बाळाजी बाजीराव: (१२ डिसेंबर १७२१ – २३ जून १७६१). भट घराण्यातील तिसरा पेशवा (कार. १७४० – ६१). नानासाहेब व बाळाजी बाजीराव या दोन्ही नावांनी तो प्रसिद्ध आहे. ⇨ पहिला बाजीराव व काशीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. त्याचा जन्म मौजे साते (नाणे मावळ – पुणे जिल्हा) येथे झाला. बाळाजीने चिमाजी आप्पा आणि अंबाजी पुरंदरे यांच्या हाताखाली लहानपणी साताऱ्यात सर्व प्रकारचे शिक्षण घेतले. शाहू महाराजांसोबत तो मिरजेत स्वारीत १७३९ मध्ये होता. पहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर ⇨ छत्रपती शाहूनी त्यास २५ जून १७४० रोजी पेशवाईची वस्त्रे दिली. मराठी राज्याचा कारभार पहावयाचा व राज्याबाहेरील हिंदूस्थानभर मराठी सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे हे पेशव्याचे उद्दिष्ट होते.
या सुमारास मोगल सत्ता अगदी खिळखिळी झाली होती पण छत्रपतींना तिच्याबद्दल आदर वाटे. म्हणून पादशाही राखून मराठेशाहीचे वर्चस्व वाढावे असे त्यांना वाटे. बादशहा ऐषआरामात दंग, त्याच्या खर्चाची तरतूद करावयाची दख्खन, बंगाल, अलाहाबाद, आयोध्या, राजपुताना, माळवा, बुंदेलखंड येथील नबाब आणि राजे-रजवाडे आपल्या सरंजामी फौजांच्या जोरावर जवळजवळ स्वतंत्र बनले होते बादशाहीची वजिरी वा बक्षीगिरी करावयाची म्हणजे या फौजा बाळगणारे नबाब-राजेरजवाडे यांना काबूत आणावयाचे. वायव्य सरहद्दीकडून अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली याने हिंदुस्थानवर १७४८ पासून स्वाऱ्या सुरू केल्या होत्या. त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. इंग्रज, फ्रेंच यांचे किनाऱ्यावर आगमन होऊन शंभरावर वर्षे झाली असून या पाश्चात्त्य व्यापाऱ्यांनी आपल्या वखारींचे किल्ले बनवून आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी छोटी-मोठी सैन्ये उभारली होती. या सर्वांचा बंदोबस्त करावयाचा म्हणजे एका जबरदस्त केंद्रीय सत्तेची आवश्यकता होती. नवे युद्धतंत्र आत्मसात केलेल्या व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशा चार-पाच फौजांची जरूरी होती. बलाढ्य केंद्रीय सत्तेला इतका बंदोबस्त करणे शक्य होते. छत्रपतींच्या धोरणाने शिवकालीन केंद्रीय सत्ता जाऊन तिच्या ऐवजी अनेक घटकांचे सुंयुक्त राज्य बनत चालले होते. या घटक राज्याने एकीने काम करावे, या प्रेरणेच्या अभावी मराठी राजकारणाला पक्के स्थैर्य आले नाही. सतत मोहिमा चालवून सुद्धा मराठ्यांना निर्णयात्मक विजय प्राप्त झाले पण त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही.
बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीचे दोन भाग पडतात : (१) जून १७४० – डिसेंबर १७४९ व (२) १७५० – १७६१. सुरुवातीच्या काळात शाहू छत्रपतींच्या अखेरीपर्यंत पेशव्याने जातीने उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेचा विस्तार करण्याकडे लक्ष पुरविले. खानदेश, माळवा आणि त्यापलीकडील सुभे पेशव्यांच्या ताब्यात येत गेले. १७४१ च्या सप्टेंबरात माळव्याचा कारभार पाहण्याच्या नायब सुभेदारीच्या सनदा सवाई जयसिंगामार्फत पेशव्याने मिळविल्या. अशा रीतीने उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेचा पाया दृढ झाला. या एका प्रांताच्या सुभेदारीने पेशव्याचे समाधान होण्यासारखे नव्हते. पुढील वर्षी (१७४२) बुंदेलखंडात येऊन पेशव्याने आग्रा, अलाहाबाद, पाटणा आणि बंगाल प्रांतांच्या चौथाईची मागणी दिल्ली दरबाराकडे केली. दरबारने बंगाल प्रांताचे रक्षण प्रथम पेशव्याने करावे, रघूजी भोसल्याची फौज बंगालमध्ये घुसली होती, तिला बाहेर काढावे, म्हणजे आपण बंगालच्या चौथाईचा विचार करू, असे बोलणे लावले. पेशव्याने बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान याची भेट घेऊन आपल्या फौजेच्या खर्चाकरिता बावीस लाख रुपये आणि बंगालच्या चौथाईस मान्यता मिळविली व भोसल्यांच्या फौजेस बंगाल प्रांतातून माघार घ्यावयास लावली. रघूजी भोसले याने पेशव्यांच्या दंडेलीविरुद्ध छत्रपतींकडे दाद मागितली. छत्रपतींनी बंगाल प्रांत पुन्हा भोसल्यांकडे सुपूर्त केला. पेशवे आणि भोसले यांचा कलह धुमसत राहिला.
पेशव्यांच्या वाढत्या मागण्यांमुळे बुंदेल राजेरजवाड्यांत असंतोष पसरला. ओर्छाचा वीरसिंगदेव याने एका रात्री अचानक मराठी फौजेवर हल्ला चढविला आणि मराठा सरदार जोतिबा शिंदे आणि कमावीसदार मल्हार कृष्ण यांची डोकी कापून नेली. पुढील काही वर्षे (१७४२–४५) मराठी फौजा बुंदेलखंडात राजेरजवाडे यांचा बंदोबस्त करण्यात गुंतल्या होत्या. सागर, झांशी इ. ठिकाणी लष्करी ठाणी ठेवण्यात आली होती. १७४५ मध्ये खुद्द पेशवा बुंदेलखंडात आला. भिलसा, जैतपूर या ठाण्यांवर हल्ला करून ती परत घेण्यात आली.
मोगल दरबारात दोन पक्ष होते एक, परकीय उमरावांचा तुराणी आणि दुसरा, हिंदू राजेरजवाडे व हिंदी मुसलमान नबाब यांचा इराणी. हीच स्थिती पुढे जयपूर प्रकरणात झाली. जयपूरचा सवाई जयसिंग हा मोगल दरबारातील इराणी पक्षाचा प्रमुख होता. जयसिंगाशी दोस्ती हा आतापर्यंत मराठ्यांचा उत्तर हिंदुस्थानच्या राजकारणाचा मुख्य दुवा होता. १७४३ मध्ये सवाई जयसिंग मरण पावला आणि त्याच्या घरात भाऊबंदकी माजली. ज्येष्ठ मुलगा ईश्वरसिंग याला मराठे सरदारांनी सुरुवातीस मदत केली पण दुसरा मुलगा माधोसिंग याने पेशव्याकडे वकील पाठवून जादा खंडणी देण्याची तयारी दाखविली. वारसाहक्काबाबत न्याय-नियम ठरविणे अवघड होऊन पेशव्याने दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे मराठ्यांबद्दल राजपूर राजेरजवाड्यांत अप्रीती निर्माण झाली. याचाच परिणाम पानिपत प्रसंगी मराठे एकाकी पडण्यात झाला.
आसफजाह निजाम-उल्-मुल्क मे १७४८ मध्ये मृत्यू पावला. निजामाने मराठ्यांच्या दक्षिणेतील विस्ताराला पायबंद घातला होता. १७५० ते १७६१ दरम्यानच्या काळात निजामुल्मुल्कच्या मुलांत आणि नातवांत वारसाहक्कांबाबत जो कलह निर्माण झाला त्याचा फायदा बाळाजी बाजीरावाने घेण्याचा प्रयत्न केला. पारनेर. भालकी, सावनूर, श्रीरंगपट्टण, सिंदखेड, उदगीर येथे सतत दहा वर्षे मोहिमा चालवून पेशव्याने निजामाकडील वऱ्हाड, खानदेश, बागलाण प्रांत, नासिक, त्रिंबकेश्वर, कर्नाला, शिवनेरी, अहमदनगर, दौलताबाद, बऱ्हाणपूर आणि विजापूर ही प्रसिद्ध ठाणी आणि त्याखालील प्रदेश म्हणजे निजामाच्या राज्याचा अर्ध्याहून अधिक भाग जिंकून घेतला. कर्नाटकात श्रीरंगपट्टणपर्यंत मराठी फौजांनी मजल मारली आणि खंडणी बसविली.
