बाझ बहादूर : (इ.स. १६वे शतक). माळव्याचा शेवटचा सुलतान. बाझ बहादूर व त्याची राणी रूपमती यांच्या रोमांचकारी प्रणयकथा माळव्यातील लोकसाहित्यात रूढ आहेत. त्याच्या जन्ममृत्यूच्या सनांविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. त्याच्या कारकीर्दीचा कालखंड १५५४-१५६४ असा मानण्यात येतो. हा सुलतान विलासी असून शिकार व संगीत यांचा शौकिन होता. राज्यारोहणानंतर त्याने मांडवगड येथे आपली राजधानी स्थापून तेथे सुंदर व भव्य वास्तू उभारल्या. त्याचे राज्यकारभाराकडे विशेष लक्ष नव्हते. त्यामुळे त्याचे अफगाण अधिकारी नाराज झाले व त्यांनी आधमखानाच्या हाताखाली आलेल्या मोगली सैन्याबरोबर लढण्यास बाझ बहादूरास सहकार्य दिले नाही. अकबराच्या बलाढ्य सैन्याने २९ मार्च १५६१ रोजी त्याचा दारुण पराभव करून मालमत्ता, हत्ती, घोडे, जनानखाना इ. सर्व संपत्ती लुटली. बाझ बहादूर खानदेशात पळून गेला. तेथे त्याचा मोगली सैन्याने पाठलाग केला पण खानदेशचा मुबारकखान, वऱ्हाडचा तुफालखान व बाझ बहादूर या तिघांच्या संयुक्त सैन्याने मोगलांचा पराभव केला. तेव्हा त्याला माळव्याचे राज्य पुन्हा मिळाले. अकबराने उझबेकच्या अब्दुलखान याच्या कणखर नेतृत्वाखाली १५६२ मध्ये मोठे सैन्य पाठविले. या सेन्याने माळवा जिंकून बाझ बहादूरचा पराभव केला (१५६२). बाझ बहादूर चितोडला आश्रयास गेला व पुढे काही वर्षे अज्ञातवासात भटकत राहिला. अखेर नोव्हेंबर १५७॰ मध्ये अकबर नागवर येथे असताना बाझ बहादूर त्यास शरण आला. तेव्हा अकबराने त्यास दोन हजारीचा मनसबदार केले.
भिडे, ग. ल.