळे अनेकविध खनिजे काढणे हाही येथे एक महत्त्वाचा उद्योग आहे. १९७५ मध्ये राज्याची वीज निर्मितीक्षमता सु. १,७३२ मेगॅवॉट असून जवळजवळ ९५% क्षमता औष्णिक वीज निर्मितीची आहे. दरडोई वीजवापर ८९ किवॉ. आहे. पत्रातू व बरौनी येथे औष्णिक व सुवर्णरेखा, गंडक व कोसी नद्यांवर जलविद्युत् निर्मिती होते. सु. १७ हजार खेड्यांपर्यंत वीज पोहोचली असून अंदाजे दीड लाख नलिकाकूपांना व १५ हजारांवर पंपांना वीजपुरवठा होत आहे.
दळणवळण : राज्यातील लोहमार्गांपैकी औद्योगिक परिसरातील मार्गांचे विद्युतीकरण चालू आहे. राज्याच्या उत्तर भागातील २,२०५ किमी. लोहमार्ग मध्यम मापी व दक्षिण भागातील २,८०२ किमी. रुंद मापी आहेत. गंगा नदीमुळे त्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्यास नौका व घाट हीच साधने शक्य आहेत. गंगा नदीवर बरौनी व मोकामा यांना जोडणारा एक पूल बांधलेला आहे. १९७२ साली राष्ट्रीय महामार्गांखेरीज राज्यात सु. १,१६,५७५ किमी. लांबीचे महामार्ग होते. त्यांपैकी सु. २५% पक्के असून बहुतेक दक्षिण भागात आहेत. राज्यवाहतूक परिवहनाच्या १,६०० बसगाड्या रोज सु. १.४० लाख किमी. प्रवास करतात. गंगा व घागरा नद्यांतून १,३७० किमी. आणि कालव्यांतून ३७३ किमी. जलवाहतूक चालते. राजधानी पाटणा दिल्ली व कलकत्ता या शहरांशी तर रांची व जमशेटपूर ही शहरे कलकत्त्याशी हवाई मार्गांनी जोडलेली आहेत. राज्यात १९७८ मध्ये ७,२९,२११ रेडिओ परवानाधारक होते, तर त्याच वर्षी २५ दैनिके व ४१० इतर संकीर्ण नियतकालिके प्रसिद्ध होत होती.
लोक व समाजजीवन : बिहारमध्ये १९७१ च्या शिरगणतीनुसार सु. ५.६४ कोटी प्रजेपैकी ४.७० कोटी हिंदू, ७६ लाख मुसलमान, १० लाखांवर आदिवासी, ६.५ लाख बहुसंख्य ख्रिस्ती झालेले आदिवासी आणि शीख, जैन, बौद्ध वगैरे मिळून २ लाख होते. अनुसूचित जातींची व जमातींची संख्या अनुक्रमे ८० व ४९ लाख आहे. आदिवासींची संख्या ओरिसा व मध्य प्रदेशाखालोखाल बिहारमध्ये, बव्हंशी छोटा नागपूर पठारावर आहे. त्यांच्या २९ जमातींची वस्ती रांची, सिंगभूम व संथाळ परगण्यांत असून प्रमुख जमातींपैकी संथाळ, मुंडा, हो, खोंड व भुईया यांच्या बोली ऑस्ट्रिक आणि ओराओं, खाडिया, माल पहाडिया यांच्या द्राविडी भाषाकुटुंबातील आहेत. राज्यात १९८१ मध्ये दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ८३३ होती. याच वर्षी १ लाखांवर वस्तीची १६ शहरे होती. राज्यात काम करणाऱ्या २,०७,१२,२१५ कामगारांपैकी ७९.२१% शेतीत, ३.०१% घरगुती व्यवसायांत व १७.७८% इतर व्यवसायांत गुंतलेले होते.
