बांडुंग : इंडोनेशिया प्रजासत्ताकातील प्रसिद्ध शहर व प. जावा प्रांताचे प्रशासकीय ठाणे. लोकसंख्या १५,००,००० (१९७५ अंदाज). समुद्रसपाटीपासून उंची ७३२ मी. प्रेआंगर पठारावर वसलेले हे शहर जाकार्ताच्या आग्नेयीस सु. १२० किमी. वर असून राजमार्ग, लोहमार्ग व हवाईमार्ग ह्यांनी ते पूर्वेकडील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे.

 

या शहराची स्थापना १८१० मध्ये झाली. सुरूवातीच्या काळात ते डच ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्कराचे प्रमुख ठिकाण होते. दुसऱ्‍या महायुद्धात इंडोनेशियनांनी सु. तीन वर्षे जपानविरुद्ध लढा दिला.अखेरीस जपानने ते काबीज केले (१९४२). महायुद्धोत्तर काळात शहराचा झपाट्याने विकास झाला. ऐतिहासिक महत्त्व असेलली आफ्रोआशियाई राष्ट्रांची पहिली परिषद १९५५ मध्ये येथेच भरली होती [⟶ बांडुंग परिषद]. तेव्हापासून या शहरास आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले.

 

‘इंडिपेन्डन्स हाऊस’ , बांडुंग.शहरात १९६४ मध्ये एक अणुकेंद्रीय संशोधन केंद्र स्थापण्यात आले असून तेथेच एक अणुभट्टी आहे. याशिवाय कापड, क्किनीन, विविध रसायने, चहा, रबरी वस्तू, अन्नप्रक्रिया व अन्न डबाबंद करणे, यंत्रसामग्री इत्यादींचे कारखाने येथे असून येथील ‘मलबार नभोवाणी केंद्र’ हे आग्नेय आशियातील एक शक्तिमान केंद्र मानले जाते. सध्याचे बांडुंग हे सूंदनीज लोकांच्या संस्कृतीचे व विद्येचे महत्त्वाचे केंद्र असून येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यांपैकी एक शासकीय विद्यापीठ, दोन खाजगी विद्यापीठे, पाश्चर इन्स्टिट्यूट, कृषिसंशोधन संस्था, तांत्रिक महाविद्यालय, अंधशाळा, ब्रॉश प्रयोगशाळा, शासकीय रोगप्रतिबंधक लससंस्था इ. प्रसिद्ध आहेत. ह्यांशिवाय येथे रुपण कला, शारीरिक शिक्षण, युद्धविद्या यांच्या अकादमी असून एक भूवैज्ञानिक संग्रहालयही आहे.

 

आल्हाददायक, निरोगी व थंड हवामानामुळे बांडुंग हे पर्यटकांचे केंद्र बनले असून आधुनिक टुमदार इमारती, रुंद रस्ते व दुतर्फा झाडी यांमुळे शहर आकर्षक वाटते. येथील ‘तामान सारी ’ (जूबिली पार्क) हे अत्यंत रम्य उद्यान आहे.

संदर्भ : Small, J. R. W. Bandung in the Early Revolution, 1945-46, New York, 1964.

 

देशपांडे, सु. र.