शाहू महाराज १७४९ मध्ये मृत्यू पावले. तत्पूर्वी बाळाजी बाजीरावचा कोल्हापूर व सातारा या दोन छत्रपतींच्या गाद्या एक करण्याचा प्रयत्न शाहूंच्या नकारामुळे फसला. त्यांना मुलगा नव्हता. कोल्हापूरच्या संभाजीस साताऱ्याच्या गादीवर बसविण्यास शाहू छत्रपतींचा तीव्र विरोध होता. तेव्हा राजारामाची पत्नी ⇨ ताराबाई हिने आपला नातू रामराजा यास गादीवर बसवावे असे सुचविले. रामराजाकडे धाडस, लष्करी कौशल्य वा मुत्सद्दीपणा नव्हता. रघूजी भोसले आदी मराठे सरदारांचे सहाय्य मिळवून पेशव्यास दूर करावे आणि स्वतःकडे राज्यकारभार घ्यावा, ही ताराबाईंची महत्त्वाकांक्षा होती पण मराठे सरदार बाईंच्या साहाय्यास येईनात. फक्त दमाजी गायकवाड पंधरा हजार फौजेनिशी साताऱ्यास येऊन दाखल झाला. त्याचा साताऱ्याजवळ वेण्या नदीच्या लढाईत पेशव्याने पाडाव केला (१७५१). अर्धा गुजरात सुभा पेशव्यास देऊ आणि दहा हजार फौजेनिशी त्याच्या मोहिमेत हजर राहू, या अटीवर वर्षभराने पेशव्याने दमाजीची सुटका केली.
रामराजाने सांगोल्याच्या कराराने (ऑक्टोबर १७५०) पेशव्याकडे सर्वाधिकार सुपूर्त केले. दमाजी गायकवाडबरोबर मराठा मंडळाचा विरोध नष्ट झाला होता. फक्त नाविक दलाचे प्रमुख सरखेल तुळाजी आंग्रे पेशव्यास जुमानीत नव्हते. इंग्रजांच्या मदतीने बाजीरावाने आंग्र्यांचे आरमार नष्ट केले आणि तुळाजीस कैद करून त्याची रवानगी दुर्गम किल्ल्यावर केली. साहजिकच राज्याचा कारभार पुण्याहून होऊ लागला आणि छत्रपती नामधारी बनले.
दक्षिणेत मराठी सत्ता निर्वेध झाली पण उत्तर हिंदुस्तानातील परिस्थिती बिघडत चालली होती. उत्तरेचे क्षेत्र जास्त महत्त्वाचे पण पेशव्याने जातीने तिकडे लक्ष पुरविले नाही वा सरदारांस भक्कम धोरण आखून दिले नाही. जयाप्पा व दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर, नारो शंकर राजे बहादूर, विठ्ठल शिवदेव विंचुरकर, अंताजी माणकेश्वर गंधे यांना उत्तरेच्या बंदोबस्तास पाठविले. वजीर सफदरजंग याने मदतीस बोलावल्यावरून जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर गंगा-यमुनेमधील दुआबात शिरले पण तेथील रोहिल्यांनी आपल्या मदतीस अफगाणिस्तानचा शाह अहमद अबदाली यास पाचारण केले. १७५२ मध्ये अहमद शाहने पंजाब सुभा जिंकून घेतला. त्याला शह देण्याकरिता वजीर सफदरजंग याने मराठे सरदारांशी मदतीचा नवा तह केला (एप्रिल १७५२). मराठ्यांना फौजेच्या खर्चाकरिता ५० लाख रुपये रोख रक्कम आणि सिंध, पंजाब आग्रा आणि दुआबाचा चौथ देण्याच्या अटी करारात होत्या. त्याबद्दल पेशव्याने बादशाहीचे रक्षण करावयाचे होते. बादशाहने या करारनाम्यात मान्यता देण्याचे नाकारले. बादशाह आणि वजीर यांचे संबंध दुरावले. कटकटी निर्माण होऊन वजीर लखनौस आपल्या सुभ्याच्या जागी निघून गेला. वजिराच्या जागी पोरसौदा अननुभविक गाझीउद्दीन याची नेमणूक झाली पण अबदालीस विरोध करण्याचा वकूब नव्या वजिरात नव्हता. १७५७ मध्ये अबदालीने दिल्लीपर्यंत धडक देऊन राजधानी लुटून साफ केली. त्यानंतर कित्येक महिन्यांनी मदतीसाठी रघुनाथरावाची स्वारी दिल्लीस पोहोचली. पठाणांच्या उठावास नजीबखान रोहिला कारणीभूत होता. तो मराठ्यांच्या हातात सापडला. मल्हारराव होळकरांस मोठी लाच देऊन नजीबखानाने आपली सुटका करून घेतली. राघोबाने पठाण फौजांचा पाठलाग सुरू केला. सरहिंद-लाहोर ही ठाणी सर करण्यात येऊन काही मराठी फौजेच्या तुकड्या अटक पार गेल्या.