सर्वसामान्यतः बिहारी लोक वर्णाने काळे असून त्यांची राहणी साधी असते. स्त्री-पुरुषांच्या पोषाखात उत्तर प्रदेश व बंगालमधील पेहेराव पद्धतींचा समन्वय दिसतो. त्यांचा आहार बहुधा शाकाहारी असला, तरी मांसभक्षण त्यांना वर्ज्य नसते. अन्नप्रकारात विविधता कमी असते. उकडा तांदूळ खाण्याची पद्धत आढळते. फणसाचा उपयोग भाजीसाठी अधिक करतात. पोह्यांना ते ‘चूडा’ म्हणतात व ते दही किंवा दुधाबरोबर खातात. सरसू किंवा मोहरीचे तेलही आहारात असते. अन्नवस्त्रनिवारादी पद्धती गंगेच्या प्रवाहाबरोबर उत्तर प्रदेशाकडून बंगालकडे बदलत गेलेल्या दिसतात. बिहारी लोक काहीसे भोळे, भाविक पण हट्टी वाटतात. त्यांच्यात ब्राह्मण, कायस्थ, राजपूत व भूमिहार असे चार ढोबळ वर्ग आढळतात. बिहारी असा एकजिनसी समाज नाही. वेगवेगळ्या जाती व विविध आदिवासी जमाती यांतून हा समाज विखुरलेला आहे. त्यामुळे महापूर, दुष्काळ, आर्थिक विकासातील गतिरोध अशा आपत्तींना तोंड देण्याच्या सामुदायिक प्रयत्नात अडथळेही येतात. राज्यातील नैसर्गिक संपत्तीचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाला पुढाकार घ्यावा लागतो.
बिहारचे लोक सामान्यतः उत्तर भारतीय व बंगाली हिंदूंचे सण पाळतात. ‘खिचडीका दिन’ (संक्रांत), सरस्वतीपूजा, होळी, दसरा, दिवाळी आणि त्रिपुरी पौर्णिमा या सणांखेरीज ‘छठ’ म्हणजे कार्तिक शुद्ध षष्ठी या सूर्यपूजेच्या सणाला बिहारी स्त्रियांत विशेष महत्त्व आहे. ‘रक्षाबंधन’, कृष्ण-जन्माष्टमी आणि तीज अथवा भाद्रपद शुद्ध तृतीया हे सणाचे दिवस मानण्यात येतात.
बिहार राज्यात हिंदीबरोबर उर्दू व बंगाली भाषाही महत्त्वाच्या आहेत. उत्तर भागातील मैथिली हा हिंदीचाच एक जुना अभिजात नागर आविष्कार मानला जातो व आजही मैथिलीत साहित्यनिर्मिती होत आहे. पश्चिमेकडील भोजपुरी, दक्षिणेची मगही व छोटा नागपूर पठारावरची कूर्माली या बिहारमधील बोली हिंदीचेच प्रकार मानता येतात, आदिवासींच्या बोलींची संख्याही मोठी आहे. बिहारमध्ये १९८१ च्या शिरगणतीनुसार साक्षरतेचे प्रमाण एकूण २६.०१% होते. स्त्रियांमध्ये हे प्रमाण १३.५८% होते. १९७९-८० मध्ये राज्यात अंदाजे ५१,२४४ प्राथमिक शाळांत ४१,९१,७६४ विद्यार्थी व १,०८,५६६ शिक्षक होते. २,९७२ उच्च माध्यमिक शाळांत ९,७०,१६१ विद्यार्थी व ३२,६०० शिक्षक होते. यांशिवाय १२०० विशेष शाळांत व ४९ अभियांत्रिकी संस्थांत १४,२२२ विद्यार्थी व १,५१८ शिक्षक होते. राज्यात भागलपूर, मुझफरपूर, बोधगया, पाटणा, रांची, पुसा आणि दरभंगा येथे अशी आठ विद्यापीठे होती.
कला व क्रीडा : पूर्वी बिहारचे कलावंत हिंदुस्थानी संगीतात प्रवीण असल्याचे उल्लेख आढळतात. १८१३ मध्ये पाटण्याचे विख्यात संगीताचार्य मुहम्मद रझा यांनी हिंदुस्थानी रागरागिणी संकलित केल्या. किराणा घराण्याच्या वहीदखाँचे शिष्य प्राणनाथ हे विख्यात गायक होत. नृत्यकलेसंबंधी मैथिली कवी विद्यापतीच्या नाचारी गीताचा निर्देश अबुल फज्लच्या आइन-इ-अकबरीत आहे. नृत्याचार्य हरिजी उप्पल यांचे भारतीय नृत्यकलामंदिर यथाशक्ति कार्य करीत आहे. बिहारमधील आदिवासींची समूहनृत्ये वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक असतात. हस्तकलांमध्ये पाटण्याचे जरी भरतकाम, बिहारशरीफ व रांचीचे हातमागावरील गृहसजावाटीचे कापड, भागलपूरचे टसर रेशीम कापड, रांची जिल्ह्यातील लाखेने मढविलेल्या शोभेच्या लाकडी वस्तू, बांबूच्या आणि सिक्की गवताच्या चटया, टोपल्या, हेट इ. विविध प्रकार बिहारच्या पारंपारिक कारागिरीतील कल्पकता व सौंदर्य दर्शवितात.
