बिग्नोनिया : फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील ⇨बिग्नोनिएसी कुलातील हा एक महत्त्वाचा वंश असून यामध्ये अंतर्भूत केलेल्या जातीच्या संख्येबद्दल मतभेद आहेत. चौदाव्या लुई राजाच्या जे. पी. बिग्नोन (१६६२-१७४३) नावाच्या ग्रंथपालांच्या सन्मानार्थ या वंशाचे व कुलाचे नाव दिले गेले आहे. या वंशातील बहुतेक जाती अमेरिकेच्या उष्ण भागातील वेली असून इतरत्र अनुकूल परिस्थितीत बागेतून शोभेकरिता लागवडीत आहेत. भारतातील उद्यानांत पुढील सहा जाती आढळतात : बिग्नोनिया व्हेनुस्टा, बि. अँगुई-कॅटी, बि. मॅग्निफिका, बि. मेगॅपोटॅमिका, बि. स्पेसिओसा व बि. इन्कार्नॅटा. या वंशाची सामान्य लक्षणे बिग्नोनिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत यातील सर्व जाती प्रतानांच्या (तणाव्यांच्या) साहाय्याने आधारावर चढणाऱ्या वेली असून त्याची पाने संयुक्त व समोरासमोर असतात सुंदर फुलांमुळे या जाती आकर्षक बनल्या आहेत. फुलामध्ये कार्यक्षम केसरदले चार असून बोंडे (फळे) लांब, दंडाकृती व पटभंगूर असतात बिया सपक्ष असतात [⟶ फळ].
बि. व्हेनुस्टा : (इं.गोल्डन शॉवर). ही जाती मुळची ब्राझीलमधील असून तिची पाने त्रिदली, टोकाचे दल प्रतानरूप (तणाव्यासारखे) लालसर नारिंगी फुले डिसेंबर–फेब्रुवारीत येतात पुष्पमुकुट खाली नलिकाकृती पण वर पसरट जबड्यासारखा पुष्पगुच्छ लोंबते नवीन लागवड दाब कलमांनी करतात.
बि. अँगुई-कॅटी : (इं. कॅट्स क्लॉ बिग्नोनिया). त्रिदली पाने टोकाच्या दलापासून मांजराच्या तीन नखांसारखी उपांगे बनतात. फुले पिवळी व जोडीने मार्च-एप्रिलमध्ये येतात. दाब किंवा साध्या कलमांनी नवीन लागवड होते.
बि. मॅग्निफिका : मूळचे ब्रिटिश कोलंबियातील पाने त्रिदली, टोकाचे दल १५ सेंमी. लांब व प्रतानरूप फुले मोठी, सुबक, जांभळी किंवा तांबूस, आत पांढरी व त्यावर तांबूस रेषा असून ती चारचारच्या वल्लरीत डिसेंबर- फेब्रुवारीमध्ये येतात. नवीन लागवड वरच्या प्रमाणे करतात.
बि. मेगॅपोटॅमिका : (इं. रिओग्रँड ट्रंपेट फ्लॉवर). हा लहान, ७-१० मी. उंच वृक्ष ब्राझीलमधील आहे. पाने ३-५ दली, संयुक्त हस्ताकृती, संमुख व फुले तांबूस जांभळी व तळाशी पिवळसर असून जानेवारी-मार्चमध्ये येतात. बोंडे रेषाकृती, बिया सपक्ष व लागवडीस उपयुक्त असतात.
बि. स्पेसिओसा : या मोठ्या वेलीची पाने त्रिदली व टोकाचे दल प्रतानरूप असते. फुले मोठी, आकर्षक, जोडीने आलेली, फिकट जांभळी किंवा निळसर तांबडी असून मार्च-एप्रिलमध्ये येतात.
बि. इन्कार्नॅटा : ही झुडुपवजा वेल मूळची ब्रिटीश गियानातील असून त्रिदली पाने गुळगुळीत व टोकाचे दल प्रतानरूप असते. फुले मोठी, फिकट निळी, त्यांवर गर्द जांभळट रेषा आणि आत तळाशी पांढरी असतात फुले उन्हाळ्यात येतात. नवीन लागवड दाब कलमांनी करतात.या वंशातील कित्येक जातींचा अंतर्भाव हल्ली भिन्नभिन्न वंशांत केला गेला असून फक्त एकच जाती (बि. कॅप्रिओलॅटा) यात समाविष्ट आहे.