बाल शो ष : अपूर्ण व अयोग्य आहारामुळे किंवा अन्नाहार योग्य असूनही अयोग्य अभिशोषणामुळे शरीरातील ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांचे ) हळूहळू शुष्कीभवन होऊन शरीर खंगणाऱ्या बालकांतील विकृतीला ‘बालशोष’ म्हणतात. हिंदी भाषेत या विकृतीला ‘सूखारोग’ असे सूचक नाव आहे. त्वचेखालील वसेचा (स्निग्ध द्रव्याचा) नाश होणे व स्नायू सुकत जाणे ही लक्षणे प्रामुख्याने त्यात आढळतात आणि प्राकृतिक (सर्वसाधारण) अपेक्षित वजनापेक्षा ४० % वजन कमी असते. गेल्या कही वर्षांत पश्चिम आफ्रिकेत प्रथम मोठ्या प्रमाणावर आढळलेल्या बालकांतील ⇨ काशिओरकोर या दुसऱ्या एका ⇨  अपपोषणजन्य विकृतीकडे शास्त्रज्ञांचे लक्ष केंद्रित झाल्यामुळे बालशोष या सर्व देशांतून आढळणाऱ्या विकृतीकडे काहीसे दुर्लक्ष झाले. यामुळे या रोगाविषयी पाहिजे तेवढे सांगोपांग लिखाण उपलब्ध नाही. बालकात अपपोषणामुळे उत्पन्न होणाऱ्या विकृतींत ही एक प्रमुख विकृती आहे.

एकोणिसाव्या शतकात यूरोप व उत्तर अमेरिकेत नव्या औद्योगिक शहरांतून अपूर्ण आहार व सांसर्गिक रोग यांमुळे उद्भवलेल्या बालशोष रोगाने अनेक बालके दगावली. आजही आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिका या भागांतून अनेक बालके या रोगाने दगावतात.

कारणे : जी नागरी भागातील कारणे या रोगास प्रवृत्तीकर असतात ती पुढीलप्रमाणे परिणाम करतात.

 

एका पाठोपाठ एक जलद गरोदरपणे 

↓ 

स्तनपान लवकर व एकाएकी थांबविणे 

↓ 

पातळ, अयोग्य, कृत्रिम व अस्वच्छ दुग्धाहार 

↓ 

वारंवार उद्भवणारेसंसर्गजन्य रोग-जठरांत्रमार्गशोथ 

↓ 

उपासमार 

↓ 

अपपोषणजन्य बालशोष

(जठरांत्रमार्गशोथ-जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून होणाऱ्या अन्नमार्गाची दाहयुक्त सूज).

अत्यंत कमी कॅलरी असलेला आहार (अन्नामुळे प्राणिशरीरात उत्पन्न होणारी ऊर्जा कॅलरी या उष्णता एककात मोजतात उदा., १ ग्रॅम वसा ९ कॅलरी तर १ ग्रॅम कार्बोहायड्रेट किंवा प्रथिन ४ कॅलरी ऊर्जा उत्पन्न करतात प्रत्यक्षात पोषणाच्या संदर्भात कॅलरी याचा अर्थ किलोकॅलरी एकक असाच अभिप्रेत आहे) या रोगास प्रामुख्याने कारणीभूत असतो. अन्नघटकांतील प्रथिनांशिवाय कार्बोहायड्रेट-न्यूनता अधिक आढळते. दोन वर्षे वयापर्यंत स्तनपान चालू ठेवलेल्या परंतु वाढत्या वयानुसार योग्य दुग्धाहार न मिळालेल्या किंवा स्तनपानास पूरक म्हणून दिलेल्या अपूर्ण व अयोग्य आहारामुळे ही विकृती उद्भवते. पुष्कळ दिवसांपर्यंत वरचे दूध अतिपातळ करून दिल्यास, दुधाऐवजी चहा किंवा कॉफी प्यावयास दिल्यास, घन आणि अर्ध-घन पदार्थ अपुरे दिल्यास ही विकृती बळावते.

रोगाच्या प्रवृत्तिकर कारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो : (१) जन्मजात विकृती : ⇨ खंडतालू (तोंडाची पोकळी व नाकाची पोकळी यांच्या मधल्या आडव्या पडद्यातील दोष), जलशीर्ष [मस्तिष्क विवरात प्रमाणापेक्षा जादा मस्तिष्क-मेरुद्रवाचा संचय झाल्यामुळे डोक्याचे आकारमान मोठे होते तंत्रिका तंत्र], लघुहनुता (खालचा जबडा लहान असून हनुवटी आत ओढलेली असणे) वगैरे. या विकृतीमुळे अन्न सेवनावर व पचनावर परिणामहोतो. (२) कोणत्याही कारणाने उद्भवणारे चिरकारी वमन (दीर्घकाळ ओकाऱ्या होत राहणे) उदा., जन्मजात जठरनिर्गमद्वार संकोच. (३) आईचे प्रेम व निगा यांचा अभाव बालकाच्या भुकेवर परिणाम करून रोग उद्भवण्यास मदत करतो. (४) चिरकारी संसर्गजन्य रोग उदा., जन्मजात ⇨ उपदंश, ⇨क्षयरोग वगैरे. (५) चिरकारी व वारंवार उद्भवणारा अतिसार. (६) ह्रदय, मेंदू किंवा मूत्रपिंड या अवयवांची गंभीर विकृती. (७) काही चयापचयजन्य विकृती[चयापचय].