पुढे अबदाली दुआबात उतरला, त्यावेळी नजीबखानच्या मदतीने सर्व मुसलमान नबाब अबदालीच्या झेंड्याखाली एकत्र आले. कवायती फौजेच्या आठ पलटणी आणि इतर हुजरात फौज घेऊन सदाशिवरावभाऊ दिल्लीवर चालून गेला (१७६०). बागपतजवळ अबदाली यमुना उतरून त्याने मराठ्यांची दक्षिणेतून येणारी रसद तोडली. दोन महिने मदतीची वाट पाहून निराश झालेल्या मराठे सेनेने पानिपतच्या वेढ्यातून बाहेर पडून दिल्ली गाठण्याचा प्रयत्न केला. पानिपतच्या (१४ जानेवारी १७६१) लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला आणि अतोनात नुकसान झाले. पानिपतच्या पराभवाची वार्ता बाळाजीस उत्तरेस जात असताना समजली व तो पुण्यास परतला. अधिक क्षीण होत चाललेली त्याची प्रकृती पानिपतच्या विशेषतः भाऊसाहेब व विश्वासराव यांच्या मृत्यूमुळे खचून गेली. तो पर्वतीवर (पुणे) शोक करीत अकाली मरण पावला.
बाळाजी बाजीरावने अंतर्गत कारभारात अनेक सुधारणा केल्या : जमिनीचा दर्जा पाहून जमीन महसूलाचे दर आखण्यात आले वाहतुकीचे मार्ग सुधारले आणि महाराष्ट्राचा व्यापार वाढविला शेती सुधारली परक्यांचे आक्रमण थांबल्यामुळे आणि बाहेरून खंडणीच्या रूपाने येणाऱ्या द्रव्याने महाराष्ट्र समृद्ध झाला. त्याचे परराष्ट्रीय धोरण कमकुवत होते. त्याच्या वेळी सरंजामदारी वाढून केंद्रीय सत्तेचे महत्त्व कमी झाले. हाती आलेले प्रदेश कायमचे ताब्यात न ठेवल्यामुळे मराठी सत्तेला स्थैर्य प्राप्त झाले नाही. मराठ्यांच्या स्वाऱ्या, अबदालीचे आक्रमण, इंग्रज-फ्रेंचांची युद्धे यांमुळे देशात मोठे अराजक माजले.
बाळाजी बाजीराव यास दोन बायका होत्या पहिली गोपिकाबाई व दुसरी राधाबाई. त्याने राधाबाईंशी उत्तरेस जात असता १७६० मध्ये लग्न केले. तिला संतती नव्हती. गोपिकाबाईंस चार मुलगे झाले. त्यांपैकी विश्वासराव पानिपतच्या युद्धात मारला गेला व पहिला माधवराव व नारायणराव हे पुढे पेशव्यांच्या गादीवर आले यशवंतराव लहानपणी वारला.
पहा : आंग्रे घराणे पानिपतच्या लढाया पेशवे.
संदर्भ: 1. Majumdar, R. C. Ed. The Marathas Supremacy, Bombay, 1977.
2. Sardesai G. S.A New History of the Marathas, Vol. II, Bombay, 1948.
दिघे, वि. गो.
“