बिर्ला घराणे : भारताच्या सर्वांगीण औद्योगिक विकासात महत्त्वाचा वाटा उचलणारे जगप्रसिद्ध घराणे. जवळजवळ रु. १,२०० कोटींची मत्ता आणि रु. १,४०० कोटींची वार्षिक उलाढाल असलेला ‘बिर्ला उद्योगसमूह’ आज भारतात प्रथम क्रमांकाचा गणला जातो. श्री. घनःश्यामदास, त्यांचे तीन बंधू, तीन मुलगे, पुतणे व नातू
घनःश्यामदास बिर्ला (१० एप्रिल १८९४ – ) हे बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक. बिर्ला घराण्याचा इतिहास म्हणजे प्रामुख्याने घनःश्यामदासजींच्या कर्तृत्वाचा इतिहास. राजस्थान राज्यातील पिलानी या छोट्या खेड्यात जन्मलेल्या घनःश्यामदासजींनी अल्पवयात व्यापारउदिमात लक्ष घातले व अल्पावधीतच एक कर्तबगार प्रवर्तक म्हणून जगभर ख्याती मिळवली. त्यांचे आजोबा शिवनारायण यांची मुंबईत पेढी होती. वडील बलदेवदास यांनी कुटुंबाचा व्यवसाय नेकीने चालविला. घनःश्यामदासजींनी वयाच्या अकरा वर्षांपर्यंत पिलानी येथे राहून इंग्रजी, राजस्थानी, संस्कृत या भाषांचे ज्ञान संपादन केले आणि आजोबांच्या प्रेरणेने अवघ्या बाराव्या वर्षी ते मुंबईला जाऊन व्यापारात रस घेऊ लागले. मुंबईत मन रमेना म्हणून ते सोळाव्या वर्षी कलकत्त्याला गेले आणि शेअरबाजारामध्ये दलाल म्हणून काम करू लागले. परिणामी त्यांचा अनेक भागधारकांशी, विशेषतः छोट्यामोठ्या इंग्रज उद्योगपतींशी, जवळचा संबंध आला. इंग्रजांच्या व्यापारी कौशल्यामुळे व व्यवस्थापन क्षेत्रातील प्राविण्यामुळे घनःश्यामदास प्रभावित झाले. उद्योगधंदा उभारण्याचा अनुभव मिळावा म्हणून त्यांनी दिल्ली येथे एक कापूस गिरणी खरेदी केली. १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस त्यांनी आपले बंधू जुगलकिशोर (१८८१ – २४ जून १९६७), रामेश्वरदास आणि ब्रिजमोहन बिर्ला (१९ नोव्हे. १९०५–१० जाने. १९८२) यांच्या सहकार्याने ‘बिर्ला ब्रदर्स’ ही मर्यादित उत्पादनसंस्था स्थापन केली आणि ताग व कापूस उद्योगांसाठी भागधारकांकडून भांडवल उभारले. ताग गिरणी उभारण्याचे एतद्देशीय तरूणांचे धाडस आपल्या मक्तेदारीच्या आड येईल, या भीतीने ब्रिटिश उद्योगपतींनी सरकारच्या मदतीने बिर्ला ब्रदर्सचे प्रकल्प मुळापासून उखडून काढण्याची कारस्थाने रचली, परंतु न डगमगता घनःश्यामदासजींनी औद्योगिक क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले. पहिल्या महायुद्धाला तोंड लागले तेव्हाच भारताला औद्योगिकीकरणाशिवाय तरणोपाय नाही, याची घनःश्यामदासजींनी मनाशी खूणगाठ बांधली. त्यानंतर उद्योगाच्या अनेक क्षेत्रांत पदार्पण करून बिर्लांनी भारताच्या औद्योगिक प्रगतीचा पाया मजबूत केला व नवा इतिहास घडविला. १९२३ मध्ये बिर्ला ब्रदर्सनी ग्वाल्हेर येथे ‘जियाजीराव कॉटन मिल’ ही कापडगिरणी स्थापन केली. त्यानंतर कापूस, कागद, साखर आणि प्रकाशन या व्यवसायांत बिर्लांनी पदार्पण केले. दुसऱ्या महायुद्धाच्या व नंतरच्या काळात बिर्ला उद्योगसमूहाचा व्याप झपाट्याने वाढला. कापड, यंत्रसामग्री, सायकली, बॉल बेअरिंग, पंखे, रेयॉन, प्लॅस्टिके, अलोह धातू, प्लायवुड, वनस्पती तेल या विविध वस्तूंची निर्मिती करण्यास बिर्लांनी प्रारंभ केला. चहा, कोळसा हे उद्योगही त्यांनी हाती घेतले. बिर्लांनी हिंदुस्थान टाइम्स (दैनिक) आणि ईस्टर्न इकॉनॉमिस्ट (साप्ताहिक ) ही इंग्रजी नियतकालिके अनुक्रमे १९२३ व १९४३ या वर्षी प्रकाशित करण्यास प्रारंभ केला. १९४३ मध्ये ‘युनायटेड कमर्शियल बॅँक’ स्थापन करून अल्पावधीत बिर्लांनी ती नावारूपाला आणली. १९४६ मध्ये बिर्लांनी ‘हिंदुस्थान मोटर्स’ ही कंपनी स्थापन करून मोटारगाडी उत्पादनास सुरुवात केली.