रोग उद्भवण्यास तात्काळ कारणीभूत होणाऱ्या विकृतींत जठरांत्र मार्गशोथ, गोवर व इतर संसर्गजन्य रोगांचा समावेश होतो.

वर्गीकरण : बालशोष या रोगाचे अवस्थेनुसार पुढीलप्रमाणे वर्गीकरण करतात :

 

(अ) प्रथम श्रेणी (I किंवा +) : काख व जांघेतील वसानाश.

(आ) द्वितीय श्रेणी (II किंवा + +): काख , जांघ, उदरभित्ती व नितंब या भागांतील वसानाश.

(इ) तृतीय श्रेणी (III किंवा + + +) : वरील भागाशिवाय छाती व पाठ यांतील वसानाश.

(ई) चतुर्थ श्रेणी (IV किंवा + + + +) : वरील सर्व आणि गालातील वसानाश.


लक्षणे : रोगाच्या तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील मूल इवलेसे व तोंड पार सुकलेले दिसते. त्वचेवर जागजागी घड्या पडलेल्या असून कानशीलाच्या जागी खड्डे पडतात व ते गालफडे बसलेल्या दंतहीन म्हाताऱ्यासारखे दिसते. सुरुवातीस काही दिवसांपर्यंत मूल खेळकर व उल्हासित भासले, तरी ते हळूहळू निरुत्साही बनून मंद आवाजात एकसारखे किरकिरते. कोठेही शोफ (शरीरातील ऊतकांत वा पोकळ्यांत अपसामान्य द्रवसंचय होणे) नसतो, केसात बदल होत नाही आणि त्वचाशोथ आढळत नाही. या तीन लक्षणांवरून क्वाशिओरकोर ही विकृती नसल्याचे स्पष्ट होते. मुलात अनेक वेळा निर्जलीभवन झालेले आढळते. अपेक्षित वजनापेक्षा वजन बरेच घटलेले असते. शारीरिक तापमान नेहमीपेक्षा कमी असते. कधी कधी अतिसार आढळतो. स्नायु सुकून वसानाशामुळे हातापायांच्या अक्षरक्ष: काड्या बनतात.

बालशोष : डोळे खोल गेलेले व त्वचेखालील वसेचा नाश झालेले चार महिन्यांचे मूल.

इवलेसे, खंगलेले, त्वचा सर्वांगावर ढिली पडलेले, स्नायूंची वाढ खुंटलेली, त्वचेखालील ऊतकनाश होऊन अत्यल्प अध:त्वचीय ऊतक उरलेले, उदरास फुगोटी व आतील आतड्यांची हालचाल डोळ्यांना स्पष्ट दिसणारे परंतु खणखणित आवाजात रडणारे व चांगली भूक असणारे बालक बहुधा आहारन्यूनताजन्य बालशोषाचा रोगी असते. उदासीन, किरकिरणारे, खेळकरपणा कमी झालेले, खाण्याचे टाळणारे बालक बालशोषाशिवाय कोणत्यातरी संसर्गजन्य विकृतीनेही ग्रासलेले असते.

विशेष प्रयोगशालेय परीक्षा व विकृतिविज्ञान : तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतही रक्तद्रवातील प्रथिने या रोगात कमी होत नाहीत. क्वाशिओरकोर या रोगामध्ये या उलट परिस्थिती असते. न्यूनतम चयापचमान [ चयापचय] वाढते. रक्तद्रव घनफळ वाढते.

प्लीहा (पानथरी), यकृत, जननेंद्रिये यांचे वजन घटते. फुप्फुसे व ह्रदय यांच्या वजनातील घट मात्र अत्यल्प असते, तर मेंदूवर काहीही परिणाम झालेला आढळत नाही.

