बांबूसाप : व्हायपरिडी या सर्पकुलाच्या क्रोटॅलिनी उपकुलातील हा साप आहे. या उपकुलातील सापांचे मुख्य लक्षण म्हणजे नाक आणि डोळा यांच्यामध्ये एक लहान खळगा असतो म्हणूनच यांना ‘सरंध्र मंडली’ अथवा ‘पिट व्हायपर’म्हणतात. सरंध्र मंडलींच्या एकूण ६५ जाती आहेत, त्यांपैकी दोन तृतीयांश अमेरिकेत व एक तृतीयांश आशियात आहेत. आफ्रिकेत सरंध्र मंडली मुळीच नाहीत. भारतातील सगळे सरंध्र मंडली फक्त डोंगराळ भागात ४६०-३,०५०मी. उंचीवर आढळतात. यांच्या तीनचार जाती महाराष्ट्रात आढळतात. बांबू साप भारतात सगळीकडे पुष्कळ सापडतो. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगराळ भागात हा सापडतो. याचे शास्त्रीय नाव ट्रायमेरेसूरस ग्रॅमिनियस आहे. बहुधा हा हिरव्या रंगाचा असतो पण क्वचित त्यांचा रंग पिवळा किंवा तपकिरी असतो. शरीराच्या प्रत्येक बाजूवर पिवळी किंवा पांढरी रेघ असते पोट पांढऱ्या किंवा फिक्कट हिरव्या रंगाचे असते कधीकधी त्याच्यावर काळे ठिपके असतात. डोके तिकोनी, चपटे आणि रुंद असते डोळ्यातील बाहुली अंडाकार व उभी असते आणि तिच्या भोवतालचा भाग सोनेरी रंगाचा असतो. याची लांबी सु. ७५सेंमी. असते पण यापेक्षा मोठे नमुने आढळलेले आहेत. शेपटाची लांबी शरीराच्या एकपंचमांश असते. कळकांची बेटे, गवत आणि झुडपे यांत हा राहतो. शरीराचा रंग बाह्य परिस्थितीशी जुळणारा असल्यामुळे त्याने हालचाल केल्याशिवाय तो दिसत नाही. हा साप सामान्यत: सुस्त आहे पण त्याला डिवचल्यावर तो उग्र स्वरूप धारण करून जोराने फुसकारे टाकतो व दिसेल त्या वस्तूवर प्रहार करून चावा घेतो. लहान घुशी, उंदीर, सरडे, पक्षी इ. प्राण्यांवर हा आपली उपजीविका करतो. मादी अंडी घालीत नाही, पिलांना जन्म देते. याच्या दंशाने मनुष्य सहसा दगावत नाही. विषाराची किरकोळ लक्षणे दिसतात व ती सु. ४८तास टिकतात. दंशाची जागा निळीकाळी होऊन सुजते. नाक व डोळा यांच्या मध्ये असणाऱ्या खळग्याच्या कार्याविषयी निश्चित माहिती नाही. तो खळगा रसायन-ग्राही (रासायनिक उद्दीपने ग्रहण करणारे संवेदनाक्षम मज्जातूंतूचे टोक) असून त्यामुळे तापमानात होणारे बदल कळतात किंवा भक्ष्य जवळपास आल्याचे कळते, असा तर्क आहे.

पहा : घोणस, रॅटल साप.

कर्वे, ज. नी.