स्वातंत्र्योत्तर काळात बिर्ला उद्योगसमूहाची प्रचंड भरभराट झाली. मुंबई येथील ‘द सेंचुरी स्पिनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.’ (सेंचुरी मिल) ‘द सिरपूर कागद कारखाना’, ‘हैदराबाद ॲस्बेस्टस अँड सिमेंट प्रॉडक्टस लि.’ आणि ‘हैदराबाद ऑलविन’ पूर्व भारतातील ‘रामेश्वर ताग’, ‘एअरकन्डिशनिंग कॉर्पोरेशन’ आणि जामनगर येथील ‘श्री दिग्विजय वुलन मिल्स’ हे १९५० च्या दशकात बिर्लानीं हाती घेतलेले प्रमुख उद्योग. त्यानंतरच्या दशकांत बिर्लांनी उद्योगधंद्यांची व्याप्ती आणखी वाढविली. रेयॉन, सिमेंट, रासायनिक द्रव्ये, पोलाद नळ्या, ॲल्युमिनियम, जलवाहतूक ही नवीन क्षेत्रे बिर्ला उद्योगसमूहाने आपल्या नियंत्रणाखाली आणली. सांप्रत बिर्ला समूह चहा, साखर, वनस्पती, कागद, सुती कापड या नित्य गरजेच्या वस्तूंपासून कृत्रिम धाग्याची वस्त्रे, विजेची उपकरणे, मोटारगाड्या, रेडिओ, पोलादी फर्निचर, प्लॅस्टिक वस्तू यांसारख्या चैनीच्या साधनांपर्यंत विविध प्रकारच्या उपभोग्य वस्तूंचे प्रचंड प्रमाणात उत्पादन करीत असल्याचे दिसते. केवळ भांडवल वाढवीत न बसता, ज्या क्षेत्रात उद्योगांची निकड आहे त्या क्षेत्रात आवर्जून गुंतवणूक करण्याचे, देशातील अविकसित साधनसंपत्ती अधिकाधिक प्रमाणात उपयोगात आणण्याचे, व्यवस्थापन व तांत्रिक ज्ञानाच्या विकासास हातभार लावण्याचे पुरोगामी धोरण बिर्ला घराण्याने प्रथमपासून अवलंबिल्याचे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘बिर्ला हाउस’ हे राजकीय चळवळीचे एक प्रमुख केंद्र होते. बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनःश्यामदास यांचे त्यावेळच्या सर्व राजकीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. वयाच्या बत्तिसाव्या वर्षी ब्रिटिश सरकारने देऊ केलेली ‘सर’ ही मानाची पदवी त्यांनी नाकारली. १९१९ मध्ये महात्मा गांधी आफ्रिकेहून भारतात कायमचे परत आल्यावर घनःश्यामदासजींचा त्यांच्याशी परिचय झाला व महात्माजींच्या निकटवर्तियांपैकी एक होण्याचा मान त्यांना मिळाला. लंडन येथे १९३१ मध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी घनःश्यामदासजींनी महात्माजींचे मन वळविले व स्वतः ते भारताचे एक प्रतिनिधी म्हणून या परिषदेस उपस्थित राहिले. निर्मळ चारित्र्याच्या घनःश्यामदासजींची महात्माजींच्या तत्त्वांवर दृढ श्रद्धा होती. स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले ‘शांतिनिकेतन’ला आर्थिक डबघाईच्या काळात मदत केली व विविध सामाजिक कार्यांसाठी प्रचंड प्रमाणात पैसे वाटले. महात्माजी त्यांना आपले ‘आर्थिक सल्लागार’ मानत असत. १९४८ मध्ये महात्माजींचे दिल्लीच्या बिर्ला हाउसमध्ये निधन होईपर्यंत त्यांचे संबंध टिकून होते.
