बार्नेकल : हे प्राणी क्रस्टेशिया (कवचधारी प्राण्यांच्या) वर्गाच्या सिरिपिडिया उपवर्गातील थोरॅसिका गणातील आहेत. हे प्राणी अतिशय रूपांतरित (बाह्य रूपात बदल झालेले) असून काही सवृंत्त (आधाराला चिकटण्यासाठी देठासारखा भाग असलेले) तर काही अवृंत्त (असा देठासारखा भाग नसलेले) आहेत. या उपवर्गातील काही बार्नेकल परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे) आहेत, यामुळे -हास होऊन त्यांच्या शरीररचनेत आणखी जास्त बदल झालेला आहे.

सवृंत्त बार्नेकलचे लेपॅस हे चांगले उदाहरण आहे. याला ‘गूझ बार्नेकल’ असेही म्हणतात. याचा समावेश लेपॅडिडी या कुलात होतो. हा सागरी प्राणी एका लांब देठाने जहाजांच्या बुडांना किंवा लाकडाच्या ओंडक्यांना चिकटलेला आढळतो. समुद्रावरील जहाजांना याच्यामुळे हानी पोहोचते. देठाच्या दूरस्थ (लांबच्या) टोकावर शरीर असून ते पाच कॅल्शियममय पट्टिकांनी मजबूत झालेल्या एका द्विपुट पृष्ठवर्मात (पाठीचा सर्व वा काही भाग झाकणाऱ्या कायटिनमय अथवा अस्थिमय ढालीसारख्या संरचनेत) बंद असते. या पाच पट्टिकांपैकी एक मध्य व पृष्ठीय (वरची), दोन पार्श्व (बाजूच्या) व समीपस्थ (जवळची) आणि दोन पार्श्व व दूरस्थ असतात. जिवंतपणी पृष्ठवर्म अंशतः उघडे असते. सगळ्या पट्टिकांना आतून प्रावाराचे (कवचाच्या लगेच खाली असणाऱ्या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीचे) अस्तर असते. वक्षीय पादाच्या (छातीवरील पायांच्या) सहा जोड्या असतात. पाद बाहेर काढून पाण्यात निरनिराळ्या बाजूंना फिरवून त्यांच्यावरील केसांच्या साहाय्याने हे सूक्ष्मजीव पकडून खातात. याच्या प्रावारावर दोन डोळे असतात. या डोळ्यांचे कार्य फक्त उजेडाची जाणीव देण्यापुरतेच असते. शरीराची रचना क्रस्टेशिया वर्गातील इतर प्राण्यांच्या धर्तीवर असते. उपांगे (इंद्रिये) संधियुक्त (सांधेयुक्त) असतात. ठराविक काळानंतर कात टाकली जाते व शरीराची वाढ होते. कात टाकण्यात पृष्ठवर्माच्या पट्टिकांचा समावेश नसतो. यांची वाढ सतत होत असते.

शरीराचा अग्रभाग खाली देठाला आणि पृष्ठवर्माला चिकटलेला असतो. पश्च भाग मोकळा आणि तंतूसारखा असतो. याच्या लगेच वर गुदद्वार असते. मुख अधर (खालच्या बाजूला) असते. जंभांची (जबड्यांची) एक आणि जंभिकांच्या दोन जोड्या असतात शृंगिका (सांधेयुक्त स्पर्शेंद्रिय) नसतात देठाच्या समीपस्थ पृष्ठावर सूक्ष्म लघु शृंगिकांची जोडी असते. शीर्षाचा अग्रभाग लांब होऊन त्याचा देठ बनतो.

अवृंत्त बार्नेकलचे बॅलॅनस हे उदाहरण असून याला ‘ॲकॉर्न शेल’ असेही म्हणतात. याचा समावेश बॅलीनिडी या कुलात होतो. अवृंत्त बार्नेकलची रचना लेपॅससारखीच असते पण त्याला देठ नसतो. बहुतेक अवृंत्त बार्नेकलांचे कवच ४-८ उभ्या भिंतीसारख्या कॅल्शियममय पट्टिकांचे बनलेले असून ते टोकाकडील बाजू छाटलेल्या शंकूसारखे असते. कवचाच्या उघड्या टोकावर चार पट्टिकांचे झाकण असते. कवचाचे बूड एखाद्या आधाराला चिकटलेले असते. शीर्षभाग आखूड व रुंद असतो. वक्षीय पादांच्या साहाय्याने हे भक्ष्य पकडतात.

प्रौढ बार्नेकल उभयलिंगी (नर व मादीची इंद्रिये एकाच प्राण्यात असलेले) असतात. काही जातींत खुजे नरही आढळले आहेत. बहुतेक जातींत प्रौढामध्ये परनिषेचन (परफलन) घडून येते. काही जातींत स्वनिषेचनही आढळते. फलित अंडी घातल्यानंतर ती प्रावार गुहेतच राहतात. तेथेच त्यांची वाढ होऊन अंड्यांतून ‘नॉप्लियस’ डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतःक्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर येतात व ते बाहेरच्या पाण्यात सोडले जातात. यांच्यापासूनच सु. एक आठवड्यानंतर अगदी वेगळे दिसणारे ‘सायप्रिस’डिंभ तयार होतात. हे डिंभ स्वतंत्रपणे पाण्यात फिरतात पण काही खात नाहीत. पाण्याच्या तापमान व इतर परिस्थितीनुरूप डिंभाची अवस्था १ ते ८ आठवडे टिकते. या काळानंतर तळाशी जाऊन सायप्रिस एखाद्या आधाराला शीर्षाने चिकटतो व या जागी त्याचे पूर्ण रूपांतर होऊन बार्नेकल तयार होतो. बार्नेकलचे डिंभ मोठ्या संख्येने आढळतात. मासे, समुद्री अर्चिन व काही गॅस्ट्रोपॉड (शंखधारी) या डिंभांचा अन्न म्हणून उपयोग करतात.

बार्नेकलपासून जहाजांना होणारा उपद्रव थांबविण्यासाठी जहाजांच्या बुडास काही विशिष्ट प्रकारचा रंग दिला जातो. त्याच्या वासाने बार्नेकलचे डिंभ जहाजाच्या बुडावर स्थिर होत नाहीत व अशा रीतीने जहाजास भोके पडण्याचे संभाव्य धोके टाळले जातात.

मुक्तजीवी बार्नेकलखेरीज या उपवर्गात-हायझोसेफॅला गणातील परजीवी बार्नेकलही आढळतात. सॅक्युलायना वंशातील हे प्राणी प्रसिद्ध आहेत. काही काळ मुक्त जीवन जगल्यावर सॅक्युलायना खेकड्याच्या अधर भागास देठाने चिकटतो. या देठापासून शाखा फुटून त्या खेकड्याच्या शरीरात घुसतात. सॅक्युलायनाच्या शरीररचनेचा -हास होतो. त्याला उपांगे, आहारनाल(अन्नमार्ग) व जननतंत्र (प्रजोत्पादन संस्था) सोडून इतर तंत्रे असत नाहीत. यथाकाल सॅक्युलायनाचे डिंभ तयार होतात आणि त्यांपासून तयार झालेले सॅक्युलायना दुसऱ्या खेकड्यावर जाऊन स्थिर होतात.

कर्वे, ज. नी. इनामदार, ना. भा.