बांबुटी : आफ्रिका खंडातील झाईरे प्रजासत्ताकातील एक पिग्मी जमात. ट्वाईड, अका व इफे या उपजमातींसह त्यांची लोकसंख्या ३५,॰॰॰ (१९७॰) होती. त्यांची वस्ती मुख्यत्वे विषुववृत्ताजवळ असणाऱ्या इटुरी जंगलात आढळते. ही जमात ⇨पिग्मी संस्कृतीचा एक आदर्श नमुना होय. पुरुषांची उंची सरासरी १५॰ सेंमी. तर स्त्रियांची १४२ सेंमी. असते. काळा वर्ण, गुठळ्या होतील इतके कुरळे केस, रुंद नाक, जाड लोंबते ओठ आणि मोठे डोळे ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये असून स्त्री-पुरुष लंगोटीसारखा झाडांच्या सालीचा वापर करतात. वाळलेल्या वेली, हस्तिदंत, लाकडी तुकडे इत्यादींपासून तयार केलेली आभूषणे ते वापरतात. दाताचे वरचे सुळे व दाढा तासून त्या टोकदार व तीक्ष्ण करतात. डोके, चेहरा, पाठ, पोट इ. रानटी फळाफुलांपासून काढलेल्या रंगीत चिकाने रंगवितात. मातीत व वाळूत काठीच्या साहाय्याने विविध प्राण्यांची रेखाचित्रे काढतात.
यांची मूळ भाषा पिग्मी, पण इतर टोळ्यांशी संपर्क आल्याने त्यांच्या बोलीभाषेत फरक पडला. यांची बोलण्याची ढव मृदू आहे. ठिकठिकाणी शिकारीची जाळी टाकून किंवा विषारी बाणांच्या साहाय्याने ते शिकार करतात. मांस, मध व स्त्रियांनी गोळा केलेली कंदमुळे-फळे यांवर ते उदरनिर्वाह करतात. कुत्रा हे त्यांचे एकमेव पाळीव जनावर होय. शिकारीच्या निमित्ताने टोळ्या-टोळ्यांनी ते एखाद्या जागी तात्पुरती वस्ती करतात व तेथे काटक्या-पानांच्या गोलाकार झोपडीत राहतात. झोपडी उभारण्याचा हा हक्क स्त्रियांकडेच असतो. पत्नीशी भांडणतंटा झाल्यास सर्वप्रथम झोपडी पाडून टाकण्याचा हक्क बायको बजावते.
संदर्भ : 1. Turnbull, C.M. The Forest People, New York, 1961.
2. Mundock, G.P. Africa Its Peoples and Their Culture History, New York, 1959.
कीर्तने, सुमति.