नात्सुमे, सोसेकी : (५ जानेवारी १८६७–९ डिसेंबर १९१६). जपानी कादंबरीकार. खरे नाव नात्सुमे किन्नोसुके. टोकिओ शहरी त्याचा जन्म झाला. इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन टोकिओ विद्यापीठाची पदवी त्याने मिळविली (१८९३). त्यानंतर तो अध्यापकाच्या व्यवसायात शिरला. पुढे एका शैक्षणिक योजनेनुसार शिक्षणखात्यातर्फे त्याला लंडनला इंग्रजी साहित्याच्या विशेष अभ्यासासाठी पाठविण्यात आले (१९००). तेथून १९०३ मध्ये परत आल्यानंतर टोकिओ विद्यापीठात तो इंग्रजी साहित्याचे अध्यापन करू लागला.

इ. स. १९०५ मध्ये वाघाहाई वा नेको दे आरू (इ.शी. आय ॲम अ कॅट) ही त्याची उपरोधप्रचुर कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तो एकदम प्रसिद्धीच्या प्रकाशात आला. १९०७ मध्ये अध्यापनक्षेत्र सोडून आसाहि शिंबुन ह्या वर्तमानपत्रात, साहित्यविभागाचा संपादक म्हणून तो काम करू लागला. त्याच्या अनेक कादंबऱ्या ह्या पत्रातूनच क्रमशः प्रसिद्ध झाल्या.

नात्सुमेच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्यांत बोच्‍चान् (१९०६, इं. शी. बॉय), कुसा-माकुरा (१९०७, इं. शी. द ग्रास पिलो), सानशिरो (१९०८), मोन (१९१०, इं. शी. द गेट) व मे-आन (१९१६, इं. शी. डार्कनेस अँड लाइट) ह्यांचा समावेश होतो.

बोच्‍चान् आणि कुसा-माकुरा ह्यांसारख्या त्याच्या आरंभीच्या कादंबऱ्यांवर स्वच्छंदतावादी प्रवृत्तीची लक्षणीय छाया असून नैतिकतेचा एक अंतःस्रोतही त्यांतून प्रत्ययास येतो. मोनसारख्या त्याच्या पुढील कादंबऱ्यांतून मानवी मनोव्यापारासंबंधीचे त्याचे कुतूहल आणि आस्था वाढीला लागल्याचे दिसून येते. नात्सुमेच्या आधीच्या काही कादंबऱ्यांतून ‘स्व’चा (सेल्फ) सतत शोध घेण्याची ओढ जाणवते. त्याच्या नंतरच्या कादंबऱ्यांतून मात्र ‘स्व’ची जाणीव विश्वात्म्याच्या व्यापक जाणिवेत विसर्जित करून टाकण्याची भूमिका त्याने घेतली.

एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून नात्सुमेला जपानी साहित्येतिहासात मानाचे स्थान लाभलेले असून आजही त्याचा वाचकवर्ग मोठा आहे.

नात्सुमेने कथा, कविता आणि निबंध हे साहित्यप्रकारही यशस्वीपणे हाताळले. त्याच्या कथा युमे जूया (१९०८, इं. शी. ड्रीम्स ऑफ टेन नाइट्‌स) मध्ये संगृहीत आहेत. गारासुदो नो नाका (१९१५, इं. शी. बिहाइंड द ग्‍लास डोअर) हा त्याचा निबंधसंग्रह. त्याने लिहिलेल्या ‘हाइकु’ किंवा काही त्रोटक, गूढगुंजनात्मक कविताही श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. बुनगाकु ह्यो-रोन (१९०५, इं. शी. लिटररी नोट्‌स) आणि बुनगाकु रोन (१९०७, इं. शी. लिटररी डिस्‌कशन) हे त्याने टोकिओ विद्यापीठात दिलेल्या साहित्यविषयक व्याख्यानांचे दोन संग्रहही उल्लेखनीय आहेत.

संदर्भ : 1. National Commission for UNESCO, Japan Society for the Promotion of Science, Essays on Natsume Sosekti’s Work, Tokyo, 1972.

हिसामात्सु, सेन्‌-इचि (इं.) शिरोडकर, द. स. (म.)