बाघथर : मध्य प्रदेशातील बाघ गावापासून पश्चिमेस काठेवाडातील वढवाणपर्यंतच्या क्षेत्रात तुटक आढळणारा सागरी शैल-समूह. यालाच नर्मदेच्या खोऱ्यातील क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील) थर असेही म्हटले जाते. याचा वरचा सु. वीस मी. जाडीचा भाग चुनखडकांचा आहे व त्याच्यात ॲमोनाइट, एकिनॉयडिया, ब्रायोझोआ (पॉलिझोआ), ग्रॅस्ट्रोपोडा (शंखधारी) व बायव्हाल्व्हिया (शिंपाधारी) प्राण्यांचे पुष्कळ जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) आढळतात. खालचा भाग वालुकाश्माचा आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे वालुकाश्माची जाडी वाढत गेलेली आहे. त्याला ‘निमार वालुकाश्म’ म्हणतात. निमार वालुकाश्म पूर्वी जीवाश्महीन मानला जात असे पण अगदी अलीकडील काळात त्यामध्ये काही जीवाश्म आढळले आहेत. बांधकामासाठी व दळण्याच्या जात्यांसाठी तो पुष्कळ वापरला जातो. बाघ थरांचे संबध पुढीलप्रमाणे आहेत :⇨ आर्कीयन खडक, मध्य गोंडवनी खडक [⟶गोंडवनी संघ] वगैरे खडकांवर बाघ थर विसंगतपणे वसलेले असून⇨ दक्षिण ट्रॅप खडक, या थरांवर वसलेले आहेत. बाघ थराचे खालचा व वरचा असे भाग पाडण्यात येतात. खालच्या भागात निमार वालुकाश्म येतात, तर वरच्या भागात ग्रंथिल, मृण्मय चुनखडक तसेच देवळा (चिराखात) मार्ल आणि ब्रायोझोआयुक्त चुनखडक यांचा समावेश होतो.
केळकर, क. वा.