महत्त्वाची स्थळे : प्राचीन काळापासूनची पुण्यभूमी, बुद्धमहाविरांची धर्मभूमी, मौर्य-गुप्तादी साम्राज्यांची कर्मभूमी आणि शेरशाहच्या साहसांपासून स्वातंत्र्य आंदोलनातील बलिदानांपर्यंतच्या पांचशे वर्षांत वेळोवेळी गाजलेली इतिहासाची रंगभूमी बिहार, ही आज प्रामुख्याने नैसर्गिक संपत्तीचा विकास करणाऱ्या मानवी कष्टांची कर्मभूमी ठरत आहे. ⇨पाटणा ही राजधानी भारतातील एक प्राचीन शहर आहे. ख्रि. पू. सहाव्या शतकात अजातशत्रूने एक लहान गढी बांधून पाटण्याची स्थापना केली. त्याच्या नातवाने तेथेच मोठा किल्ला बांधून त्याचे नाव कुसुमपुर वा पाटलिपुत्र ठेवले. पुष्पपुर या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या गावाचे शेरशाहने सोळाव्या शतकात पुनरुज्जीवन केले. तेथील गंगेचे विशाल पात्र, प्राचीन अवशेषांचे संग्रहालय, शेरशाहची शाही मशीद, शाहजादा पर्विझची पत्थर मंझिल, हैबतजंगची कबर, हरमंदिर, गुरुद्वारा, खुदाबक्ष प्राच्यविद्या ग्रंथालय, ३४ मी. उंचीचे मोगलकालीन धान्यकोठार ‘गोलघर’, १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातील हुतात्म्यांचे भव्य स्मारक ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. राज्यात अन्यत्र आशिया खंडातील सर्वांत मोठा गुरांचा बाजार कार्तिक पौर्णिमेला जेथे भरतो, ते गंगाकाठचे सोनपूर, हिंदूंची पित्रृगया आणि जवळच बौद्धांची बोधगया, तसेच बुद्धजीवनाशी संबंधीत राजगीर व वैशाली ही ठिकाणे, प्राचीन विद्द्यापीठाची वास्तू नालंदा, महावीराचे निर्वाणस्थान पावापुरी, हजारीबाग जिल्ह्यातील १,३६६ मी. उंचीवरील पार्श्वनाथ मंदिर, पुरातन राजधानी बिहार अथवा नंतरच्या बिहारशरीफचे ऐतिहासिक अवशेष, तेराव्या शतकातील मलिक इब्राहिम बाथा, मखदुम शाह शरीफुद्दीन, सूफी संत हझरत मखदुम याह्या मणेरी इत्यादींचे दर्गे, ससराम येथील शेरशाहच्या कबरीची अप्रतिम भव्य इमारत ही ऐतिहासिक आकर्षणे आहेत. त्यांच्याखेरीज ऐतिहासिक व औद्योगिक शहर मोंघीर, नव्या कारखान्यांनी गजबजलेल्या परिसराची बिहारची उन्हाळी राजधानी रांची, रेशीम उद्योगाचे केंद्र भागलपूर, जमशेटपूर व धनबादच्या दरम्यान दामोदर प्रकल्पाच्या परिसरात उभे राहिलेले विविध प्रचंड उद्योगसमूह ही बिहारची आधुनिक प्रेक्षणीय स्थळे होत.
ओक, शा. नि. पंडित, अविनाश.
संदर्भ : 1. Chaudhary, V. C. P. The Creation of Modern Bihar, Patna, 1964.
2. Datta, Kalikinkar, History of Freedom Struggle in Bihar, 2 vols., Patna 1957.
3. Diwakar, R. R. Ed., Bihar Through the Ages, Bombay, 1959.
4. Houlton, Sir John Wardie, Bihar, The Heart of India, London, 1949.
“