बिर्ला घराण्याने देशाच्या विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी बजावली आहे. १९२५ मध्ये कलकत्ता येथे ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ व १९२७ मध्ये नवी दिल्ली येथे ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ स्थापन करण्यात बिर्लांनी पुढाकार घेतला. घनःश्यामदासजीं ‘हरिजन सेवक संघा’चे अनेक वर्षे अध्यक्ष होते. भारताच्या आर्थिक प्रगतीचा आराखडा काढणारा ‘बाँबे प्लॅन’ (१९४४) तयार करण्यात घनःश्यामदासजींचा प्रमुख भाग होता. देशभर अनेक ठिकाणी उभारलेली सुंदर मंदिरे आणि ‘बाँबे हॉस्पिटल’ सारखी अनेक रुग्णालये ह्या बिर्लांनी देशबांधवांना दिलेल्या आणखी काही देणग्या. मात्र बिर्ला घराण्याचे लक्षणीय कार्य प्रकर्षाने शिक्षणक्षेत्रात दिसते. बिर्लांनी १९१९ मध्ये पिलानी ह्या आपल्या गावी ‘बिर्ला शिक्षण प्रतिष्ठान’ स्थापन केले. आज ते देशातील सर्वांत मोठे खाजगी प्रतिष्ठान म्हणता येईल. या प्रतिष्ठानाची जवळजवळ रु. १२ कोटींची जिंदगी असून वर्षाचे अंदाजपत्रक पावणेदोन कोटींचे असते. अनेक शाळा, महाविद्यालये, कृषी व अभियांत्रिकी संस्था इ. हे प्रतिष्ठान चालविते. पिलानी येथील ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स’ ही त्यांपैकी एक प्रमुख संस्था होय. ‘रामेश्वरदासजी बिर्ला स्मारक कोषा’तर्फे पाच लक्ष रुपयांचा पहिला त्रैवार्षिक पुरस्कार प्रा. विल्यम ट्रेजर या ७१ वर्षांच्या अमेरिकन डॉक्टरांना, उष्ण कटिबंधीय रोगांच्या चिकित्सेमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल देण्यात आला (१९८२).
आज बिर्ला घराण्याची तिसरी पिढी उद्योगसमूहाचा प्रचंड व्याप सांभाळत आहे. पस्तिशीतील आदित्य बिर्ला घराण्याचा वारसा नेकीने चालवित आहेत. कर्तबगारीची नवनवी क्षेत्रे आदित्य व त्यांचे चुलतबंधू अशोक, सुदर्शन कुमार व चंद्रकांत हे पादाक्रांत करीत आहेत. या तिसऱ्या पिढीने उद्योगसमूहाचा विस्तार देशाबाहेर केला आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, इथिओपिया, कॅनडा, युगांडा, केन्या, मलेशिया, आणि आग्नेय आशियातील अन्य देश, नेपाळ, पाकिस्तान या देशांत गेल्या काही वर्षांत बिर्लांनी विविध उद्योग स्थापन केले आहेत. भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील बिर्ला घराण्याची कामगिरी अनन्यसाधारण म्हटली पाहिजे.
“