केन्को:(सु. १२८३ – १३ मे १३५०). जपानी कवी व निबंधकार. योशिदा कानेयोशीचे बौद्ध दीक्षा स्वीकारल्यानंतरचे नाव. क्योटो येथे शिंतो धर्मपंथीय कुटुंबात जन्म. प्रारंभीच्या काळात गो-उदा ह्या सम्राटाच्या पदरी चाकरी केली. १३२४ मध्ये सम्राटाच्या निधनानंतर त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्याने देशभर खूप प्रवास केला. केन्कोच्या कवितांपैकी उपलब्ध असलेल्या ३०० ‘तांका’ (एक अभिजात, अल्पाक्षरी काव्यप्रकार) सांकेतिक आहेत. त्यांतून सनातनी वळणाच्या पारंपरिक दरबारी काव्याचे प्रतिबिंब दिसते. केन्कोला खरी प्रसिद्धी लाभली, ती त्सुरे-झुरे-गुसा (इं. शी. ग्रासेस ऑफ आन्वी किंवा आयड्लनेस, १३२४–३१) ह्या निबंधसंग्रहामुळे. त्यात एकूण २४४ निबंध असून ते धर्म, तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, नीतिशास्त्र आदी अनेक विषयांवर आहेत. सौंदर्यविषयक चिंतनात केन्को सौंदर्याच्या अशाश्वततेस अधिक प्राधान्य देतो. साहित्य, धर्म व नीतिशास्त्र ह्यांच्या सुसंवादातून घडणारे बौद्धिक जीवन हा केन्कोचा आदर्श होता. त्सुरे -झुरे -गुसा  ह्या ग्रंथास जपानच्या साहित्येतिहासात एक श्रेष्ठ अभिजात साहित्यकृती म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. ह्या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर जी. बी. सँसम ह्यांनी ट्रान्झॅक्शन्स ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ जपान ह्या ग्रंथाच्या ३९ व्या खंडात ‘द-त्सुरे-झुरे-गुसा ऑफ योशिदा नो कानेयोशी’ ह्या नावाने १९११ मध्ये केले.  

हिसामात्सु, सेन्इचि (इं.) जाधव, रा. ग. (म.)