बायोटीन : जलविद्राव्य (पाण्यात विरघळणाऱ्या) अशा ब जीवनसत्व व गटातील एका घटकाला ‘बायोटीक’ म्हणतात. निसर्गात हा जैव पदार्थ विस्तृत प्रमाणात विखुरलेला असून तो जिवंत कोशिकांत (पेंशीत) असून तो एक सर्वव्यपी घटक म्हणून आढळतो. त्याचे रेणवीय सूत्र C10H16SO3N2 असे असून संरचना सूत्र (रेणूतील अणूंची मांडणी दर्शविणारे सूत्र) पुढीलप्रमाणे आहे.
बायोटीन या नावाशिवाय हा घटक बायॉस II b, फॅक्टर X, को-एंझाइम-आर, व्हिटॅमिन एच, ॲटि-एग-व्हाइट-इंजुरी फॅक्टर आणि व्हिटॅमिन बी डब्ल्यू या नावांनीही ओळखला जातो.
इतिहास : कोंबडीच्या अंड्यातील पांढऱ्या बलकामुळे काही प्राण्यांत निर्माण होणाऱ्या विषारी परिणामांच्या आणि ⇨यीस्टच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पदार्थाच्या अभ्यासातून बायोटिनाचा शोध लागला. १९०१ मध्ये ई. विल्डिअर्स यांना यीस्टच्या वाढीस आवश्यक असलेल्या नैसर्गिक द्रव्यात अत्यल्प प्रमाणात विखुरलेल्या एका पदार्थाची जाणीव आली होती. त्यांनी त्या पदार्थाला ‘बायॉय’ असे नावही दिले होते. या अज्ञात पदार्थातून नंतर अलग मिळविण्यात आलेल्या पदार्थाला बायॉस II b असे नाव देण्यात आले. १९१६ मध्ये डब्ल्यू. जी. बेटमन यांना असे आढळले की, अन्नात अंड्याच्या पांढऱ्या बलकाचे प्रमाण जास्त असल्यास विषारी परिणाम होतात. १९२७ मध्ये एम्. ए. बोॲस यांना उंदराला फक्त कच्ची अंडी खावयास दिल्यास त्वचा शोथ (त्वचेची दाहयुक्त सूज), कृशता उत्पन्न होऊन मृत्यू येतो, असे दिसून आले. त्यांनी या विकृतीला “एग-व्हाइट-इंजुरी” असे नाव दिले. प्रथिने शिजवून दिल्यास अशी विकृती उद्भवत नाही, हे बोॲस यांनीच दाखविले. एच्. टी. पार्सन्स व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषारी परिणामाविषयी इतर बऱ्याच प्राण्यांवर प्रयोग केले. बोॲस यांनी ज्या अज्ञात पदार्थांमुळे विकृती होण्याचे टळते त्याला ‘प्रोटेक्टिव्ह फॅक्टर एक्स’ असे म्हटले. पी. ग्योर्गी यांना हा पदार्थ जीवनसत्त्वासारखा वाटल्यामुळे त्यांनी ‘जीवनसत्त्व एच्’ असे नाव दिले. १९३३ मध्ये एफ्. ई. ॲलिसन व त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळून आले की, ऱ्हायझोबियम लेग्युमिनोसेरम या सूक्ष्मजंतूंच्या वाढीकरिता, तसेच श्वसन क्रियेकरिता विशिष्ट पदार्थाची आवश्यकता असते. त्यांनी या पदार्थास ‘को-एंझाइम-आर’ असे नाव दिले. १९३६ मध्ये यीस्टच्या वाढीसंबंधी प्रयोग करीत असताना एफ्. कोगेल आणि बी. टोनिस यांनी अंड्याच्या बलकातून वाढीस आवश्यक असा एक स्फटिकीय घटक अलग मिळविला व त्याला ‘बायोटीन’ हे नाव दिले.
अंड्याच्या बलकापासून व यकृतापासून मिळविलेली बायोटिने वेगवेगळी असतात, असे कोगेल वत्यांच्या सहकाऱ्यांनी शोधून काढले. बायोटिनयुक्त नैसर्गिक पदार्थापासून मुक्त बायोटिनाशिवाय त्याचे काही अनुजात (त्यापासून तयार होणारी अन्य संयुगे) व संबंधित संयुगे शोधण्यात आली आहेत. अनुजात काही सूक्ष्मजंतूंच्या वाढीस मदत करतात, असे आढळून आले आहे. तथापि मानवी पोषणासंबंधीचा त्यांचा अभ्यास करण्यात आलेला नाही.
