बिब्बा : (१) फुलांसह शाखा, (२) द्विलिंगी फूल, (३) आठळीयुक्त फळ, (४) पुष्पस्थली (बिब्बोटी).बिब्बा : (भिलावा हिं. भिलावा गु. भिलामा क. केरू, गेरकायी सं.भल्लातक, अग्निमुखी इं. मार्किंग नट ट्री लॅ. सेमेकार्पस ॲनाकार्डियम कुल-ॲनाकार्डिएसी). हे नाव फळासाठी व त्याच्या झाडाकरिताही वापरात आहे. फळ परिचित आहे. महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता इ. प्राचीन भारतीय ग्रंथांत ‘भल्लातक’ या नावाने बिब्ब्याचा उल्लेख आला आहे त्यावरून हे झाड भारतीय असावे तसेच भारतात त्याचे महत्त्वही पूर्वीपासून ओळखले गेले आहे. हा मध्यम आकाराचा, सु. ९-१२ मी. (क्वचित १५ मी.) उंच व १.२५ मी. घेराचा पानझडी वृक्ष ईस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया व भारत येथे आढळतो. भारतात हिमालयाच्या बाह्य परिसरात सतलज ते सिक्कीम आणि उष्ण भागात साधारण सर्वत्र व पूर्वेस आसामपर्यंत तो आढळतो मात्र त्याची लागवड फारशी होत नाही. त्याची साल गर्द भुरी, खरबरीत असून वेड्यावाकड्या तुकड्यांनी सोलून निघते अंतर्साल धागेदार कोवळे भाग, फुलोरा, पानांचे देठ व खालची बाजू लवदार असते. पाने साधी, मोठी (१७-६० X १०-३० सेंमी.), एकाआड एक, चिवट व व्यस्त अंडाकृती (टोकाकडे रुंद व गोलसर ), आयत असून त्यांवर शिरा दोन्ही बाजूंस स्पष्ट दिसतात ती फेब्रुवारीत गळतात व मेमध्ये नवीन पालवी येते. फुले हिरवट पांढरी व पिवळसर, लहान, एकलिंगी अथवा द्विलिंगी फुलोऱ्यावर [परिमंजरीवर ⟶ पुष्पबंध] पावसाळ्याच्या शेवटी येतात स्त्री-पुष्पांच्या मंजऱ्या पुं-पुष्पाच्या मंजऱ्यांपेक्षा आखूड असतात. पुष्पस्थली (देठाच्या वरचा भाग) फुगीर, मांसल, शेंदरट पिवळी (सु. २ सेंमी. लांब) असून तीवर आठळीयुक्त फळ नोव्हेंबर-फेब्रुवारीत येते ते पिकल्यावर काळे, गुळगुळीत, साधारण तिरकस व अंडाकृती, २.५ सेंमी. लांब व कठीण असते. फुलाची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ॲनाकार्डिएसीमध्ये (आम्र कुलात) वर्णिल्याप्रमाणे असून काही लक्षणांत आंब्याशी [⟶ आंबा] व ⇨काजूशी याचे साम्य आढळते कारण हे तिन्ही वृक्ष एकाच कुलातील आहेत. बिब्ब्याच्या फुलात केसरदले ५-६, किंजले ३ व किंजपुट ऊर्ध्वस्थ असतो. [⟶ फूल]. फळात बी एक, लोंबते व चिकट सालीचे असते. बियांची जननक्षमता फार थोडी असल्याने बी लवकर पेरावे लागते. रोपांना हिमतुषार व मूळकूज यांमुळे हानी पोहोचणे शक्य असल्याने जपावे लागते. पूर्ण वाढ झालेले जुने खोड तोडून राखलेल्या खुंटापासून नवीन वाढ चांगली होते.

