बाजीराव, दुसरा : (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा. रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. धार येथे जन्मला. लहानपणी हा हूड व विक्षिप्त होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने पेशव्याच्या गादीवर इतर वारस बसविण्याची खटपट केली पण ती अयशस्वी होऊन बाजीरावास पेशवेपदावर बसविणे त्यास क्रमप्राप्त झाले. बाजीराव व नाना फडणीस यांचे कधी जमले नाही. अखेर अंतर्गत कारस्थानात बाजीराव यशस्वी झाला. नाना फडणीस प्रथम कैदेत पडले व पुढे लवकरच मरण पावले (१८॰॰). बाजीरावावर शिंदे-होळकरांचे प्रथमपासून वर्चस्व होते. त्यातून सुटण्यासाठी त्याने इंग्रजांबरोबर मानहानीकारक तह केला (डिसेंबर १८॰२). त्यामुळे तो प्राय: परतंत्र झाला. त्याने तैनाती फौजेची अट मान्य केली. त्याला इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतरांशी संबंध ठेवण्यास सक्त मनाई होती, शिवाय मराठी सरदारांचे संघटन करून त्यांस एकत्र आणणेही अशक्य झाले. या तहाची व इंग्रजांच्या धोरणाची जाण बाजीरावाला होती, असे दितस नाही. इंग्रजांच्या साहाय्याने पटवर्धन, रास्ते या आपल्या बलाढ्य सरदारांचा पाडाव करण्याचा व्यूह त्याने रचला पण इंग्रज वकील एल्फिन्स्टन याने १८१२ च्या पंढरपूरच्या तहाने तो हाणून पाडला. पेशवा जळफळला आणि इंग्रजांविरुद्ध कटास सुरुवात झाली.
2. Sardesai, G.S. Sarkar, Jadunath, Ed. Poona, Residency Correspondence, Vols. XII and XIII, Elphinstone’s Papers, 1948.
“