बाफळी : (हिं. दुकू इं. वाइल्ड कॅरट लॅ. प्युसिडॅनम ग्रँडे कुलअंबेलिफेरी). फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] कोथिंबीर, शेपू, जिरे, ओवा इत्यादींच्या कुलातील ही एक उपयुक्त वनस्पती आहे. हिच्या प्युसिडॅनम या वंशातील एकूण सु. १२॰ जातींतील दहा जाती भारतात आढळतात त्यांपैकी ही एक असून तिचा प्रसार महाराष्ट्रात (कोकण, दख्खन) सह्याद्रीत बराच आहे ही समूहाने वाढते. हिची उंची सु. १ मी. असून ती गुळगुळीत, मांसल व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ओषधी [⟶ओषधि] आहे. हिचे खोड सरळ, तळाशी करंगळीएवढे, जाड, चुरगळल्यावर उग्र वासाचे व खोबणीदार असते. प्रधान (मुख्य) मूळ मोठे, कठीण व वर्षानुवर्षे वाढणारे असते. बरीच पाने मूलज (मुळांपासून वाढून आलेली) व काही स्कंधेय (वायवी खोडावरची) संयुक्त, पिसासारखी, एकदा किंवा दोनदा विभागलेली दले बहुधा दोन जोड्या व टोकाकडे एक अशी असून कमीजास्त प्रमाणात विभागलेली दलके खोलवर कातरलेली व दातेरी. फुले लहान, लिंबाच्या वासाची, पिवळी, संयुक्त चामरकल्प (चवरीसारख्या) फुलोऱ्यात जुलैमध्ये येतात. फळे आंदोलिपाली [⟶फळ], शुष्क, लांबट, गोलसर, टोकदार, लहान, पंखयुक्त व चपटी फलांश (फळाचे निसर्गत: तडकून झालेले भाग) लालसर पिवळे व उग्र वासाचे असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे व फुलांची संरचना अंबेलिफेरीत (चामर कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. [⟶अंबेलेलीझ].
पहा : अंबेलेलीझ गाजर.
संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII , New Delhi, 1966
2. Kirtikar, K.R. Basu, B.D. Indian Medicinal Plants, Vol. II, Delhi, 1975.
परांडेकर, शं. आ.
“