एकक व आमापन : बायोटीन ओळखण्यापूर्वी आणि ते अलग मिळविण्यापूर्वी बायोटीनयुक्त पदार्थाची शक्ती व्यक्त करण्यासाठी जैव एकके वापरीत. उदा., उंदीर एकक, यीस्ट-वृद्धी एकक. आमापनाकरिता फक्त सूक्ष्मजैव पद्धती वापरतात [⟶ आमापन, जैव]. बायोटिनाचे पदार्थातील प्रमाण निश्चित करणारी रासायनिक किंवा भौतिक पद्धत अद्याप उपलब्ध नाही.
पुरवठा व शरीरक्रियात्मक कार्य : ब जीवनसत्त्व गटातील इतर घटकांबरोबरच यीस्ट, यकृत, वृक्क (मूत्रपिंड), कोंबडी, अंडी, कोको, हिरव्या भाज्या, वाटाणा, तृणधान्ये, दूध इ. अन्नपदार्थात बायोटीन विखुरलेले असते. तृणधान्यांना मोड आल्यावर त्यांतील बायोटिनाचे प्रमाण वाढते. बहुतेक अन्नपदार्थातून ते इतर पदार्थांशी संयुग्मित स्वरुपात असते व आंत्रमार्गातील (आतड्यातील) एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिन पदार्थांच्या) त्यावरील परिणामांमुळे जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रियेने विच्छेदन झाल्याने म्हणजे संयुगाच्या रेणूचे विभाग पडल्याने) ते मुक्त होते. मांस शिजवल्यानंतरी त्यातील ७०% बायोटीन शिल्लक राहते. प्राणी व मानव यांच्या आतड्यातील सूक्ष्मजंतू बायोटिनाचे संश्लेषण करतात. शरीरात बायोटीन अनेक एंझाइमसंबंधितच्या विक्रियांत भाग घेते. विशेषेकरून ते बायकार्बोनेट (HCO3)आयनातील विद्युत् भारित अणू,रेणू वा अणुगटातील येथे अणुगटातील) कार्बन डाय-ऑक्साइड बद्ध करून नंतर वसाम्ल संश्लेषणाकडे [⟶ वसाम्ले] त्याचे समावेशन करते. काही ⇨ ॲमिनो अम्लांच्या ॲमिनोनिरासात (ॲमिनो गट,-NH2 ,काढून टाकण्याच्या क्रियेत) बायोटीन भाग घेते, उदा., ॲस्पार्टिक अम्ल⟶NH3+फ्यूमेरिक अम्ल.
बायोटीन सल्फोन, डेसथायो- बायोटीन, काही इमिडोझोलिडॉन, कार्बॉक्सिलिक अम्ले व ॲव्हिडीन हे बायोटीनविरोधी प्रमुख पदार्थ होत. यांपैकी ॲव्हिडिनावर अधिक संशोधन झाले आहे. कोंबडी, बदक, टर्की व हंस या प्राण्यांच्या अंड्यांच्या पांढऱ्या बलकात हा पदार्थ एक नैसर्गिक घटक असून तो एक ग्लायकोप्रथिन आहे. ॲव्हिडिनाला बायोटिनाचे जबरदस्त रासायनिक आकर्षण आहे. ॲव्हिडीन व बायोटीन यांच्यापासून तयार होणाऱ्या संयुगावर पचनक्रिया करणाऱ्या एंझाइमांचा परिणाम होत नाही व ते जसेच्या तसे मलातून उत्सर्जित होते. अंड्यांच्या विषारी परिणामास (एग-व्हाइट-इंजुरी) ॲव्हिडिन कारणीभूत असते कारण ते जसे अन्नातील बायोटिनाशीही संयुग्मित होते. तसेच आतड्यात तयार होणाऱ्या अंतर्जात बायोटिनाशीही संयुग्मित होत, परिणामी बायोटिनन्यूनत्व उद् भवते. अंडे शिजवले म्हणजे ॲव्हिडिनाची ही बायोटिनाशी संयुग्मित होण्याची क्षमता नाश पावते व म्हणून विषारी परिणामही होत नाहीत.
संदर्भ :
1. Bicknell, F. Prescott, F. The Vitamins in Medicine, London, 1953.
2. Goodman, L. S. Gilman. A, The Pharmacological Basis of Therapeutics, New York, 1965.
3. Sebrell, W. H. (Jr.) Harris, R.S.The Vitamins, Vol.ll, New York and London, 1967.
4. West, E. S. Todd, W. R. Textbook of Biochemistry, New York, 1961.
गाळकर, ना.तु. भालेराव, य. त्र्यं. मिठारी, भू. चिं.
“