बारशिंगा : स्तनी प्राण्यांपैकी समखुरी गणाच्या सर्व्हिडी कुलात या हरिणांचा समावेश होतो. बारशिंगा हा सर्व्हस वंशातील सर्व्हस ड्यूव्हाउसेली या जातीचा असून भारतात याच्या दोन प्रजाती आढळतात. यांपैकी एक सर्व्हस ड्यूव्हाउसेली ड्यूव्हाउसेली व दुसरी सर्व्हस ड्यूव्हाउसेली ब्रँडेरी ही होय. तराई, उत्तर प्रदेश, आसाम व सुंदरबन या भागांतल्या दलदलीच्या प्रदेशातआढळणाऱ्या ड्यूव्हाउसेली या प्रजातीच्या बारशिंग्याचे खूर पसरट असतात व डोके मोठे असते, तर मध्य प्रदेशात आढळणाऱ्या ब्रँडेरी प्रजातीच्या बारशिंग्यांचे खूर लहान व आखूड असतात आणि ते खडकाळ व गवताळ प्रदेशांत राहतात. हे पाण्यावर विशेष अवलंबून असत नाहीत.तराईमधील बारशिंगा दलदलीच्या प्रदेशातून सहसा बाहेर येत नाही. आसामधील बारशिंगा उंच जागी पाण्याच्या सन्निध राहतो. दलदलीच्या प्रदेशात किंवा पाण्यासन्निध राहण्याच्या यांच्या सवयीमुळे इंग्रजीत यांना ‘स्वॅम्पडीयर’ असे म्हणतात. हे प्राणी कळप करून राहतात. कळपात हजारो बारशिंगे असतात. हे निशाचर नाहीत. ते सकाळी व सायंकाळपूर्वी चरण्यास बाहेर पडतात व दुपारी विश्रांती घेतात. झाडांचा कोवळा पाला व गवत यांवर यांची उपजीविका चालते.
पूर्ण वाढ झालेल्या नराची खांद्यापर्यंतची उंची १३५ सेंमी. व वजन १७० ते १८० किग्रॅ. असते. शिंगांची उंची ७५ सेंमी. व घेर १३ सेंमी. असतो. यापेक्षाही मोठी शिंगे आढळली आहेत. मादी नरापेक्षा थोडी लहान असते.
बारशिंग्याची दृष्टी व श्रवणशक्ती सर्वसाधारण प्रतीची असते त्याची घ्राणेंद्रिये मात्र तीक्ष्ण असतात. कान मोठे असतात. काही जातींत डोळ्यांच्या खाली गंध ग्रंथी असतात. नरांच्या या ग्रंथींमधून एक वासाचा द्रव वाहत असतो. या ग्रंथी अश्रू ग्रंथींपेक्षा वेगळ्या आहेत. धोक्याची सूचना मिळाल्याबरोबर सर्व कळप मोठ्याने आवाज करतो. हे प्राणी माजावर येण्याचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत निरनिराळा असतो. हा काळ मध्य प्रदेशात डिसेंबर-जानेवारी, उत्तर प्रदेशात नोव्हेंबर-डिसेंबर तर आसामात एप्रिल-मे असा आहे. माजावर येईपर्यंत सर्व प्राणी कळपात गुण्यागोविंदाने रहात असतात. माजाच्या काळात नरांची एकमेकांशी झुंज होते. विजयी नर आपला जनानखाना निर्माण करतात. एका जनानखान्यात अंदाजे ३० माद्या असल्याचे आढळले आहे. हा काळ संपला की, पुन्हा नवीन मोठे कळप तयार होतात. गर्भावधी सरासरी सहा महिन्यांचा असतो. मादी एका वेळेस एका पिलाला जन्म देते. दोन वर्षांनी पिलू वयात येते.
पहा : हरिण.
“