बॉनँ, शार्ल अद : (१८६५-१९२९). फ्रेंच प्रवासी. १८९३ मध्ये त्याने लाओसचा व नंतर मलायाचा प्रवास केला. या प्रवासात (१८९३-१९००) तो चिनी साम्राज्याच्या पश्चिम भागात फिरला. याच काळात त्याने टाँकिनहून तिबेट व मंगोलियामार्गे सायबीरियाचा अभ्यासपूर्ण प्रवास केला. त्याच्या प्रवासामुळे पीत व यांगत्सी नद्यांचे मार्ग निश्चित करता येणे शक्य झाले. लोलो टोळ्यांना भेट देणारा (१८९८) बॉनँ हा पहिला यूरोपीय. प्रवासाहून परतल्यावर तो फ्रेंच शासनाच्या राजनैतिक सेवेत रुजू झाला. पुराभिलेख खात्याच्या संचालकपदी असतानाच त्याचे निधन झाले.