बापट, पुरुषोत्तम विश्वनाथ : (१२ जून १८९४ – ). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषाकोविद, बौद्ध धर्मग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक. जन्म सांगलीचा. इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण नांदेडच्या सरकारी शाळेत नंतर मॅट्रिकपर्यंतचे साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पालीचा अभ्यास करून बी.ए. (१९१६) व एम्.ए. (१९१९) ह्या पदव्या संपादिल्या. ह्या महाविद्यालयात बौद्ध धर्माचे जगद्विख्यात पंडित ⇨ धर्मानंद कोसंबी त्यांना गुरू म्हणून लाभले (१९१२-१८). महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सिंहली, ब्रह्मी आणि थाय लिप्यांचा त्यांनी अभ्यास केला होता. एम्.ए. झाल्यानंतर ते फग्युसन महाविद्यालयात अध्यापन करू लागले. ह्या महाविद्यालयात पालीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून त्यांनी १९३२ ते १९५४ ह्या कालखंडात काम केले. १९२॰ पासून १९५४ पर्यंत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते आजीव सदस्य होते. १९२९ मध्ये बौद्ध ग्रंथांच्या इंग्रजी अनुवादांसाठी साहाय्यक म्हणून येण्याचे निमंत्रण त्यांना अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठाकडून मिळाले. तेथे असताना वॉल्टर क्लार्क ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इंडिक फिलॉलॉजी’ ह्या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच्.डी मिळवली (१९३२ ). १९५३ मध्ये भारत सरकारतर्फे ब्रह्मदेश, थायलंड, व्हिएटनाम, कंबोडिया ह्या देशांचा, १९५६ मध्ये चीनचा व १९५९ मध्ये जपानचा सांस्कृतिक दौरा करण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे दिल्ली विद्यापीठात ‘बुद्धिस्ट स्टडीज’ ह्या विभागाचे ते संघटक आणि प्रमुख होते (१९५७-६॰). १९६३ पासून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे ते एक विश्वस्त आहेत. चिनी, तिबेटी, फ्रेंच, बंगाली ह्या भाषा त्यांना अवगत आहेत.
बापटांनी संपादिलेल्या ग्रंथात २५॰॰ यीअर्स ऑफ बुद्धिझम (१९५९ ) हा विशेष उल्लेखनीय होय. बुद्धाचे जीवन आणि शिकवण बौद्ध धर्माचा उद्गम आणि विस्तार त्या धर्मातील प्रमुख पंथ बौद्ध साहित्य विद्या आणि कला बौद्ध धर्म आणि आधुनिक जग बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन अशा अनेक महत्वपूर्ण विषयांसंबंधीचे व्यासंगी विद्वानांचे लेख ह्या गंथात अंतर्भूत असून स्वत: बापटांनी आपल्या लेखनाने ह्या ग्रंथास मोठा हातभार लाविला आहे.
अखिल भारतीय प्राच्यविद्यापरिषदेच्या १९४३ व १९६१ ह्या दोन अधिवेशनांत पाली-प्राकृत विभागाचे अध्यक्ष १९४६च्या अधिवेशनात पाली बुद्धिझम विभागाचे अध्यक्ष व ह्या परिषदेच्या १९७४ च्या कुरुक्षेत्र अधिवेशनाचे ते प्रमुख अध्यक्ष होते. बौद्ध ग्रंथांसंबंधीचे त्यांचे कार्य लक्षात घेऊन ‘नवनालंदा विद्याविहारा’ने ‘विद्यावारिधि’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा गौरव केला (१९७४).
“