बॉमंशिया ग्रँडिफ्लोरा : (इं. ईस्टर हेरल्ड्स ट्रंपेट, नेपाळ ट्रंपेट फ्लॉवर कुल-ॲपोसायनेसी). ही मोठी शोभिवंत सदापर्णी वेल [⟶ महालता] मूळची नेपाळातील व पूर्व हिमालयातील असून तिची मोठ्या पांढऱ्या सुवासिक फुलांसाठी आणि शोभेसाठी बागेत बियांपासून किंवा कलमांनी लागवड करतात. हिचे खोड बळकट, काष्ठमय, पाने लांबट गोल, मोठी (१२ ते २२ सेंमी. लांब), हिरवी, साधी व समोरासमोर फुले तुतारीसारखी मोठी, सु. १२ सेंमी. लांब. त्यावरून ग्रँडिफ्लोरा हे जातिवाचक लॅटिन नाव आले आहे. फुले ⇨ लिलीसारखी पांढरी व तळाशी हिरवट असून हिवाळ्याच्या शेवटापासून उन्हाळ्याच्या प्रारंभापर्यंत झुबक्यांनी येतात. वेल जलद वाढते व फुलेही भरपूर येतात. ही वेल लाल सावरीवर चढून फुलते त्या वेळी त्या दोन्ही फुलांच्या मिश्रणाची शोभा आल्हददायक असते. फुलांची छदे मोठी आणि पानांसारखी असतात [⟶ फूल]. हिची सामान्य संरचना ⇨ ॲपोसायनेसीमध्ये (करवीर कुलात) वर्णिल्याप्रमाणे असते. पेटिकाफळ मांसल, बीजे अनेक, चपटी त्यांवरील रेशमी केसांच्या पुंजक्यांचा स्थानिक लोक कच्च्या रेशमासारखा उपयोग करतात. कोवळ्या फांद्यांपासून उपयुक्त धागा काढतात. बॉ. जेंर्डोनियाना या लहान पांढऱ्या व सुगंधी फुलांच्या शोभिवंत वेली भारतातील बागांतून लावलेल्या आढळतात. हवाई बेटांत ती जोमाने वाढते आणि तिच्या फुलांचे तुरे विवाहसमयी उपयोगात आणतात.

जमदाडे, ज. वि.