रोगी व त्याची माता या दोघांबद्दल संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक असते. मातेची गर्भारपणातील व बालकाची स्तनपानादि आहाराविषयीची माहिती निदानास व उपचारास मार्गदर्शक असते. बालकाची संपूर्ण शारीरिक तपासणी पुष्कळ वेळा बालशोषास कारणीभूत असणारे एखादे अंतस्थ कारण निदर्शनास आणू शकते. उदा., जठराची दृश्य हालचाल जठरभागात हातास लागणारा गोळा आणि प्रक्षेपी (ज्यात पदार्थ जोराने बाहेर फेकले जातात असे) वमन ही लक्षणे जठरनिर्गमद्वार संकोच दर्शवितात. संसर्गजन्य विकृतींच्या निदानाकरिता कधी कधी मूत्र तपासणी, छातीची क्ष-किरण तपासणी, बेरियम सल्फेट गिळावयास देऊन जठरांत्रमार्गाचे क्ष-किरण चित्रण इ. विशेष तपासण्या कराव्या लागतात.

उपचार: केवळ आहारन्यूनताजन्य बालशोष असल्यास आहारात भरपूर कॅलरी (शारीरिक वजनाच्या प्रत्येक किलोग्रॅममागे २०० कॅलरी) व भरपूर प्रथिनाचा समावेश केल्यास आजार बरा होतो. आहार एकदम न वाढवता २ ते ३ आठवड्यांत हळूहळू वाढवणे जरूर असते. दुधात लॅक्टिक अम्ल किंवा हायड्रोक्लोरिक अम्ल (३० मिलि. दुधात दोन थेंब) मिसळून दिल्यास ते पातळ न करताही पचते. दुधाबरोबर भाताची कांजी दिल्याने कॅलरीचे प्रमाण वाढते. सायरहित दूध, ⇨ अँमिनो अम्लांची मिश्रणे, लहान मुलांकरिता खास तयार केलेली बालक अन्ने [उदा., फॅरेक्स (ग्लॅक्सो)] इ. पूरक पदार्थ उपयुक्त असतात. गव्हाचे पीठ, भाज्या व वसारहित तेलबियांचे पीठ, जीवनसत्त्वे व कॅल्शियम यांच्या मिश्रणापासून बनविलेले ‘बाल-आहार’ नावाचे पूरक बालक अन्न [यात १०० ग्रॅ. मध्ये २२-२६ ग्रॅ. प्रथिन असते बालक अन्न] किंवा भुईमूग व हरबरा यांचे पीठ, कॅल्शियम कार्बोनेट, , आणि या जीवनसत्त्वांचे मिश्रण (यात १०० ग्रॅ. मध्ये ४० ग्रॅम प्रथिन असते) पूरक अन्न म्हणून उपयुक्त असतात.

आहाराशिवाय संसर्गजन्य रोगांवरील योग्य उपचार, अतिसार, जीवनसत्त्वन्यूनता, लवणन्यूनत्त्व आणि निर्जलीभवन यांवरही उपचार करावे लागतात.

प्रतिबंधात्मक उपाय : आजार होऊ नये यासाठी जन्मल्यापासूनच बालकाच्या पोषणाकडे लक्ष द्यावयास हवे. अलीकडील संशोधनानुसार स्तनपानाचे महत्त्व निर्विवाद सिद्ध झाले आहे. स्तनपान बंद केल्यानंतर गरजेप्रमाणे कॅलरी (ऊर्जा) व प्रथिने मिळतात किंवा नाही याकडे लक्ष देणे जरूर असते. मूल जबड्याच्या चर्वण हालचाली करू लागताच व सर्वसाधारणपणे ६ किग्रॅ. वजनाचे झाल्यावर घन अन्नपदार्थ सुरू करावे. बालसंगोपन केंद्रातून मातांना बालक अन्नाविषयी संपूर्ण माहिती करून देणे सर्व विकसनशील देशांतून अत्यावश्यक आहे. बालकांसाठी मिळाणाऱ्या किंवा घरी तयार करून देता येणाऱ्या सर्व पूरक अन्नांची माहिती व त्यांचा योग्य वापर प्रात्यक्षिकांद्वारे मातांना समजावून दिल्यास ६ महिने ते २ वर्षे या वयातील बालकांची वाढ व वजन योग्य ठेवणे शक्य आहे. प्रमाणापेक्षा अतिपातळ करून दूध पाजणे ही अगदी नेहमी आढळणारी व अक्षम्य चूक आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना सरकारी अथवा सहकारी समाजकल्याण योजनेतून योग्य बालक अन्न पुरवठा, अल्पखर्चात किंवा मोफत मिळण्याची गरज आहे.

 

पहा : क्वाशिओरकोर बालक अन्न.

संदर्भ : 1. Achar, S. T. Vishwanathan J. Pediatrics in Developing Tropical Countries, Madras, 1975

            2. Gupte, Suraj The Short Textbook of Pediatrics, Delhi, 1977

            3. Mitchell, R. G. Ellis and Mitchell Diseases of Infancy and Childhood, Edinburgh, 1973.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.