बारसे : हिंदू कुटुंबात अपत्याचा जन्म झाल्यावर सामान्यतःबाराव्या दिवशी साजरा केला जाणारा, त्याचे नाव ठेवण्याचा समारंभ. बाराव्या दिवशी घडणारा, म्हणून त्याला ‘बारसे’ (संस्कृत ‘द्वादश’ वा ‘द्वादशाह’) असे म्हणतात. बाराव्या दिवसाखेरीज अन्य दिवशी म्हणजे दहाव्या दिवशी किंवा कोणत्याही सोईस्कर शुभ दिवशी हा समारंभ झाला, तरी लक्षणेने त्याला बारसे असेच म्हटले जाते. हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी ‘नामकरण’ या संस्कारालाच हल्ली बारसे वा ‘नाव ठेवणे’ असे म्हणतात. पूर्वी स्त्रीशूद्रांखेरीज इतरांचा नामकरण संस्कार वैदिक मंत्रांसह केला जाई परंतु गेल्या काही शतकांपासून बारशाच्या वेळी हे मंत्र म्हणण्याची प्रथा बंद झाली आहे. 

नामकरणाचा प्रारंभ भाषेच्या उत्पत्तीबरोबरच झाला आहे. व्यवहारपूर्तीसाठी नामकरणाची अपरिहार्यता आणि अपत्यजन्माचा आनंदोत्सव साजरा करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती यांमुळे नामकरणाला सामाजिक व भावनिक दृष्टींनी अत्यंत महत्त्व असते. म्हणूनच हिंदूंनी नामकरणाचा सोळा संस्कारांत अंतर्भाव करून त्याला धार्मिक अधिष्ठान दिले. ख्रिस्ती धर्मातही नामकरणाला खूप धार्मिक महत्त्व दिले आहे.

नामकरणाचा संकल्प करताना अपत्याच्या पापाचा नाश, आयुष्य व तेज यांची अभिवृद्धी, व्यवहारसिद्धी व परमेश्वराची प्रसन्नता यांसाठी नाव ठेवत आहे, असे नामकरणाच्या धार्मिक विधीत म्हटले जाते. त्यावेळी गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन व नांदीश्राद्ध केले जाते. त्यानंतर मंत्रपूर्वक नावे ठेवले जाते. हल्ली मात्र या विधींचे महत्त्व कमी होत असून त्याऐवजी, सुवासिनी जमतात, मातेची ओटी भरली जाते, मुलाला पाळण्यात ठेवून ‘पाळणे’ म्हटले जातात आणि त्याचे नाव ठेवून ऐपतीप्रमाणे भोजनादी समारंभ केले जातात. बारशाच्या वेळी वडील उपस्थित नसतील, तर इतर वडीलधारी माणसे हा समारंभ करतात.

नाव केव्हा ठेवावे, या बाबतीत जन्मलेल्या दिवशी नाव ठेवावे, या मतापासून एक वर्षानंतर नाव ठेवावे तरी चालेल, या मतापर्यंत विविध विकल्प आढळतात. सामान्यतःजननाशौच संपल्यानंतर नाव ठेवण्याची पद्धती आहे बालकाचे व मातेचे आरोग्य, कौटुंबिक सोय, अमावास्या वा संक्रांतीसारखे अशुभ योग, वेगवेगळ्या जातींतील जननाशौचाचा वेगवेगळा अवधी इत्यादींचा विचार करून नामकरण विधी होतो. त्यामुळेच अनेकदा प्रारंभी व्यवहारासाठी काहीतरी नाव ठेवून नंतर योग्य वेळी बारसे करण्याची पद्धत आढळते.

संकटांपासून संरक्षण व्हावे, म्हणून बालकाचे एक गुप्त नाव ठेवण्याची पद्धतही असते. दोन, तीन वा चार नावेही ठेवतात. नाव कोणते ठेवावे, याविषयी विविध नियम आढळतात. मनू इ. स्मृतींमध्ये नाव कसे असावे याबद्दल नियम सांगितले आहेत वर्णभेदानुसारे नामकरण करण्याचे सांगितले आहे. उदा., ब्राह्मणाचे मांगल्यदर्शक, क्षत्रियाचे शौर्यसूचक, वैश्याचे समृद्धीबाधक व शुद्राचे दास्यज्ञापक नाम असावे. कुलाची देवता, जन्मनक्षत्र यांचा संबंध नावाने सूचित व्हावा. स्त्रियांच्या नावाचा शेवटचा वर्ण दीर्घ, आकारान्त, ईकारान्त असावा स्त्रीचे नाव मनोहर,आशीर्वादसूचक, सुखोच्चार असावे. बारशाच्या वेळी ठेवलेले नाव हे व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाचा एक अविभाज्य भाग बनत असल्यामुळे, बारसे ही व्यक्तीच्या जीवनातील एका महत्त्वाच्या परिवर्तनाची घटना होय.

 पहा : संस्कार (हिंदूंचे). 

                                                                                                                                                                    साळुंखे, आ. ह.