बालिनीज भाषा : इंडोनेशियातील बाली या बेटावर ही भाषा बोलली जाते. एकंदर सु. २० लाख लोक ही भाषा बोलतात.

बालिनीज भाषा ही ऑस्ट्रोनेशियन किंवा मलायो-पोलिनेशियन या भाषाकुलातील एक भाषा. जगातील सर्वांत मोठ्या अशा या भाषाकुलाचे पश्चिमी किंवा इंडोनेशियन भाषा आणि पूर्वेकडच्या किंवा ओशनिक (म्हणजे सागरीय) भाषा असे प्रमुख दोन गट आहेत. बालिनीज भाषा पश्चिमी भाषांच्या गटात मोडते. आधुनिक भाषावैज्ञानिक ऑस्ट्रोनेशियन भाषाकुलाचा हेस्परोनेशियन असा एक गट मानून त्यातील पश्चिमी इंडोनेशियन या उपगटात बालिनीज भाषेचा समावेश करतात. बालिनीज आणि या गटातील जावा, सुमात्रा, मलाया, लाँबॉक, मादागास्कर या बेटांवरील भाषांवर पहिल्या शतकात हिंदू संस्कृतीचा आणि म्हणून संस्कृतचा प्रभाव पडला. सातव्या शतकात इस्लामी संस्कृतीच्या संपर्काने या भाषांनी अनेक अरबी शब्द उसनवार घेतले. सोळाव्या शतकानंतरच्या यूरोपिअन संस्कृतीच्या संपर्काने युरोपिअन-विशेषत: पोर्तुगीज-भाषांतील काही शब्दही या भाषांनी उचलले.

आजही बाली बेटावर हिंदू संस्कृती टिकून आहे. म्हणूनच बालिनीज भाषेत-विशेषत: उच्च वर्गाच्या बोलीत-संस्कृत शब्दांचे प्रमाण जास्त आहे. बालिनीज भाषेत जावानीज शब्दांचीही उसनवारी आढळते. बालिनीज भाषेत सहा व्यवच्छेदक स्वर असून दोन अवयवांचे शब्द जास्त आहेत. इतर ऑस्ट्रोनेशियन भाषांप्रमाणेच बालिनीज भाषेचे मूळ, तिची ऐतिहासिक वाढ इ. गोष्टींचा अभ्यास आधुनिक भाषावैज्ञानिकांना एक आव्हानच आहे.

संदर्भ : Voegelin, C. F. Voegelin F. M. Languages of the World: Indo-Pacific Fascicles, Bloomington, 1964.

धोंगडे, रमेश रा.