बिकानेर : राजस्थानातील भूतपूर्व बिकानेर संस्थानाची राजधानी व सध्या याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. महानगरीय लोकसंख्या २,८०,३६६ (१९८१). हे दिल्लीच्या नैर्ऋत्येस ३९४ किमी. थरच्या वाळवंटी प्रदेशात वसले आहे.
पौराणिक कथेनुसार येथून सरस्वती नदी वाहत होती. तर तज्ञांच्या मते वाळूखाली गाडल्या गेलेल्या एका संस्कृतीचे हे केंद्र असण्याची शक्यता आहे. मारवाडचा राव जोधाचा पुत्र राव बीका याने या शहराची स्थापना १४८८ मध्ये केली. नेर म्हणजे वसाहत. बीका याने येथे वस्ती केली म्हणून यास बिकानेर नाव मिळाले. राव बीकाने एका टेकडीवर छोटासा किल्ला बांधला होता. चुने शहर तटबंदीयुक्त असून त्यास पाच प्रवेशद्वारे आहेत. या भागात अनेक मंदिरे, मशिदी दृष्टीस पडतात. अकबराचा सरदार राजा रायसिंगाने बांधलेल्या किल्ल्याजवळच सूरसागर तलाव आहे. किल्ल्यातील राजप्रासाद आणि शोभिवंत वास्तू लाल दगडांत बांधलेल्या असून त्यांवरील नक्षीकाम, काचेवरील कलाकाम व सोन्याच्या मुलाम्याचे काम आजही पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. किल्ल्यातील करण महाल (दरबार हॉल), शीश महाल, फूल महाल, चंद्र महाल इ. प्रेक्षणीय आहेत.
बिकानेर व्यापाराचे प्रमुख केंद्र असून लोकर, कातडी, बांधकामाचे दगड, विविध हस्तकौशल्याच्या वस्तू, मीठ, अन्नधान्य इत्यादींची येथे मोठी उलाढाल होते. बिकानेरी लोकरीच्या शाली, विविध रंगी रग व गालिचे तसेच खडीसाखर प्रसिद्ध आहे. शहरात विद्युत् यंत्रे आणि यंत्रसामग्री, काचसामान, मृत्पात्री, पादत्राणे, सिगारेटी, हस्तिदंतावरील कोरीवकाम इ. विविध व्यवसाय चालतात. जवळपास मिळणाऱ्या लिग्नाइट व जिप्सम या खनिजांमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे.
शहरात शिक्षणाची उत्तम सोय असून सरदार पटेल आयुर्विज्ञान महाविद्यालय, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय यांसारख्या शिक्षणसंस्था असून त्या राजस्थान विद्यापीठाशी संलग्न आहेत. बिकानेरच्या संस्कृत व फार्सी हस्तलिखिते जतन केलेली आहेत. जगातील हा एक उत्कृष्ट संग्रह मानला जातो.
बिकानेरमधील प्रेक्षणीय स्थळांपैकी लालगढ राजप्रासाद (सध्या हॉटेलमध्ये रूपांतर), गंगा गोल्डन जूबिली संग्रहालय, लक्ष्मीनाथ मंदिर ही प्रसिद्ध आहेत. बिकानेरच्या आसपास आठ किमी.वरील देवीकुंड (राजप्रमुखांची स्मारके) तसेच ३२ किमी.वरील गजनेर अभयारण्य इ. उल्लेखनीय आहेत.
“