खोडाला खाच पाडून जहाल व साधारण चिकट रस (डिंक) मिळतो. त्यापासून रोगण करतात. कठिण फळाच्या सालीत कडू, जहाल, काळसर व विषारी तेल (३३%) असते त्यामुळे कातडीवर फोड येतात ते संधिवात, मुरगळणे, लचकणे व कुष्ठीन गाठीवर बाहेरून काळजीपूर्वक लावतात. फळाचे चूर्ण कृमिनाशक व गर्भपातक असून डिंक गंडमाळा, संसर्गजन्य रोग व तंत्रिका दौर्बल्य [⟶ तंत्रिका तंत्र] यांवर वापरतात. बिया खाद्य असून बियांचे तेल गोड, खाद्य, पथ्यकर व औषधी असते. फार पूर्वीपासून फळाच्या सालीतील तेल कपड्यावर खुणा करण्यास धोबी लोक वापरीत आले आहेत (त्यावरून इंग्रजी व लॅटिन नावे पडली आहेत). पक्व पुष्पस्थली (बिब्बोटी) खाद्य असून सुकविलेल्या बिब्बोट्यांच्या माळा बाजारात मिळतात त्या स्तंभक (आकुंचन करणाऱ्या) असतात. पक्व फळांतील तेलाचा रंग, रोगणे व प्लॅस्टिक आणि तत्संबंधीच्या उद्योगांत बराच उपयोग केला जातो. ह्या तेलाला व्यापारात ‘भिलावन शेल लिक्विड’ (बीएसएल) म्हणतात. त्यापासून फिनॉले मिळतात. ती विशेष रासायनिक प्रक्रियेने फळातून काढतात. बीएसएलपासून उद्स्फोटक नसलेले (फोड न आणणारे) घन किंवा अर्धघन प्रकारचे रेझीन मिळविण्याच्या प्रक्रिया उपलब्ध झालेल्या आहेत हे रेझीन व्हार्निश, लॅकरे, एनॅमले, रंगलेप, जलाभेद्य पदार्थ इ. बनविण्यास आधारभूत ठरले आहे. भिलावन रेझीनवर आधारित अशी अनेक पृष्ठलेपने उपलब्ध झाली आहेत. धातूवर घडवून आणलेले लेपन फारच गुळगुळीत, कठीण, चिवट, असून त्यावर हवेचा, उकळत्या पाण्याचा आणि सामान्य कार्बनी विद्रावकांचा (विरघळविणाऱ्या पदार्थांचा) परिणाम होत नाही. बीएसएलच्या साहाय्याने कापड जलाभेद्य करता येते किंवा कापडास, कागदास व जाड पुठ्ठ्यास कृत्रिम चामड्याचे रूप देता येते. आसंजके, अग्निरोधक आणि कीटकनाशक लेप, कीटकनाशके, पूतिरोधके (पू तयार करणाऱ्या सूक्ष्मजंतूंची वाढ खुंटविणारे पदार्थ) यांसारख्या पदार्थांचे उत्पादनही बीएसएलच्या आधारे केले जाते. निर्मलके (मळ काढून टाकणारे पदार्थ), तणनाशके, अग्निरोधक प्लॅस्टिके, उष्णतारोधक रंगलेप, नरम व कठीण रबर-माल इत्यादींच्या उत्पादनातही बिब्ब्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या उपयोग केला जातो.

बियांतील मगजात प्रतिशत जलांश ३.८, प्रथिन २६.४, मेद ३६.४, तंतू १.४, इतर कार्बोहायड्रेटे २८.४, खनिजे ३.६ आणि दर १०० ग्रॅममध्ये कॅल्शियम २९५ मिग्रॅ., फॉस्फरस ८३६ मिग्रॅ., लोह ६.१ मिग्रॅ. असतात तसेच त्यात थायामीन, रिबोफ्लाविन, निकोटिनिक अम्ल ही जीवनसत्त्वे असतात. ह्या तेलाचा उपयोग लाकडाच्या रक्षणाकरिता व गाड्यांच्या आसाला लावण्याच्या वंगणाकरिता करतात नावांच्या फळ्यानाही तेल लावतात.

बिब्ब्याच्या वृक्षाचे लाकूड भुरकट पांढरे असून त्यात कधी पिवळट रेषा दिसतात ते नरम व काहीसे जड परंतु फारसे टिकाऊ नसते. स्वस्त व हलके सजावटी सामान, खोकी, आगपेट्या, वल्ही व जळण अशा विविध प्रकारे ते उपयोगात आहे. लाखेच्या किड्यांना पोसण्याकरिता हे वृक्ष उपयुक्त असतात. फळांतील तेलात चुना मिसळून पक्की शाई बनवितात कित्येक खुणांकरिता (उदा., धुलाईच्या कपड्यावरील खुणा) वापरात असलेल्या शाईत हे तेल मिसळलेले असते. कापड रंगविण्यासही तेल वापरतात. फळ तिक्त, उष्ण, कृमिनाशक असून जलोदर, गाठी, चामखिळी, दमा, तीव्र संधिवात, अपस्मार, कंडू इ. विकारांत गुणकारी असते. लोणी, दूध, वेदनाहारक तेले यांसह फळांचा रस पोटात घेणे श्रेयस्कर असते. कर्करोगात फळांचा रस फायदेशीर ठरला आहे. कमरदुखीत बिब्बा दुधात उकळून घेणे गुणकारी असते. अंकुशकृमीवर बिब्बा उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

संदर्भ : 1. Chopra, R. N. Nayar, S. L. Chopra, I. C. Glossary of Indian Medicinal Plants, New Delhi, 1956.

           2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

 जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.