बागूल, बाबुराव : (१७ जुलै १९३०- ). मराठीतील एक श्रेष्ठ कथालेखक आणि महाराष्ट्रातील दलित साहित्यविषयक चळवळीचे एक प्रमुख प्रवर्तक. जन्म नासिक जिल्ह्यातील विहीतगाव येथे एक गरीब दलित, कुटुंबात. शिक्षण विहीतगाव आणि मुंबई येथे इयत्ता अकरावीपर्यंत. आरंभी लाँड्रीमधला मार्कर, दवाखान्यातील कंपाउंडरचा साहाय्यक अशा नोकऱ्या केल्यानंतर प्रथम दादरच्या कोहिनूर मिलमध्ये आणि नंतर माटुंगा येथे रेल्वेच्या यंत्रशाळेत कामगार म्हणून त्यांनी बारा वर्षे काम केले. लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी १९६८ साली रेल्वेच्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला. मार्क्स, लेनिन, म. जोतिराव फुले डॉ. आंबेडकर, तसेच गॉर्की, चेकॉव्ह आणि शरतचंद्र चतर्जी इत्यादींच्या विचारांना व साहित्याचा प्रभाव त्यांच्या साहित्यनिर्मितीला प्रेरक ठरला. जेव्हा मी जात चोरली होती (१९६३), मरण स्वस्त होत आहे (१९६९, कथासंग्रह) आणि सूड (१९७॰, कादंबरिका) ह्या बागुलांच्या साहित्यकृती गाजल्या. सामाजिक विषमतेचा बळी होऊन झोपडपट्टीत नाही तर गावकुसाबाहेर राहणारा दु:ख-दैन्याने ग्रासलेला आणि अन्याय-अत्याचारांविरुद्ध बंड करून उठणारा शोषित, दलित, अपमानित माणूस बागुलांच्या कथांचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या इच्छाआकांक्षांचा सुखदु:खांचा आणि वासना-विकारांचा शोध घेत असताना एका दाहक सामाजिक वास्तवाचे दर्शन बागुलांनी घडविले आहे. सूड ह्या त्यांच्या कादंबरिकेत पुरुषी अत्याचारांविरुद्ध बंड करून उठलेल्या जानकी नावाच्या तरुणीची कथा आहे. जानकी ही एका मुरळीची मुलगी. तारुण्याची आणि स्त्रीत्वाची विटंबना असह्य झाल्यामुळे तिला स्त्रीत्वच नकोसे होते. साधुवेष धारण करून एक पुरुष म्हणून वावरण्याचा ती प्रयत्न करते. पुढे निर्मळ मनाच्या एका साधूच्या सहावासात, राख झालेल्या तिच्या स्त्रीसुलभ वासना आणि विकार पुन्हा सचेत होतात आणि त्या साधूला ती आपले स्त्रीत्व अर्पण करते. वास्तवता आणि प्रतीकात्मकता ह्यांच्या समिश्र लयीतून स्त्रीत्व साकारलेली जानकीची ही कथा एका विद्रोही स्त्रीचे व्यक्तिमत्त्व उभे करीत असली, तरी तिच्यातील काव्यात्मकताही लक्षणीय आहे. अस्सल अनुभव, दीनदलितांविषयी वाटणारे अपार आपलेपण, विद्रोहाची खंबीर भूमिका आणि तिच्याशी सुसंगत अशी एक प्रकारची रांगडी भाषा ह्यांनी बागुलांच्या साहित्यकृतींना त्यांचे वेगळे, पृथगात्म रूप प्राप्त करून दिले आहे. काव्यात्मता व भेदक कल्पनाशक्ती यांची देणगी बागुलांना लाभली आहे. त्यामुळे दारुण वास्तवाची त्यांची चित्रे वास्तवाच्या पलीकडील व्यापक अर्थपूर्णता सूचित करतात. मरण स्वस्त होत आहे ह्या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार योजनेत हरि नारायण आपटे पारितोषिक देण्यात आले (१९७॰). आंबेडकर भारत (भाग १, १९८१) ह्या त्यांच्या पुस्तकातील सतरा कथांतून इंग्रजी चौथीपासून बी.ए. उत्तीर्ण होईपर्यंतचे डॉ. आंबेडकर उभे केलेले आहेत. त्यांच्या अनेक कथांचे गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून अनुवाद झालेले आहेत. १९६॰ नंतरचे मराठी साहित्याचे दशक ढवळून काढणाऱ्या आघाडीच्या दलित साहित्यिकांत त्यांचा समावेश होतो. दलितांच्या वाङ्मयीन चळवळीला त्यांनी व्यापक मानवतावादी पायावर उभे केले. आहे. या साहित्याची क्रांतिकारकता नेमकी कोणत्या सांस्कृतिक, वैचारिक वा वाङ्मयीन विचारधारांत आहे, हे त्यांनी आपल्या भाषण-लेखनांतून स्पष्ट केले. त्यांच्या वाङ्मयीन वैचारिक भूमिकेचा रसिकतापूर्ण आविष्कार त्यांनी लिहिलेल्या काही प्रस्तावनांतून आढळतो. या प्रकारच्या त्यांच्या महत्त्वाच्या भाषण-लेखनाचा अंतर्भाव… दलित साहित्य : आजचे क्रांतिविज्ञान (१९८१) ह्या ग्रंथात केलेला आहे. अस्पृश्यतेचे जळजळीत अनुभव व्यक्तविणाऱ्या काही कविताही बागुलांनी लिहिलेल्या असून त्या आकार (१९६७) ह्या दलित कवींच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ज्ञानविज्ञान आणि लोकशाही समाजवाद ह्यांचे बागूल हे एक निष्ठावंत पुरस्कर्ते असून त्यांच्या ह्या निष्ठेचा प्रत्यय त्यांच्या अनेक निबंधांतून व भाषणांतून येतो. आम्ही नावाचे मासिकही त्यांनी सुरू केले होते. निकाय (नागपूर) सारख्या काही दलित नियतकालिकांशी सल्लागार लेखक म्हणूनही त्यांचा संबंध आला. महाराष्ट्र बौद्ध साहित्यसभेने महाड येथे आयोजित केलेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९७२). १९७५ मध्ये फाय फाउंडेशनची शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली.

संदर्भ : ताकसांडे, मधुकर,, संपा. बाबुराव बागूल : दलितसाहित्य : आजचे क्रांतिविज्ञान, नागपूर, १९८१.

ढांगळे, अर्जुन